दरवर्षीप्रमाणे 15 जुलै रोजी जगभरात “स्किल्स फॉर ए रेजीलीएन्ट युथ” या संकल्पनेखाली जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात येत आहे. यावर्षी भारतात कौशल्य भारत अभियान सुरू करण्यात आल्याचा पाचवा वर्धापनदिन म्हणून हा दिवस साजरा होत आहे. कौशल्य विकास व नवउद्योजकता मंत्रालयातर्फे या दिवशी एका डिजिटल परिषदेचे आयोजन करण्यात आले.
कौशल्य भारत अभियान ही भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे. देशातील युवा वर्गाला अर्थार्जनाला उपयुक्त अशी कौशल्ये देऊन सक्षम करणे आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणची त्यांची उत्पादकता अधिक वाढवणे हा यामागचा हेतू आहे. कौशल्य भारत अंतर्गत अनेकविध क्षेत्रातील अभ्यासक्रम दिले जातात. हे अभ्यासक्रम उद्योगविश्वाची मानके तसेच राष्ट्रीय कौशल्य पात्रता संरचना अंतर्गत सरकारने ठरवलेली मानके या दोन्हीशी सुसंगत आहेत.
प्रौढांच्या तुलनेत युवांमध्ये जवळजवळ तीन पटीने अधिक बेरोजगारीचे प्रमाण असण्याची शक्यता असते आणि सतत कमी दर्जाचे रोजगार स्वीकारतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात श्रमिक बाजारात असमानता असते. याव्यतिरिक्त, महिलांमध्ये अधिक बेरोजगारी असण्याची आणि कमी वेतन देण्याची शक्यता असते किंवा कंत्राटी पद्धतीने काम करण्याची पद्धत फोफावते. म्हणूनच या समस्येच्या निराकरणासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण हे प्रमुख मार्गदर्शक ठरते.