यशस्वी जैस्वाल : आताच्या सर्व क्रिकेटर्समध्ये सर्वांत वेगळा ठरतो, कारण...
-विमल कुमार
2023 मध्ये भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असतानाची ही गोष्ट. बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हलमध्ये यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली हे दोघे एकमेकांशेजारी असलेल्या नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत होते.
जैस्वाल जेव्हा कोणताही शॉट खेळायचा किंवा बचाव करायचा तेव्हा कोहली उत्स्फूर्तपणे त्याची फलंदाजी पाहायचा.
फलंदाजीच्या सत्रादरम्यान कोहली स्वत:च्या फलंदाजीशिवाय इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करतानाचे प्रसंग क्वचितच घडतात. पण, यावेळी जैस्वाल कोहलीचं लक्ष वारंवार स्वत:कडेच वेधून घेत असल्याचं दिसून आलं.
नेटमधील फलंदाजीचं सत्र संपल्यावर कोहलीनं जैस्वालला बोलावलं आणि त्याला मैदानाच्या दुसऱ्या टोकाला नेलं. मुंबईच्या या तरुण फलंदाजासोबत कोहलीनं जवळपास अर्धा तास वेळ घालवला आणि त्यावेळी कोहली फलंदाज प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला.
जैस्वालला भारताच्या दिग्गज फलंदाजाकडून फलंदाजीचा 'मास्टर क्लास', शिकवणूक मिळत होती, जी भारतीय संघातील प्रत्येकच खेळाडूला सहज उपलब्ध होत नाही.
कोहलीचे हावभाव पाहता हे स्पष्ट होतं की, त्याला जैस्वालमध्ये भारतीय फलंदाजीचे भवितव्य दिसत होतं.
कदाचित सचिन तेंडुलकरकडून कोहलीला त्याच्या सुरुवातीच्या काळात जे मार्गदर्शन मिळत होतं, तेच कोहली जैस्वालला देण्याचा प्रयत्न करत होता.
इंग्रजांचा एकट्यानं सामना केला
जैस्वालनं विशाखापट्टणम येथील इंग्लंडविरुद्धच्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी द्विशतक झळकावलं.
तेव्हा तो ब्रायन लारा नंतर दुसरा असा फलंदाज ठरला ज्यानं एका डावात द्विशतक झळकावलं आणि दुसऱ्या कुण्याही फलंदाजाने 34 धावांचा आकडाही पार केला नाही.
लारानं 2005 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲडलेड कसोटीत ही कामगिरी केली होती.
भारतीय फलंदाजीचा भार आपल्या तरुण खांद्यावर घेण्यासाठीची परिपक्वता मिळवण्याच्या अगदी जवळ जैस्वाल आहे. त्याची एकाग्रता आणि आक्रमकता यांचा उत्कृष्ट मिलाफ हीच बाब स्पष्ट करतात.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळलेल्या या खेळीनं नव्या युगात जैस्वाल हा मोठा आशेचा किरण असल्याचा विश्वास भारतीय क्रिकेट समर्थकांना दिला असेल.
रोहित शर्माने दिला सल्ला
जैस्वालच्या वेस्ट इंडिज दौऱ्याशी संबंधित आणखी एक किस्सा कर्णधार रोहित शर्माशी संबंधित आहे.
डॉमिनिकामध्ये जैस्वालला प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळणार होती. रोहित शर्मानं त्याला सामन्यापूर्वी हे सांगितलं होतं.
जैस्वालनं 2023 च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी केवळ 14 सामन्यांमध्ये 625 धावा केल्या होत्या.
याशिवाय रणजी ट्रॉफी आणि भारत-अ संघाकरता तो नियमित धावा करत होता. पण, कसोटी क्रिकेट हे कसोटी क्रिकेट असतं आणि जैस्वाल उत्साही तर होताच पण थोडा चिंतेतही होता.
यावेळी रोहितनं जैस्वालशी केलेला संवाद या लेखकाच्या मनात कायम राहील.
रोहित जैस्वालला म्हणाला, "हे बघ भाऊ, तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही. तू आयपीएलमध्ये चांगला खेळला असेल, रणजीमध्येही चांगला खेळला असेल तर तुला इथंही तसंच खेळावं लागेल. तू जास्त विचार न करता खेळपट्टीवर जा आणि खेळ.
"ठीक आहे, हे कसोटी क्रिकेट आहे. पण नेहमी स्वत:ला सांग की मी क्लब, रणजी आणि आयपीएलमध्ये विशिष्ट कारणासाठी धावा करून भारतासाठी कसोटी खेळत आहे. लोक खूप काही बोलतील पण स्वतःवर शंका घेऊ नका, फक्त शिकत रहा."
जैस्वालनंही तेच केलं. पहिल्याच कसोटीत त्यानं शतक झळकावलं. 5 कसोटी सामन्यांनंतर या 22 वर्षीय फलंदाजानं आपल्या कारकिर्दीतील पहिलं द्विशतकही ठोकलं.
कसोटी क्रिकेटमध्ये जैस्वालपेक्षा कमी वयात भारतासाठी द्विशतकं झळकावणाऱ्यांमध्ये विनोद कांबळी आणि सुनील गावस्कर याचा समावेश आहेत.
19 चौकार आणि 7 षटकार मारल्यानंतर 209 धावांची इनिंग खेळून जैस्वाल पॅव्हेलियनमध्ये परतत होता, तेव्हा त्याचा स्ट्राइक रेट 72 होता. यातून त्याचा टी-20 क्रिकेटचा आक्रमक दृष्टिकोन कसोटी क्रिकेटमध्ये स्पष्टपणे दिसत होता.
कधीकाळी मुंबईत पाणीपुरी विकायचा
उत्तर प्रदेशातील भदोही सोडून वयाच्या 12व्या वर्षी मुंबईत आलेल्या यशस्वी जैस्वालच्या संघर्षावरही एक प्रेरणादायी चित्रपट बनवता येईल.
सोशल मीडियात आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्येही, जैस्वाल तंबूत राहून वेळ घालवत असे किंवा कधी-कधी मुंबईच्या रस्त्यांवर पाणीपुरी विकत असे, या गोष्टींकडे अधिक लक्ष दिलं जातं.
पण, आता 22 यार्डच्या खेळपट्टीवर बॅटने केलेले त्याचे अप्रतिम कारनामे बातम्यांचे मथळे बनत आहेत.
जैस्वालनं ज्या आक्रमकतेनं षटकार ठोकून शतक पूर्ण केलं आणि नंतर द्विशतक ठोकेपर्यंत तीच शैली कायम ठेवली, त्यावरून या खेळाडूमध्ये खरोखरच ताकद असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळेच तर विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे दिग्गज या फलंदाजाला भविष्यात भारतीय क्रिकेटचा वारसा पुढे नेणारा खेळाडू म्हणून बघत असावेत.
सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील आणखी एक गोष्ट. अजिंक्य रहाणे मुलाखत देत होता आणि कर्णधार रोहित शर्मा पत्रकाराच्या भूमिकेत त्याला प्रश्न विचारत होता.
जैस्वाल मैदानाच्या दुसऱ्या टोकाला फलंदाजी करत होता. त्यानंतर जोरदार शॉटचा आवाज येतो आणि चेंडू नेमका रोहित आणि रहाणेच्या जवळ येऊन पडतो.
यावर जैस्वालनं काय प्रतिक्रिया दिली, ती आम्हाला दुरून ऐकू आली नाही. पण कसोटी क्रिकेटमध्ये तो ज्या पद्धतीनं फलंदाजी करत आहे त्यावरून मी कसोटीतही अशीच फलंदाजी करेन अशीच त्याची भूमिका स्पष्टपणे दिसून येते.