गावसकर यांनी रोहितची तुलना थेट वीरेंदर सेहवागशी केली आहे. गावसकर म्हणतात, 'व्हिव्हियन रिचड्र्स आणि सेहवागनंतर रोहित हा जगातील सर्वात स्फोटक फलंदाज ठरला आहे. सेहवागप्रमाणेच रोहितलाही रोखणे गोलंदाजांना अवघड जाते. सेहवागसारखीच रोहितची धावांची आणि शतकांची भूक जास्त आहे. एक चेंडू बाहेर फेकल्यानंतर दुसरा चेंडू मैदानाबाहेर भिरकावण्याचा सेहवागसारखाच रोहितचाही प्रयत्न असतो. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहितने शानदार कामगिरी केली. आता टी-20 मालिकाही त्यानेच गाजवली.'
'मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर रोहितने ज्या प्रकारे अधिराज्य गाजवले आहे, त्या प्रकारे त्याने कसोटी क्रिकेटमध्येही हुकमत गाजवली तर तो रिचड्र्स आणि सेहवागनंतरचा जगातील सर्वात स्फोटक फलंदाज ठरेल,' असेही गावसकर यांनी म्हटले आहे. रोहितने या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 73.57च्या सरासरीने 1030 धावा केल्या असून टी-20मध्ये त्याने 556 धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.