भारताला मिळाले दुसरे गोल्ड मेडल, जेरेमी लालरीत्रुगाने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली

रविवार, 31 जुलै 2022 (17:56 IST)
भारताचा युवा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. त्याने स्नॅचमध्ये सर्वाधिक 140 किलो वजन उचलले, तर क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो वजन उचलून इतिहास रचला. त्याने एकूण 300 किलोग्रॅम वजन उचलले. अशाप्रकारे भारताला वेटलिफ्टिंगमध्ये दुसरे सुवर्ण आणि एकूण पाचवे पदक मिळाले. याआधी शनिवारी मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.
 
युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा जेरेमी पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होत होता आणि त्याने पहिल्याच गेममध्ये इतिहास रचला होता. त्याने पहिल्या प्रयत्नात स्नॅचमध्ये 136 किलो वजन उचलले, तर दुसऱ्या प्रयत्नात 140 किलो वजन उचलले. हा त्याचा गेम रेकॉर्ड होता, तर तिसऱ्या प्रयत्नात 143 किलो वजन उचलण्यात तो अपयशी ठरला.
 
यानंतर जेरेमीने क्लीन अँड जर्कमध्ये पहिल्या प्रयत्नात 154 किलो वजन उचलले, तर दुसऱ्या प्रयत्नात 160 किलो वजन उचलले. यादरम्यान तो पाठ आणि कोपराच्या दुखापतींशी झुंजताना दिसला. मात्र, तिसऱ्या प्रयत्नात अपयश आले. या स्पर्धेत सामोआच्या वायपावा इओनेने 293 किलो वजनासह रौप्यपदक जिंकले, तर नायजेरियाच्या एडिडिओंग जोसेफ उमोआफियाने 290 किलो वजनासह कांस्यपदक जिंकले.
 
याआधी मीराबाई चानूने सुवर्ण, संकेत सरगर आणि बिंदियारानी देवी यांनी रौप्य तर गुरुराजा पुजारीने कांस्यपदक जिंकले. अशा प्रकारे भारताला वेटलिफ्टिंगमध्ये आतापर्यंत 5 पदके मिळाली आहेत. या स्पर्धेत आज आणखी दोन पदकांची अपेक्षा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती