महिला विश्वचषकात काल भारतीय महिलांनी धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. माजी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघावर मात करून भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी मात करत रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्याचं तिकीट बूक केलं. रविवारी मिताली राजच्या टीम इंडियाची गाठ यजमान इंग्लंडच्या महिला संघाशी पडणार आहे. भारताने दिलेल्या २८२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन महिलांचा संघ २४५ धावांमध्ये बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स ब्लॅकवेलने अखेरच्या षटकांमध्ये ताबडतोड फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे भारताचा विजय थोडा लांबला. मात्र दिप्ती शर्माने तिला बाद करून ६ वेळा जगज्जेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाचं पॅकअप केलं.