चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या 10 वर्षांपासून हा कार्यक्रम महाराष्ट्राला खळखळून हसवत आहे. लवकरच हा कार्यक्रमाचा 1000 वा भाग प्रसारित होणार आहे. अशातच आता या कार्यक्रमाचा दिग्दर्शक, निवेदक डॉक्टर निलेश साबळे या कार्यक्रमातून निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. 'कॅप्टन ऑफ द शीप' जहाज सोडणार असल्याने चाहते नाराज झाले आहेत.
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे निलेश साबळे घराघरांत पोहोचला आहे. पण आता यापुढे तो या कार्यक्रमाचा भाग नसणार असल्याची चर्चा आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना निलेश साबळे म्हणाला,"चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम मी सोडला असल्याची चर्चा आहे. कार्यक्रम सध्या चार-पाच महिन्यांच्या गॅपवर चालला आहे. चॅनलने ठरवलं तर कार्यक्रम पुन्हा सुरू होऊ शकतो. तब्येतीच्या कारणाने मी थोडेदिवस मी कार्यक्रमातून बाहेर असेल".