स्पर्धक कलाकारांची संभाव्य यादी
बिग बॉस मराठीच्या आधीच्या दोन्ही पर्वाप्रमाणे या पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्याकडेच आहे. अलिकडेच महेश मांजरेकर यांना मूत्राशयाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील खासगी इस्पितळात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी मांजरेकर यांनी बिग बॉस मराठी ३ च्या प्रोमोचे चित्रीकरण केले. या प्रोमोच्या चित्रीकरणाचा अनुभव त्यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितला.
मला आत्यंतिक वेदना होत होत्या...
बिग बॉस मराठी ३ ची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी मांजरेकरांनी कार्यक्रमाच्या प्रोमो शूट करतानाचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, 'बिग बॉस मराठी ३ कार्यक्रमाचा पहिला प्रोमो जेव्हा चित्रीत झाला तो अनुभव आजही माझ्या चांगला लक्षात आहे. चित्रीकरणावेळी मला प्रचंड वेदना होत होत्या. तरीही मी हा प्रोमो तितक्याच जिद्दीने आणि प्रामाणिकपणे चित्रीत केला.'
मांजरेकर पुढे म्हणाले की, 'माझ्या शरीरात प्रत्येक ठिकाणी वेदना होत होत्या. इतकेच नाही तर शरीरात अनेक ठिकाणी नळ्या लावलेल्या होत्या. चित्रीकरणावेळी त्या कॅमेऱ्यात दिसू नयेत यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. मी गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीमध्ये काम करत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये चित्रीकरण पूर्ण करायचे इतकेच मला माहीत होते. मला ज्या वेदना, जो त्रास होत होता त्याबद्दल माझी काहीच तक्रार नव्हती. चित्रीकरण करताना मी खूप अस्वस्थ होतो. परंतु माझी ही अस्वस्थता चेहऱ्यावर दिसू न देता मी हे चित्रीकरण पूर्ण केले. हा प्रोमो सर्वांना आवडला याचा मला सर्वाधिक आनंद आहे.'