'दादाच्या लग्नाचा' बार उडवल्यानंतर 'विकून टाक' सिनेमातील 'डोळ्यामंदी तुझा चांदवा' हे प्रेमावर आधारित गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. अतिशय सुंदर आणि हळुवार अशा या गाण्याला हर्षवर्धन वावरे यांनी स्वरबद्ध, गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध तर अमितराज यांनी संगीतबद्ध केले आहे. गुरु ठाकूर यांनी अगदी सुंदर आणि कल्पकतेने गाण्याचे बोल लिहिले आहेत. अमावस्येच्या रात्रीला आकाशात संपूर्ण काळोख असतानाही प्रियकराला प्रेयसीच्या डोळ्यांत चांदणे दिसत आहे. शिवराज वायचळ आणि राधा सागर यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यात ही दोघे त्यांच्या डोळ्यांतून भावना व्यक्त करत आहेत. त्या दोघांच्या डोळ्यांतून एकमेकांबद्दल व्यक्त होणाऱ्या प्रेमाला या गाण्यातून शब्दांची साथ मिळाल्याची जाणीव आपल्याला हे गाणे बघताना होते.
या गाण्याबद्दल दिग्दर्शक समीर पाटील सांगतात, ''या गाण्याची सुरुवात ज्या सीनने होते. त्या सीनच्या चित्रीकरणाचा एक किस्सा आहे. नायक, नायिका आणि त्यांचा मित्र एका पुलाखाली लपलेले असतात. पोलीस येतात आणि त्यांना शोधून निघून जातात, असा हा प्रसंग आणि तिथून पुढे गाणे सुरु होते. या सीनसाठी आम्हाला मनासारखी जागा मिळाली होती. मात्र त्या ठिकाणी चित्रीकरण करताना काही अडचणही होत्या. मुळात तो रहदारीचा रस्ता असल्याने आणि अनेक गोष्टींवर मर्यादा असल्याने आम्हाला चित्रीकरण लवकरात लवकर पार पाडायचे होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमचे चित्रीकरण पहिल्याच टेकमध्ये 'ओके' झाले. या चित्रीकरणासाठी कॅमेरामन, दिग्दर्शन टीम, कलाकार अशा सगळ्यांनाच कसरत करावी लागली, परंतु हे आव्हान सर्वांनी लीलया पार पाडले. या गाण्यात नायक-नायिकेचा प्रवास दाखवण्यात आला असून हे 'मोंटाज सॉंग' आहे.''
विवा इनएन प्रॉडक्शन आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित 'विकून टाक' या सिनेमाचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले असून, क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून राजेंद्र वनमाळी यांनी काम पहिले आहे. शिवराज वायचळ, रोहित माने, राधा सागर, ऋतुजा देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, रोहित माने, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या मुख्य भूमिका असणारा हा सिनेमा येत्या ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.