लिंक्ड इन या प्रोफेशनल नेटवर्किंग साईटने केलेल्या सर्वेक्षणानुसार नोकरी शोधण्यात आणि बदलण्यात भारतीय आघाडीवर आहेत. चांगली संधी मिळाली की लगेच आधीची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला जातो. जादा पगार हे नोकरी सोडण्यामागील महत्त्वाचं कारण ठरतं. तरुण पिढी एका ठिकाणी अजिबात टिकत नाही. पण दुसर्या ठिकाणी मिळणारा गलेलठ्ठ पगार एवढाच निकष लक्षात घेऊन नोकरी सोडणं योग्य ठरत नाही. नोकरी सोडण्याआधी इतर काही बाबी लक्षात घेणंही गरजेचं असतं.
* नोकरी बदलण्याचा निर्णय घेताना काही बाबींचा विचार करायला हवा. मुख्य म्हणजे केवळ पैशाला महत्त्व न देता नव्या ठिकाणी मिळणार्या प्रशिक्षणातून तुम्हाला काही शिकायला मिळणार आहे का, तिथे एकाच प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं का, नव्या नोकरीत विकासाच्या काही संधी मिळणार आहेत का, प्रोफेशनल म्हणून तुमची वाढ होणार आहे का या बाबी विचारात घेणं गरजेचं आहे.
* सध्याच्या कंपनीच्या कल्चरपासून तुम्ही दुरावला आहात का, याचा काही क्षण विचार करा. कंपनीतल्या वातावरणात तुम्ही आनंदी असाल, सहकार्यांसोबत तुमचं चांगलं ट्यूनिंग असेल, तुमचा उत्तम ग्रुप असेल तर अशा परिस्थितीत फक्त पैशांचा विचार करून नोकरी सोडणं कितपत योग्य याचाही विचार व्हायला हवा.
* तुमची कंपनी़, कंपनीतली माणसं तुमच्यावर विश्वास टाकतात का, याचाही विचार करता नव्या कंपनीतही हेच वातावरण असेल काल याबाबत बारकाईनं विचार करा. कंपनीतल्या लोकांचा तुमच्या कामावर विश्वासच नसेल तर अशा कंपनीत काम करून काहीच लाभ होणार नाही.