2000 च्या नोटा बदलण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवली

शनिवार, 30 सप्टेंबर 2023 (19:02 IST)
नोटबंदीच्या काळात आणलेली 2000 रुपयांची नवी नोट मागे घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला होता.
 
सध्यातरी 2000 रुपयांच्या नोटा वैध चलन असतील, पण लोकांनी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत त्या बँकेत जमा कराव्यात, असं आवाहन रिझर्व्ह बँकेने केलं होतं. आता ही मुदत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे.
 
1. दोन हजारांच्या नोटा मागे का घेण्यात आल्या होत्या?
2000 रुपयांच्या नोटा या रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर 2016 मध्ये चलनात आणल्या होत्या. RBI कायदा 1934 अंतर्गत कलम 24(1) अन्वये या नोटा चलनात आल्या.
 
त्यावेळी भारत सरकारने रुपये 500 आणि 1000 मूल्याच्या नोटा चलनातून बाद केल्याने त्याची भरपाई काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ही सोय केली होती.
 
तात्पुरत्या वापरानंतर या नोटा 2018-19 साली छापणं रिझर्व्ह बँकेने बंद केलं. मार्च 2017 सालीच या नोटांचा वापर येत्या चार-वर्षांपुरताच करण्यात येईल, असे संकेत रिझर्व्ह बँकेने दिले होते.
 
तेव्हापासूनच बाजारात या नोटा दिसणं कमी झालं होतं. दरम्यान, नोटाबंदीनंतर इतर मूल्यांच्या अनेक नोटा बाजारात दाखल झाल्या.
 
अखेरीस, रिझर्व्ह बँकेच्या क्लिन नोट पॉलिसीअंतर्गत 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
 
2. क्लिन नोट पॉलिसी काय आहे?
रिझर्व्ह बँकेकडून क्लिन नोट पॉलिसी हे धोरण स्वीकारण्यात आलेलं आहे. यानुसार लोकांच्या वापरासाठी बाजारात चांगल्या दर्जाच्या नोटांचा पुरवठा होईल, याची दक्षता रिझर्व्ह बँकेकडून घेतली जाते.
 
3. दोन हजारांच्या नोटा बाजारात यापुढेही वापरता येऊ शकतात का?
रिझर्व्ह बँकेने त्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत दिलेली होती. 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा लीगल टेंडर राहतील असं याआधीच जाहीर करण्यात आलेलं आहे. आता ती मुदत 7 ऑक्टोबर केली आहे.
 
या मुदतीपर्यंत या नोटा बँकेत जमा करून त्या बदल्यात इतर मूल्यांच्या नोटा घ्याव्यात, असा सल्ला रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलेला होता.
 
4. तुमच्याकडे 2000 च्या नोटा असल्यास काय कराल?
वर उल्लेख केल्याप्रमाणे तुम्ही या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बिनदिक्कत वापरू शकता. पण तुम्हाला त्या बदलायच्या असतील, तर जवळच्या बँकांमध्ये जाऊन त्या जमा करा. त्या बदल्यात तुम्हाला इतर नोटा दिल्या जातील.
 
किंवा तुम्ही ते पैसे तुमच्या खात्यातही जमा करू शकता.
 
रिझर्व्ह बँकेने त्यांच्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्येही 2000 च्या नोटांच्या बदल्यात इतर नोटा देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
 
5. नोटा बँक खात्यात भरण्यासाठी रकमेची मर्यादा आहे का?
KYC (Know your Customer) च्या नियमांप्रमाणे कोणत्याही मर्यादेशिवाय तुम्हाला तुमचे पैसे बँक खात्यात जमा करता येतील.
 
KYC नसल्यास त्यासाठी रिझर्व्ह बँकेने घालून दिलेले नियम सर्वांनाच लागू असतील.
 
यादरम्यान, नोटा बदलून घेणाऱ्या व्यक्तीला एका वेळी जास्तीत जास्त 20 हजार रुपये इतर नोटांच्या स्वरुपात बदलून घेता येतील.
 
6. नोटा बदलून घेण्याची सुविधा कधीपासून कधीपर्यंत उपलब्ध असेल?
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन विचारणा करू शकता.
 
नोटा बदलून देण्याची सुविधा देण्याकरिता बँकांना पुरेसा वेळ दिला जाणार आहे. त्यानुसार मे 2023 च्या अखेरपर्यंत या सुविधा सर्वत्र उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
 
आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे सध्या तरी रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या नोटा बदलून घ्याव्यात अशी सूचना केलेली आहे.
 
7. नोटा केवळ आपलं खातं असलेल्या बँकेतूनच बदलून मिळतील का?
नाही. वरील प्रश्नांच्या उत्तरांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही बँकेतून नोटा बदलून मिळू शकतात.
 
पण, बँकेत खातं नसलेल्या व्यक्तीकरिता नोटा बदलून घेण्यासाठी 20 हजार रुपयांची मर्यादा असेल.
 
8. व्यवसायासाठी 20 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या नोटा पाहिजे असल्यास काय करावं?
त्यासाठी तुमच्या बँक खात्यात पैसे भरण्याचा सोपा पर्याय तुम्ही वापरू शकतात. तुमच्या बँक खात्यात ही रक्कम भरण्यासाठी तुम्हाला कोणत्याच प्रकारच्या मर्यादा नाहीत.
 
2000 रुपयांच्या नोटा बँकेत भरून आपल्याला हव्या त्या पद्धतीने त्या नोटा बँकेतून काढता येऊ शकतात.
 
9. नोटा बदलण्यासाठी काही फी द्यावी लागणार का?
नाही, नोटा बदलण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागणार नाही. ते मोफत असेल.
 
10. ज्येष्ठ नागरिक, काही व्याधी असलेल्या व्यक्तींना विशेष व्यवस्था असेल का?
2000 ची नोट जमा करण्यासाठी, बदलण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांना कमी त्रास होईल याची काळजी घेण्याची सूचना बँकांना केली आहे.
 
11. जर तात्काळ ही नोट बँकेत भरली नाही किंवा बदलून घेतली नाही तर काय होईल?
नोटा भरणं किंवा बदलणं सोपं जावं, यासाठी 4 महिन्यांचा अवधी ठेलला आहे. त्यामुळे या काळात आपल्या सोयीनुसार या नोटा जमा करता येतील.
 
12. बँकेने नोटा परत घेणं किंवा बदलणं याला नकार दिला तर...
तर तुम्ही संबंधित बँकेच्या तक्रार विभागात तक्रार करू शकता.
 
जर तक्रार दाखल करुन 30 दिवसांमध्ये बँकेने उत्तर किंवा तोडगा काढला नाही तर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या इंटिग्रेटेड ओम्बुड्स्मन योजना (आरबी-आयओएस)2021 नुसार तक्रार करू शकता. ती रिझर्व्ह बँकेच्या cm.rbi.org.in या पोर्टल वर करता येईल.
 
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “ 2000 च्या नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांचा अवधी दिला आहे. त्यामुळे हा चार महिन्यांचा कालावधी लोकांनी गांभीर्याने घ्यावा. नागरिकांनी दोन हजारांच्या नोटांवर घातलेली बंदी ही कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण करणारी आहे, असा अजिबात समज करू नये."
 
दोन हजारांच्या नोटा चलनात आणण्याची अनेक कारणं होती. त्यामुळे आता घेतलेला निर्णय हा काही निकषांमुळे घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन हजारांच्या नोटांवर घालण्यात आलेली बंदी ही नागरिकांनी गांभीर्याने घेतली तर चांगले होईल असंही ते पुढे म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती