शमा-ए-महफिल

अभिनय कुलकर्णी

शुक्रवार, 14 डिसेंबर 2007 (16:12 IST)
ब्लॉगविश्वात केवळ नवखे किंवा लेखनाची आवड असणारे लेखक आहेत, असे नव्हे, तर व्यावसायिक लिखाण करणारी मंडळीही या जगाचा भाग आहेत. इतर ब्लॉगर्सच्या दृष्टिने त्यांच्या भावनांचे प्रकटीकरण ब्लॉगच्या माध्यातून होत असतं, असं असताना व्यावसायिक लेखकांना, पत्रकारांना ब्लॉगची काय गरज असा प्रश्न पडू शकतो. मात्र, पत्रकाराच्या मनात असलेलं सगळंच छापून येतं असं नाही. अनेकदा छापल्यापेक्षा न छापलेलं बरंच असतं आणि ते व्यक्त करायला ज्या माध्यमात काम करतो, त्याची चौकट अपुरी पडते. काही वेळा त्या माध्यमात काम करतो हे बंधनही असतं. अशावेळी मनायिचे गुंती असलेलं मांडायला एक साधन हवं असतं. ते ब्लॉगमधून मिळतं.

पुस्तकांविषयी त्यांनी फार आसुसून लिहिले आहे. रिनोव्हेशनच्या निमित्ताने घर आवरत असताना पुस्तकांची आवरासावर करावी लागली आणि या कामातच पुस्तकांची एक मस्त मैफलच सजली. विविध पुस्तके हाताळताना त्याच्या विषयीच्या आठवणीही दाटून आल्या.
यावेळी या सदरात मुंबईत मुक्त पत्रकार असलेल्या शर्मिला फडके यांच्या शमा-ए-महफिल या ब्लॉगची ओळख करून देणार आहे. लोकसत्ता वाचणाऱ्यांना शर्मिला फडके हे नाव नवं नाही. चतुरा, चतुरंग या पुरवणीत फडके सातत्याने लिहित असतात. शिवाय त्या मराठी इंग्रजीत कॉपीरायटींगही करतात. व्यवस्थापन, नातेसंबंध, वागणूक, स्त्रियांचे प्रश्न, सांस्कृतिक, सामाजिक असे त्यांच्या आवडीचे लेख विषय आहेत. ब्लॉगमध्येही त्या अनुषंगानेच लेख आहेत. प्रवास आणि संगीत हे सुद्धा त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. विविध इंग्रजी लेख आणि पुस्तके अनुवाद करणे हा त्यांचा छंद आहे.

हिरव्या निसर्गाची भूल कुणाला पडत नाही? फडकेंनाही ती पडली आहे. म्हणूनच हिर्वा रंग, झाडं, पान, फुलं आणि पक्षी हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्याचे प्रतिबिंब ब्लॉगमध्येही पडले आहे. एका रविवारी मुंबईच्या जिजामात उद्यानात जाऊन येण्याचा तो अनुभव काय, पण त्यावर त्यांनी लिहिलेल्याचा थोडा आस्वाद घेऊया.

``परवाचा माझा रविवार इतका हिरवागार होता!! नुसता हिरवागारच नाही तर जोडीला चाफ़्याचा शुभ्र रंग होता. पेल्टोफ़ोरम चा पिवळा सोनेरी मोहोर होता. तिवराच्या लाल गुलाबी नाजुक चांदणीसारख्या फ़ुलांच्या सड्याचा होता. समुद्रफुलाच्या एकाचवेळी प्रशस्त तरीही नाजुक, साध्या तरीही डौलदार आकाराच्या फुलांचा होता. केवड्याच्या रानाचा होता. तामणीच्या निळ्या जांभळ्या बहराचा होता. कैलासपतीच्या तोफ़गोळ्यांसारख्या दिसणार्‍या फ़ळांचा आणि त्याच्या विलक्षण देखण्या नागफ़णी असणार्‍या फ़ुलांचाही होता. दुर्मिळ भद्राक्ष आणि भूर्ज वृक्षाचा होता. सीतेच्या अशोकाचा आणि आसूपालवाचा होता. प्रचंड मोठा विस्तार असणार्‍या प्राचीन वडाचा आणि दहा जणांच्याही कवेत न मावणार्‍या अफ्रिकन बाओबाब वृक्षाचा होता. लोभस अमलताश आणि सुरेख रामधन चंपाचाही होता. सर्वात जास्त देखणेपण ह्या रविवारच्या मी पाहीलेल्या हिरवाईला लाभल ते दुर्मिळ उर्वशीच्या भान हरपून टाकणार्‍या अलौकिक रंगाच्या आणि देखण्या आकाराच्या फुलांमुळे.``

मजा आली की नाही. असाच माझे जडावाचे दागिने नावाचा लेखही वाचनीय आहे. फडकेंचे दागिने म्हणजे दुसरे तिसरे काही नसून पुस्तके आहेत. या पुस्तकांविषयी त्यांनी फार आसुसून लिहिले आहे. रिनोव्हेशनच्या निमित्ताने घर आवरत असताना पुस्तकांची आवरासावर करावी लागली आणि या कामातच पुस्तकांची एक मस्त मैफलच सजली. विविध पुस्तके हाताळताना त्याच्या विषयीच्या आठवणीही दाटून आल्या. हा लेख म्हणूनच मुळातून वाचण्यासारखा आहे. वाचताना फडकेंचा स्वतःचा ग्रंथसंग्रह आणि वाचनाची आवड किती तीव्र आहे, हेही समजते. त्यांच्या या अक्षरधनाविषयी त्यांनी फार छान लिहिलंय. ते त्यांच्याच शब्दात वाचूया.

``काही काही बायका कशा सणासुदीला किंवा ठरावीक महिन्यांनी एकेक ग्रॅम सोने, एकेक वळे वगैरे जमा करत रहातात तशीच अगदी मी हे माझे सारे अक्षरदागिने जमा केलेले. ह्यातले बरेचसे दागिने माहेरहून पण मिळालेले. माझं स्त्रीधनच हे सारं. मी हळूवारपणे एकेक दागिना न्याहाळला. हाताळला. हळूच अंगावर चढवून पहावा त्यातला एखादा, तसं एखाद पुस्तक पानं उघडून थोड चाळलं. काही दागिने कसे रोजच्या वापरातले. काही ठेवणीतले. काही असेच हौस म्हणून खरेदी केलेले, त्या त्या वेळची क्रेझ म्हणून. पण ते नुसतेच दिखावू, शोभेचे ठरले. ते जरा मागच्या कप्प्यात ढकलले. ह्यातला प्रत्येक दागिना खरेदी करतानाच्या आठवणी पण तेव्हढ्याच खास.``

त्यांचा गृहव्यवस्थापिका हा लेखही खुसखुशीत आहे. त्यांच्या मते घरात सुस्त, त्रस्त, व्यस्त आणि मस्त अशा प्रकारच्या गृहव्यवस्थापिका म्हणजे गृहिणी असतात. त्यांची वैशिष्ट्ये त्यांनी अगदी वेधक शब्दांत टिपली आहेत. याशिवाय भूतानभेटीवर आधारीत त्यांचा लेख फारच छान आहे. हे नुसतं प्रवासवर्णन नाही. तिथली संस्कृती आणि होणारे बदल टिपणारा हा लेख आहे. एका पत्रकाराची जागृत दृष्टि त्यातून दिसून येते. म्हणूनच साठच्या दशकापर्यंत अस्पर्शित असणारा हा देश त्यानंतर आधुनिकतेच्या वाटेवर चालताना किती वेगात जातो आहे, हे लिहिताना लेखिकेची लेखणीही कातर झाल्यासारखी वाटते. तिथल्या निसर्गाचा रंगही त्यांनी फार छान टिपला आहे.

नथ या देशी शब्दाचा अर्थही 'बैलाच्या नाकातली वेसण' असाच आहे. पेशवेकाळापर्यंत येथेही नथ म्हणजे सोन्याचे एक कडे व त्याला अडकवलेले काही मोती असेच या दागिन्याचे स्वरुप होते.
नथ या विषयावरचा त्यांचा लेखही वाचनीय आहे. स्त्री सौंदर्याचे प्रतीक मानली जाणारी नथ ही वास्तविक गुलामगिरीचे प्रतीक कसे आहे, ते त्यांनी विविध उदाहरणातून छान सांगितलं आहे. त्यांच्या मते इस्लामी परंपरेतून नथ आपल्याकडे आली. तिकडे मुस्लिमांमध्ये उंटाच्या नाकात वेसण घातली जात असे. त्यातूनच तसा दागिना स्त्रियांसाठी केला जाऊ लागला. त्याला बुलाक असे म्हणतात. ही बुलाक म्हणजेच आपल्याकडे नथ. ही परंपरा आपली नव्हेच हे सांगताना, अजिंठा, वेरूळच्या लेण्यातील स्त्रीशिल्पांमध्ये नाकात नथ नसल्याचा पुरावाही त्या देतात. त्यांच्या मते बहमनी काळात हा दागिना आपल्याकडे आला आणि मराठी स्त्रीच्या सौंदर्याचा एक बिंदू ठरला. या श्रृंखलेत ब्रिटिश कौन्सिलच्या लायब्ररीतील निवांत दुपारचे वर्णन करणारा ललित लेखही अतिशय तरल शब्दांत उतरला आहे. एका दुपारी पाऊस कोसळत असताना अचानक या लायब्ररीत नामांकित चित्रकारांच्या चित्रांचे पुस्तक हाती लागते आणि ती दुपार अगदी मनात रूतून बसणारी ठरते, याचे वर्णन छान आहे. याशिवाय तरीही शब्दातच, नस्तं प्रदर्शन हेही लेख वाचनीय आहे.

जालावर भटकत असताना या ब्लॉगवर यायलाही हरकत नाही. शर्मिलाताईंनी लिहिण्यात सातत्य ठेवलं तर वाचायलाही आणखी मजा येईल.

ब्लॉगचे नाव- शमा-ए-महफि
ब्लॉगर- शर्मिला फडके
ब्लॉगचा पत्ता-http://shamaaemahafil.blogspot.com/

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा