मुख्यमंत्री शिंदे लबाड नाही ; मनोज जरांगेंना संभाजी भिडेंनी काय सांगितलं?

बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (08:21 IST)
जालन्यातील अंतरवाली गावात गेल्या १५ दिवसांपासून मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, तोपर्यंत तसूभरही मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दुसरीकडे सरकारकडून जरांगे यांची मनधरणी सुरू आहे. आज राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेण्यासाठी जालन्यात दाखल झालं.
 
या शिष्टमंडळात मंत्री संदीपान भुमरे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह संभाजी भिडे देखील आहेत. यावेळी संभाजी भिडे यांनी आम्ही मराठा आरक्षणाचा समस्या संपेपर्यंत तुमच्यासोबत आहे, तुम्ही मागे वळून पाहायचं नाही. जसे पाहिजे तसे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दिला.
 
राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लबाड नाहीत. देवेंद्र फडणवीसांच्या अंगी लुच्चेपणा नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असतील, तरी कायदेशीर माणूस आहेत, माझं असं मत आहे की, तुम्ही उपोषण थांबवावं, अशी विनंती संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे. त्याचबरोबर राजकारणी जो शब्द देतील, तो शब्द पाळून घ्याचं काम माझं आहे, मराठ्यांना आरक्षण नक्कीच मिळेल, असा विश्वासही मनोज जरांगे पाटील यांना दिला. दरम्यान, संभाजी भिडे यांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे उपोषण मागे घेण्याबाबत नेमकी काय भूमिका घेणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती