रेवडीचे पेशवेकालीन ग्रामदैवत श्री खंडोबा

शुक्रवार, 6 डिसेंबर 2024 (07:30 IST)
पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान, शिखरावरील सोनेरी कळसाचे कोरेगाव तालुक्यातील रेवडी गावचे श्री क्षेत्र मल्हारी म्हाळसाकांत मंदिर हे पेशवेकालीन चिरेबंदी दगडी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. 
 
पाली, जेजुरी नंतर श्री खंडोबाचे महात्म्य असणारे रेवडीचे हे ग्रामदैवत. या मंदिराविषयी शिवराज म्हेत्रे, मोहन मोरे आदी ग्रामस्थांनी माहिती दिली. रेवडी या गावाचे मूळ नाव रेवापूर आहे. रेवापूरचे कुलदैवत श्री खंडोबा हे सुळक्याच्या डोंगरावरील विठ्ठलखडी नावाच्या छोट्या टेकडीवर आहे. या ठिकाणी छोट्या देवळात लहान पितळी टाक (मूर्ती) आहे. फार पूर्वी मौजे परतवडी येथील एक भाविक श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी या डोंगरावर येत असे. वयोमानपरत्वे तो थकला. एक दिवस तो या डोंगरावर नेहमीप्रमाणे दर्शनाला आला आणि हात जोडून देवाला म्हणाला, "मी आता म्हातारा झालो आहे, तुझ्या सेवेसाठी, दर्शनासाठी मला येता येणार नाही आपली भेट ही शेवटची आहे. तुझी कृपा असू दे". डोळ्यात पाणी आणून भक्ती भावाने तो मागे फिरला, इतक्यात त्याची भक्ती आणि श्रद्धा पाहून देव प्रसन्न झाले आणि तुला काय वरदान हवे ते माग असे म्हणाले. त्यावेळी तुझी अखेरची सेवा माझ्या हातून घडू दे, अशी मागणी त्यांनी केली. देव म्हणाले, ठीक आहे. तु पुढे चल, मी तुझ्या पाठीमागून येतो. परंतु तू ज्या ठिकाणी पाठीमागे वळून पाहशील त्याचठिकाणी मी थांबेन, या अटीवर देव त्याच्या पाठीमागे गेले. पावसाळ्याचे दिवस होते, मोठा पाऊस पडत होता. चालत चालत एक मैल अंतरावर वसना नदीकाठी आल्यावर या भक्ताच्या मनात खरोखरच देव आपल्या पाठीशी येतोय की नाही अशी शंका आली आणि त्याने पाठीमागे पाहिले आणि पाठीमागून येणारे देव तेथेच थांबले. तेव्हापासून डोंगरावर असणारे देव खाली आले. कालांतराने रेवापूर गावाचे नाव रेवडी असे झाले, अशी एक आख्यायिका ऐकावयास मिळते. 
 
श्री खंडोबा देवाच्या यात्रेच्‍या ठिकाणी देवाची हळद लागते. पाली येथील यात्रेत लग्न सोहळा होतो. तर जेजुरीत देवाची मिरवणूक (वरात) निघते. हे मुख्य कार्यक्रम अशा तीन ठिकाणी होतात. हा कार्यक्रम मार्गशीष शुद्ध प्रतिप्रदेला असतो आणि या दिवसापासून यात्रेला प्रारंभ होतो. रेवडी येथील श्री खंडोबाचे मदिर चिरेबंदी दगडी बांधकाम भक्कम असून अत्यंत देखणे असे आहे. या मंदिरावर सुवर्ण कळस चढवलेला आहे. देवालयाभोवती भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीमधून वरील बाजुला जाणारे दगडी जिने आहेत. शेजारी यात्रेकरुंसाठी लहान मोठ्या ओवऱ्या बांधलेल्या आहेत. त्याचे नक्षीकाम सुबक आणि सुंदर आहे. अखंड दगडाचा हत्ती सुंदर कोरीव कामासह बांधून चौथऱ्यावर बसवलेला आहे. त्यावरही सुंदर कळसाचे बांधकाम केले आहे. हे बांधकाम सन 1785 पूर्ण झाले. दोन्ही बाजूस दगडी दोन दिपमाळ आहेत. याच ठिकाणी कासव आहे. देवालयाच्या आवारात मुख्य मंडपासमोर दुसरे दगडी कासव आहे. यात्रे दिवशी तसेच विजया दशमी अर्थात दसऱ्यादिवशी या ठिकाणी मोठा सोहळा असतो. 
 
पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या भक्तीभावाने या रेवडीच्या यात्रे दरम्यान श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येतात. पेशवेकालीन बांधकामाचा उत्तम नमुना असणाऱ्या या मंदिराला किमान एकदा तरी भेट द्यायलाच हवी... 
 
- प्रशांत सातपुते

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती