महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचे नाव निश्चित होते. मात्र ऐनवेळी त्यांनी प्रकृतीचे कारण देत निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. भारतीय जनता पक्षाकडून येथून राज्यसभा सदस्य उदयनाराजे भोसले यांचे नाव निश्चित मानले जात आहे. नुकतेच ते दिल्लीवारी करुन आले आहेत. महाविकास आघाडी जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे आहे. त्यांच्या विद्यमान खासदारांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यामुळे शरद पवारांपुढेही पेच निर्माण झाला आहे. समोर उदयनराजेंसारखा तगडा उमेदवार असल्यामुळे तेवढाच तुल्यबळ उमेदवार महाविकास आघाडीला द्यावा लागणार आहे. त्यासाठी आज कराडमध्ये काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात एक तास बंद दाराआड चर्चा झाली.
खासदार श्रीनिवास पाटील यांनी ऐनवेळी नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीला उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून येथे शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे. तर दुसरं नावही तेवढचं महत्त्वाचं मानलं जात आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सातऱ्यातून तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.