देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे.प्रत्येक पक्ष प्रचारात व्यस्त आहे. जवळपास आता सगळ्याच जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. भाजपा, अजित पवार गट, शिंदे गट आणि ठाकरे गटाने स्टार प्रचारकांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
आज शरद पवार यांच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली. यामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह ४० प्रचारकांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे.
आतापर्यंत पाच उमेदवारांची घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके, वर्ध्यातून अमर काळे आणि दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच माढा आणि सातारा लोकसभेचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाहीत.