Gopalkala 2023 गोपाळकाला म्हणजे श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रातिनिधीत्व करणारा पदार्थ

बुधवार, 6 सप्टेंबर 2023 (15:21 IST)
Gopalkala जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. दहीहंडी आणि कृष्णजन्माष्टमी यांच्या निमित्ताने हा प्रसाद तयार केला जातो. श्रीकृष्णजयंती व्यतिरिक्त वर्षभरात जेव्हाजेव्हा काल्याचे कीर्तन होते तेव्हा तेव्हा त्या कीर्तनानंतर गोपालकाला होतो. म्हणूनच त्या कीर्तनाला "काल्याचे" कीर्तन म्हणतात. ज्ञानेश्वरीचे किंवा दासबोधाचे पारायण, किंवा अनेक दिवस चालणाऱ्या अशाच एखाद्या ग्रंथवाचनानंतर, अथवा कीर्तन महोत्सवामध्ये शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते. वारकरी संप्रदायात वारीची सांगता गोपाळकाला करूनच होते.

कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे. श्रीकृष्णाने व्रज मंडळात गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्य पदार्थांचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे.
 
गोपाल म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो. काला म्हणजे एकत्र मिळविणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ. हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत असे मानले जाते. 
 
'गोपाळकाला' हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रातिनिधीत्व करतो. काल्यातील प्रमुख घटक
पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्‍तीचे निदर्शक आहेत.
पोहे : वस्तूनिष्ठ गोपभक्‍तीचे प्रतीक (काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी)
दही : वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्‍या मातृभक्‍तीचे प्रतीक
दूध : गोपींच्या सहज सगुण मधुराभक्‍तीचे प्रतीक
ताक : गोपींच्या विरोधभक्‍तीचे प्रतीक
लोणी : सर्वांच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुणभक्‍तीचे प्रतीक 
 
या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात.
 
इतर फायदे
शरीर व मन यांना पोषक : या दिवशी वायुमंडल आपतत्त्वाने भारीत असल्याने देहातील पंचप्राणांच्या वहनाला पोषक असल्याने मनाला उत्साह देणारे व देहाची कार्यक्षमता वाढवणारे असते.
 
सर्व सृष्टीच आनंदी असणे : वायुमंडलातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने वृक्षचरही चैतन्ययुक्‍त लहरी ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अत्यंत संवेदनशील बनल्याने सर्व सृष्टीच आनंदी असते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती