इस्रायलला हमासची जी भुयारं नष्ट करायची आहेत, त्यांची संपूर्ण गोष्ट काय आहे?

शनिवार, 14 ऑक्टोबर 2023 (11:30 IST)
डेव्हिड ग्रिटेन
इस्रायलचे म्हणणे आहे की ते हमासने तयार केलेल्या गाझामधील भूमिगत भुयारांचे नेटवर्क (जाळे) लक्ष्य करतायत.
 
हमासने शनिवारी (7 ऑक्टोबर) इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून गाझाला सातत्याने लक्ष्य केलं जातंय. पण आता त्यांचे लक्ष्य हमास वापरत असलेली भुयारं आहेत.
 
गुरुवारी (12 ऑक्टोबर) इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितलं, "गाझाच्या पहिल्या थरावर (भूपृष्ठावर) सामान्य नागरिक राहतात. त्याच वेळी, त्याच्या खाली दुसरा थर (भूमीगत) आहे जो हमास वापरतो. सध्या आम्ही गाझामधील जमिनीखालच्या त्या दुसऱ्या थराला लक्ष्य करतोय."
 
इस्रायली प्रवक्त्याने म्हटलंय की, "हे सामान्य लोकांसाठी बांधलेले बंकर नाहीत. ते फक्त हमास आणि इतर दहशतवादी संघटनांसाठी आहेत जेणेकरून ते इस्रायली रॉकेटपासून वाचू शकतील आणि त्यांच्या कारवायांची आणखी करू शकतील जेणेकरून इस्रायलवर हल्ले सुरूच राहतील."
 
गाझामधील भुयारांच्या नेटवर्कच्या विस्ताराचा अंदाज बांधणे खूप कठीण काम आहे. इस्रायल हमासच्या या भुयारांना ‘गाझा मेट्रो’ म्हणतो. असं मानलं जातं की ही भुयारं संपूर्ण गाझामध्ये पसरलेले आहेत.
 
ही भुयारं किती खोल आहेत?
2021 मध्ये झालेल्या संघर्षानंतर इस्रायली लष्कराने गाझामध्ये पसरलेली 100 किमी लांबीची भुयारं नष्ट केल्याचं सांगितलं होतं.
 
पण हमासने दावा केला होता की त्यांनी गाझामध्ये 500 किमी लांबीची भुयारं बांधली आहेत आणि इस्रायलच्या हल्ल्यात फक्त 5 टक्के भुयारं उद्धवस्त झाली आहेत.
 
संपूर्ण लंडन शहरात पसरलेली भूमिगत मेट्रो केवळ 400 किलोमीटर आहे. यावरून तुम्हाला या आकड्यांचा (बोगद्यांचा विस्तार) अंदाज येईल.
 
2005 मध्ये इस्रायली सैन्याने आणि ज्यू स्थायिकांनी गाझामधून माघार घेतली. त्यानंतर तिथे भुयारं बांधण्याचं काम सुरू झालं.
 
पण दोन वर्षांनंतर हमासने गाझावर ताबा मिळवला आणि त्यानंतर भुयारांचं जाळं मोठ्या प्रमाणावर विस्तारू लागलं.
 
हमास सत्तेवर येताच, इस्रायल आणि इजिप्तने त्यांच्या सीमारेषेवरून वस्तू आणि लोकांच्या येण्या-जाण्यावर बंधने आणली.
 
या कृतीला प्रतिक्रिया म्हणून हमासने भुयारांवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली.
 
गाझामध्ये कधीपासून भुयारं आहेत?
एकेकाळी इजिप्त आणि गाझा यांच्या सीमेखाली सुमारे 2,500 भुयारं होती. या भुयारांमधूनच हमास आणि इतर कट्टरतावादी संघटनांना इजिप्त वस्तू, इंधन आणि शस्त्रे पाठवायचा.
 
पण 2010 मध्ये इस्त्रायलने इजिप्तच्या सीमारेषेवर घातलेली बंधनं कमी केल्यावर ही तस्करीही कमी होऊ लागली. इस्रायलने सीमारेषेद्वारे आयातीवरील निर्बंध कमी केले.
 
इजिप्तने त्यानंतर सीमेखाली बांधलेले भुयारं नष्ट केले.
 
नंतर, हमास आणि इतर संघटनांनी इस्रायली सैन्यावर हल्ला करण्यासाठी गाझामध्ये भुयारं बांधली.
 
2006 मध्ये, अतिरेक्यांनी इस्रायलच्या सीमारेषेखालून जाणा-या एका भुयारातून इस्रायलमध्ये घुसून दोन सैनिकांची हत्या केली होती.
 
गिलाड शालित नावाच्या सैनिकाचे अपहरण करून त्याला पाच वर्षे कैदी बनवून ठेवण्यात आलं होतं.
 
2013 मध्ये इस्रायली सैन्याने गाझा पट्टीपासून त्यांच्या एका गावापर्यंत 18 मीटर खोल आणि 1.6 किलोमीटर लांबीचं भुयार शोधलं होतं.
 
त्याच्या पुढच्या वर्षी इस्रायलने गाझामध्ये घुसून ही भुयारं नष्ट करण्याची मोहीम सुरू केली.
 
लष्कराने त्या काळात 30 भुयारं उद्ध्वस्त केले होते. मात्र अतिरेक्यांच्या हल्ल्यात चार सैनिकही मारले गेले होते.
 
हमासची ही भुयारं कशी आहेत?
 
भूगर्भातील युद्धांचे तज्ज्ञ असलेल्या डॅफ्ने रिचमंड-बराक या इस्रायलच्या रीचमन विद्यापीठात शिकवतात.
 
त्या म्हणतात, "सीमापार भुयारं अतिशय मूलभूत असतात, त्यांना कोणतीही तटबंदी नसते. त्यापैकी बहुतेक फक्त एकदाच वापरण्यासाठी खोदण्यात येतात. आणि इस्रायली सैनिकांवर हल्ला करणे हा त्यामागचा उद्देश असतो.
 
"परंतु गाझाच्या आत असलेल्या भुयारांचा उद्देश वेगळा आहे. हमासला तिथे दीर्घकाळ राहायचंय. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केलेल्या असतात जेणेकरून तिथे दैनंदिन आयुष्य जगता येईल."
 
"तिथे त्यांचे नेते लपून बसतात. त्यांची कमांड अँड कंट्रोल सिस्टीमही तिथेच आहे. वाहतुकीशिवाय, कम्यूनिकेशनसाठीही या भुयारांचा वापर केला जातो. त्यामध्ये वीज, लाईट आणि अगदी रेल्वे ट्रॅकचीही सोय आहे. तुम्ही त्यातून इकडेतिकडे फिरू शकता."
 
भुयारं खोदण्यात हमासने नैपुण्य मिळवलं असल्याचं त्या सांगतात. ही कला ते सीरियातील बंडखोर हल्लेखोरांकडून शिकलेत.
 
गाझामधील भुयारं जमिनीपासून 30 मीटर खाली असल्याचं सांगितलं जातं. आणि त्यात प्रवेश करण्यासाठी घरांच्या तळघरांमधून मार्ग आहेत.
 
मशिदी, शाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणांहूनही भुयारांमध्ये प्रवेश करता येतो.
 
भुयारांच्या या जाळ्याच्या बांधकामाचा त्रास स्थानिकांनाही सहन करावा लागतो.
 
आंतरराष्ट्रीय मदतीद्वारे भुयारांची निर्मिती?
इस्रायलचा आरोप आहे की, हमासने गाझामधील लोकांना मदत करण्यासाठी दिलेली कोट्यवधींची आंतरराष्ट्रीय मदत स्वतःच्या फायद्यासाठी वापरली आहे.
 
शनिवारी झालेल्या हमासच्या हल्ल्यात यापैकी काही भुयारांचा वापर झाला असण्याची शक्यता आहे.
 
एका बातमीनुसार, काफर आझा येथे एक भुयार सापडलं होतं, जिथे डझनभर इस्रायली नागरिक मारले गेलेले.
 
याची खातरजमा झाल्यास हे भुयार इस्रायलने बनवलेल्या भूमिगत अँटी-टनल डिटेक्शन सेन्सर्सपेक्षा खोल असेल.
 
इस्रायलने 2021 मध्ये हे डिटेक्शन सेन्सर बनवले.
 
असं घडलं तर ही अतिशय धक्कादायक बाब असेल, असं डॉ. रिचमंड-बराक म्हणतात. पण हे देखील तितकंच खरं आहे की कोणतंही भुयार हे पूर्णपणे डिटेक्शन सेन्सरयुक्त असू शकत नाही.
 
त्या म्हणतात, “सर्वसामान्यांना माहित नसणारी काही भुयारं असतील. या भूमिगत नेटवर्कच्या काही भागांबद्दल कोणालाही कसलीही माहिती नाहीए."
 
भुयारं उद्ध्वस्त करताना सर्वसामान्य नागरिकांचा जीवही जाणार आहे. यामध्ये इस्रायली सैनिकांचाही समावेश असू शकतो.
 
शनिवारपासून सुरू झालेल्या इस्रायलच्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 1,500 पॅलेस्टिनी मरण पावले आहेत.
 
डॉ. रिचमंड-बराक म्हणतात, “हमास लोकांना ढाल बनवण्यात हुशार आहे. हल्ला होणार आहे हे लक्षात येताच ते सामान्य जनतेचा ढाल म्हणून वापर करतील. याच कारणास्तव इस्रायलला अनेकदा हल्ले थांबवावे लागलेत."
 
"हमास यावेळी इस्रायली आणि अमेरिकन ओलिसांचा ढाल म्हणून वापर करू शकतो."
 
इस्रायलला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल?
2021 मधील संघर्षादरम्यान गाझा शहरातील तीन निवासी इमारती इस्रायली हल्ल्यात कोसळल्या आणि 42 लोकांना आपला जीव गमवावा लागला.
 
तेव्हा इस्रायली लष्कराने त्यांचे लक्ष्य भूमिगत भुयारं असल्याचं सांगितलं होतं.
 
भुयारांच्या नेटवर्कमुळे इस्रायली लष्कराच्या तंत्रज्ञानाची आणि गुप्तचर यंत्रणेची ताकदही कमी होणार आहे. शहरी युद्ध हे एक वेगळंच आव्हान असतं.
 
डॉ. रिचेमंड-बराक म्हणतात, “हमासकडे या बोगद्यांच्या नेटवर्कमधे दारूगोळा भरण्याच्या खूप संधी आहेत. ते इस्रायली सैनिकांना बोगद्यात घुसायला देऊन स्फोट घडवून आणण्याची पूर्ण शक्यता आहे.”
 
"हमास अचानक हल्ला करून इस्रायली सैनिकांचे अपहरण देखील करू शकतो."
 
बोगद्यांची माहिती मिळाल्यास इस्त्रायली हवाई दल त्यांच्यावर बॉम्बचा वर्षाव करू शकतं. बंकर उद्धस्त करणारे हे बॉम्ब जमिनीत खोलवर जातात.
 
मात्र, यामुळे काही निष्पाप लोकांचा बळीही जाऊ शकतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती