यूट्यूब पाहून, पुस्तकं वाचून निर्जन जंगलात राहायला गेले आणि दोन बहिणींबरोबर जे काही झालं-
रविवार, 30 जुलै 2023 (16:52 IST)
अमेरिकेतल्या कोलोराडो स्प्रिंग्स परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. तिथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. आपलं रोजचं आयुष्य सोडून जंगलात जाऊन राहण्याचा निर्णय या व्यक्तिंनी घेतला होता.
अतिशय दुर्गम अशा डोंगरी भागात एकाच कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
आपल्या रोजच्या जगण्यापलिकडे जात, त्यांनी एक पूर्णपणे वेगळी जीवनशैली स्वीकारण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं पर्यवसान दुर्दैवी घटनेत झालं.
निसर्गाच्या सान्निध्यात शांततेने आयुष्य जगण्याच्या इच्छेने ते रॉकी पर्वतरांगातील एका दुर्गम भागात गेले.
पण तिथल्या नैसर्गिक, भौगोलिक अडचणींमुळे त्यांना प्राण गमवावे लागले.
गनिसन नॅशनल फॉरेस्ट इथल्या गोल्ड क्रीक कँपग्राऊडजळ गेलेल्या एका हायकरला 9 जुलैला दोन कुजलेले मृतदेह सापडले.
तिथून तपास सुरू झाला.
रिबेकाला जगात ज्या पद्धतीने गोष्टी घडत होत्या, ते पटत नव्हतं.
त्यामुळेच ती, तिची बहीण क्रिस्टीन आणि मुलगा यांनी यातून बाहेर पडून एकांतात राहण्याचा निर्णय घेतला.
काही दिवसांपूर्वी वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रिबेकाची दुसरी बहीण झारा हिने याबद्दल सांगितलं.
क्रिस्टीन आणि रिबेका या दोघींचीही वयं चाळीशीच्या आसपास होती. त्यांनी हा निर्णय घेतला खरा, पण त्यांनी त्यांचं घर सोडून बाहेरचं जग कधी पाहिलंच नव्हतं.
त्यामुळे मग यासंबंधीच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यांनी यूट्यूबसारख्या सोशल मीडियाचा आधार घेतल्या. यूट्यूब आणि इतर साइट्सवरील व्हीडिओ पाहून त्यांनी दुर्गम, मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी कसं राहायचं हे जाणून घेतलं.
झारानेच याबद्दल सांगितलं.
मृत्यूचं नेमकं कारण काय?
“व्यावहारिक जगापासून दूर कसं जायचं आणि जिथे मनुष्यवस्ती नाहीये याचं ज्ञान तुम्हाला व्हीडिओ पाहून मिळत नाही, तसे व्हीडिओही सापडत नाहीत फारसे.”
त्यामुळेच अशापद्धतीने राहण्याचा कोणताही अनुभव नसताना हे लोक मनुष्य वस्तीपासून दूर जाऊन राहायला जरी लागले, तरी त्यांना ते कठीण गेलं.
“नवीन वातावरणासोबत जुळवून घ्यायची त्यांची तयारी नसावी, तसंच पुरेशा आहाराअभावी त्यांची उपासमारही झाली असेल. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा,” असं झारा यांनी कोलोराडो स्प्रिंग्स गॅझेटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
या मृत्यूंचा तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मृत्यूचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. जोपर्यंत सर्व तपासण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही नेमकं कारण स्पष्ट करू शकणार नाही.
तंबूत सापडले मृतदेह
“तंबूत दोन मृतदेह सापडले,” तपास अधिकारी मायकल बर्नेस सांगतात.
तिसरा मृतदेह तंबूच्या बाहेर सापडला. जवळपास 9,500 फूट उंचीवर (2,900 मीटर) हा मृतदेह सापडला.
तीन मृतांपैकी मुलगा हा अल्पवयीन असल्यामुळे त्याची ओळख लपवण्यात आली आहे.
हे तिघेही जण त्यांनी जिथे राहण्याची जागा निश्चित केल होती, तिथे घर बांधत असल्याचं दिसत होतं. पण त्यानंतर हिवाळा सुरू झाला, असं बर्नेस यांनी एपी न्यूजला सांगितलं.
त्यामुळे त्यांनी आपले घर बांधण्याचे प्रयत्न सोडून दिले आणि ते तंबूत राहायला गेले.
ते तंबूतही किती काळ तग धरू शकले असते, असं बर्नेस यांनी म्हटलं. कारण हिवाळ्याची सुरुवात होता होताच त्यांनी प्राण गमावले.
'एकही शब्द न ऐकणाऱ्या बहिणी'
“त्यांच्या सामानात जंगलात आणि पर्वतीय प्रदेशात अन्न कसं मिळवावं, टिकून कसं राहावं याबद्दलची पुस्तकं मिळाली. पण त्यांच्याकडे भरपूर किराणाही दिसला,” बर्नेस सांगतात.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात रिबेका, तिचा मुलगा आणि क्रिस्टीन हे तिघेही जण झाराकडे आले होते.
त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या या नव्या प्रवासाबद्दल सांगितलं आणि झाराचा निरोप घेतला.
“त्यांचा हा प्लॅन ऐकून आम्हाला धक्काच बसला. मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्या आयुष्यापासून दूर जाण्यासाठी काहीही करायला तयार होत्या.”
जून, जुलै आणि ऑगस्ट हे स्प्रिंग्समध्ये उन्हाळ्याचे दिवस असतात. पण त्या भागात हिवाळा एक महिना आधीच सुरू झाला.
अधिकारी सांगतात की, या बहिणींनी याची कल्पना केली नव्हती. त्यामुळे हिवाळा सुरू झाल्यावर त्यांच्या अडचणी सुरू झाल्या. त्यांना घराचं बांधकामही पूर्ण करताही आलं नाही आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या गरजाही पूर्ण झाल्या नाहीत.