एक डोळा गमावला, सातवेळा इस्रायली हल्ल्यातून वाचला, हमासचा हा लष्करी कमांडर कोण आहे?
बुधवार, 17 जुलै 2024 (20:31 IST)
इस्रायलने शनिवारी 13 जुलैला गाझा शहरातल्या खान युनिसवर हवाई हल्ला केला. यामध्ये हमासचा लष्करी नेता मोहम्मद देफ इस्त्रायलच्या टार्गेटवर होता, असं इस्रायलच्या लष्काराचं म्हणणं आहे.हमास संचलित आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, इस्रायलने अल-मवासी भागात हल्ला केला. यामध्ये विस्थापितांच्या छावणीतील डझनभर लोक ठार झाले.
पण, इस्रायल लष्करानं AFP सोबत बोलताना हे वृत्त फेटाळून लावलं.
आमच्या माहितीनुसार तिथं कुठलेही नागरिक नव्हते, फक्त हमासचे दहशतवादी होते, असं इस्रायलने म्हटलं.
हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी 14 जुलैला हवाई हल्ल्यात खान युनिस ब्रिगेडचा कमांडर रफा सलामा ठार झाल्याचं इस्रायल लष्कारानं जाहीर केलं. हाच सलामा 7 ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार असून देफचा निकटवर्तीय सहकारी होता, असं इस्त्रायल लष्काराचं म्हणणं आहे.
शनिवारी (13 जुलै) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देफ मारला गेला याची कुठलीही खात्री नसल्याचं म्हटलं.
तसेच इस्रायल भयंकर हल्ल्याची तीव्रता लपविण्याचा प्रयत्न करतेय, असा आरोप हमासने केला आहे.
देफ इस्रायलच्या टार्गेटवर का आहे?
अल कसाम ब्रिगेड्सचे नेतृत्व करणारा देफ हा अनेक दशकांपासून इस्रायलच्या मोस्ट वॉन्टेड व्यक्तींपैकी एक आहे. अनेक नागरिक आणि सैनिकांच्या हत्येसाठी इस्त्रायली अधिकाऱ्यांनी देफला जबाबदार धरले आहे.
त्याचे खरे नाव मोहम्मद दायब इब्राहिम अल-मसरी असून त्याचा जन्म 1965 मध्ये खान युनिस या निर्वासितांच्या छावणीत झाला होता.
देफ अत्यंत गरीब कुटुंबात वाढला असून वडिलांसोबत कताई आणि गाडीचे आसन बनविण्याचे काम करायचा. त्याने पोल्ट्री फार्म काढला होता आणि ड्रायव्हर म्हणून काम केले आहे.
देफ म्हणजे पाहुणा. इस्रायलने पाळत ठेवू नये म्हणून तो सारखं त्याचं राहण्याचं ठिकाण बदलत असतो. त्यावरूनच त्याला देफ हे नाव पडलं.
त्याने गाझा इस्लामिक विद्यापीठातून भौतिकशास्त्र, रसायनशासत्र आणि जीवशास्त्राचा अभ्यास केला आणि विज्ञानामध्ये पदवी मिळवली.
तो विद्यापीठाच्या मनोरंजन समितीचा प्रमुख होता. विद्यापीठात शिक्षण घेत असताना तो मुस्लीम ब्रदरहूड गटात सहभागी झाला. 1987 मध्ये हमास गटाची स्थापना झाली त्यावेळी देफ या गटात सहभागी झाला.
इस्रायलच्या प्रशासनानं त्याला 1989 मध्ये अटक केली. हमासच्या लष्करासाठी काम करण्याच्या आरोपावरून तो 16 महिने तुरुंगात होता.
अल कसाम ब्रिगेड या हमास लष्काराच्या शाखेची स्थापना सुद्धा देफने केली. वेस्ट बँक इथल्या अल कासिम ब्रिगेडच्या शाखेची स्थापना झाली तेव्हा त्याचं काम देफनं पाहिलं.
इस्रायलच्या हल्ल्यात अल कासिम ब्रिगेडचा प्रमुख सालाह शेहदेहचा मृत्यू झाल्यानंतर 2002 मध्ये देफला प्रमुख पद मिळालं.
अमेरिकेनं 2015 मध्ये देफला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकलं होतं. डिसेंबर 2023 मध्ये युरोपियन युनियनने त्याला दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकलं.
इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाचं मूळ जाणून घ्या
मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
'या' कारणांमुळे काही देशांसाठी पॅलेस्टाईन अजूनही 'स्वतंत्र राष्ट्र' नाहीय
इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाचा जवळपास 100 वर्षांचा इतिहास काय आहे?
हमासने इस्रायलवरील हल्ल्याला 'ऑपरेशन अल अक्सा' का म्हटलं? या मशिदीचा इतिहास काय आहे?
इस्रायल, पॅलेस्टाईन आणि बाल्फोर जाहीरनामा - ब्रिटिशांचे ते 67 शब्द वादाचं मुख्य मूळ
देफवर कोणते आरोप आहेत?
1996 मध्ये इस्रायलच्या बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 10 इस्रायली नागरिक मारले गेले होते. या बॉम्बस्फोटाचे नियोजन देफनं केल्याचा आरोप आहे. तसेच 1990 च्या दशकात इस्रायलच्या तीन सैनिकांना पकडून ठार केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.
हमासचा गाझामधील राजकीय नेता याहया सिनवारसोबत देफ 7 ऑक्टोबरच्या हमासच्या हल्ल्याचा सूत्रधार असल्याचं बोललं जातंय.
इतकंच नाहीतर कसाम रॉकेट हे हमासचे प्रमुख शस्त्र आणि गाझामध्ये खोदलेल्या बोगदे यामध्ये त्यानं मुख्य भूमिका बजावल्याचं सांगितलं जातंय.
इस्रायली हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी देफ या बोगद्यांमध्ये लपून बसलो आणि इथूनच हमासच्या हल्ल्यांना निर्देशित करतो, असा दावा केला जातो.
तावडीत न सापडणारी व्यक्ती
देफ काहीसा लपून राहणारा गूढ व्यक्ती म्हणून ओळखला जातो.
पॅलेस्टिनी लोक त्याला कधी 'द मास्टरमाईंड' म्हणून संबोधतात तर इस्रायली त्याला 'कॅट विथ नाईन लाईव्ज' (नऊ जीवदानं असलेली मांजर) म्हणजे वारंवार हातून निसटून जाणारी व्यक्ती म्हणून संबोधतात.
2001 पासून देफच्या हत्येचे सातवेळा प्रयत्न झाले. पण, तो सातही वेळा या हल्ल्यांमधून स्वतःचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरला.
2002 मध्ये त्याच्यावर सर्वात मोठा हल्ला झाला होता. यामधून देफचा जीव वाचला, पण त्याने एक डोळा कायमचा गमावला. त्याने एक पाय आणि एक हातही गमावला असून त्याला नीट बोलता सुद्धा येत नाही, असं इस्रायलचं म्हणणं आहे.
इस्रायलने 2014 मध्ये गाझा पट्टीवर हल्ला करून देफला ठार करण्याचा प्रयत्न केला. पण, देफला स्वतःचा जीव वाचविण्यात यश आलं. मात्र त्या हल्ल्त त्याची पत्नी आणि त्याच्या दोन मुलांचा जीव गेला.
पण वारंवार अशा हल्ल्यांनंतरही तो इस्रायलच्या हातातून निसटून जाऊ शकला, याचं कारण आपला माग काढता येईल असं काही तो मागे ठेवत नाही. तंत्रज्ञानाच्या बाबतीतही तो सतर्क दिसतो.
देफचे फक्त तीन फोटो उपलब्ध आहेत. एक खूप जुना, दुसरा मास्क घातलेला आणि तिसरा त्याच्या सावलीचा फोटो.