एकनाथ शिंदें :- राणे, राज यांच्यानंतर उद्धव यांचे पीए मिलिंद नार्वेकरांच्या घरी भेट
सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (09:13 IST)
सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवात शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरती डिप्लोमसी सुरू केली आहे. या माध्यमातून त्यांनी अनेक राजकीय डावपेच यशस्वी करण्याचा निर्धार केल्याचे दिसतो. म्हणूनच शिंदे हे विविध नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी, आरतीसाठी जात आहेत. आता त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्या घरी भेट दिली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या या गणपती आरती डिप्लोमसीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिवसेनेच्या अनेक दिग्गजांच्या घराघरातही एकनाथ शिंदे पोहोचले. मनोहर जोशी, उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर आदी नेत्यांच्या घरी त्यांनी गणपतीचे आशीर्वाद घेतले. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे या शिवसेनेच्या माजी नेत्यांच्या घरीही शिंदे यांनी भेट दिली.
दुसरीकडे माजी मंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उद्धव ठाकरे गटाकडूनही अशीच मुत्सद्देगिरी दिसून येत आहे. शिवसेनेचे अनेक आमदार आणि माजी नगरसेवकांच्या घरी आदित्य सध्या भेटी देत आहेत. याद्वारे त्यांनी पक्ष बांधणीवर भर दिल्याचे दिसून येत आहे.
राणेंच्या घरी भेट दिल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, “मी आज येथे दर्शनासाठी आलो आहे. भेटीदरम्यान अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांनी (नारायण राणे) मुख्यमंत्री असतानाचे अनुभव मला सांगितले. हे जनतेचे सरकार आहे. काय चांगले होऊ शकते. सर्वसामान्यांसाठी केले जावे यावर चर्चा करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. प्रत्येकवेळी राजकीय बोलणे आवश्यक आहे का?आम्ही कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. तो शिष्टाचार होता. मी गणपती दर्शनासाठी आलो होतो. कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. बाळासाहेबांसोबत आम्ही यापूर्वी काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत, असे शिंदेंनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे हे शिवसेना सचिव आणि उद्धव यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या वांद्रे येथील घरी गेले. नार्वेकर आजही उद्धव यांच्यासोबत असून उद्धव यांचे निष्ठावंत म्हणून पाहिले जातात. आता शिंदे यांच्या भेटीने अनेक चर्चांना उधाण आले आहे. नार्वेकर यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेलो होतो, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सुरतला जाऊन शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना शिवसेनेत परतण्याचा आग्रह करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी नार्वेकर यांची निवड केली होती. उद्धव समर्थक म्हणून पाहिले जाणारे नार्वेकर यांचे मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चांगले संबंध आहेत.