दे दना दन- विनोदी दणादण

वेबदुनिया

शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2009 (16:40 IST)
IFM
IFM
अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे त्रिकूट पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर झळकले आहे. 'हेरा फेरी'च्या माध्यमातून निखळ विनोदी चित्रपट देणार्‍या प्रियदर्शनने या तिघांना घेऊन 'दे दना दन' हा चित्रपट आणला आहे. विनोदी चित्रपट किती कौशल्याने तयार करायला हवा याचे उदाहरण प्रियदर्शनने 'दे दना दन'च्या माध्यमातून घालून दिले आहे. 'रियलिस्टिक' सिनेमा ही प्रियनची खरी आवड असली तरीही विनोदी सिनेमा ही त्याची खासीयत आहे, हे या चित्रपटातून पुन्हा एकदा दिसून आले आहे.

'दे दना दन' हा 'हेरा फेरी'चीच पुनरावृत्ती किंवा सिक्वलही नाही. ब्लेम इट ऑन दी बेलीबॉय या इंग्लिश चित्रपटावर हा आधारीत आहे. यातले तीनही स्टार हेराफेरीतही असले तरी या चित्रपटात क्लायमॅक्स वगळता एकाही प्रसंगात हे तिघे एकत्रित दिसत नाहीत.

'दे दना दन'ची कथा सिंगापूरमध्ये घडते. नितिन बनकर (अक्षय कुमार) हा सिंगापूरमधील एका श्रीमंत महिला उद्योगपतीच्या (अर्चना पुरणसिंह) घरी ड्रायव्हर आहे. श्रीमंत बनणं हे त्याचं स्वप्न आहे. अंजली (कतरीना कैफ) त्याची प्रेयसी आहे. त्याच्या अडीअडचणीच्या काळात तीच त्याला आर्थिक मदत करत असते.

राम मिश्रा (सुनील शेट्टी) हा श्रीमंत बनण्यासाठी सिंगापूरमध्ये आला आहे. हा नितिनचा चांगला मित्र आहे. श्रीमंत होण्यासाठी आलेला राम अखेर कुरीयर बॉय बनतो. मनप्रीतवर (समीरा रेड्डी) तो मनापासून प्रेम करतोय. पण कडका असल्याने तिचे आई-वडिल त्यांच्या लग्नाला परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

हरबन्स (परेश रावल) उद्योगपती आहे, पण पैशांची निकड त्यालाही जाणवतेय. त्याला जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल आणि देणेकर्‍यांपासून कशी सुटका करून घेता येईल ही काळजी आहे. त्यासाठी मुलगा (चंकी पांडे) यांचे लग्न एखाद्या श्रीमंताशी करून देऊन त्याच्याकडून भरपूर हुंडा उकळता येईल, अशी त्याची योजना आहे. त्यासाठी एका कार्यक्रमात तो मनप्रीतच्या आई-वडिलांना आपण सुस्थापित उद्योगपती असल्याचे भासवतो आणि आपला मुलगा नि मनप्रीत यांचे लग्न जुळविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकतो.

इकडे नितिन आणि राम पैशांची चणचण जाणवत असल्याने अपहरणाची योजना आखतात. तीही एका कुत्र्याच्या अपहरणाची. त्या भानगडीत ते एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जातात. आणि तिथे अडकून पडतात. याच हॉटेलमध्ये मनप्रीत आणि हरबन्सच्या मुलाचा साखरपुडा होणार असतो.

यानतंर कथेत एक चिनी डॉन (असरानी), भाडोत्री मारेकरी (जॉन लिव्हर), पोलिस इन्स्पेक्टर( शरत सक्सेना), क्लब डान्सर (नेहा धुपिया), राजदूत (विक्रम गोखले), लग्नाला वैतागलेली विवाहिता (आदिती गोवित्रीकर), कामांध व्यक्ती (शक्ती कपूर), दारूड्या वेटर (राजपाल यादव) आणि ए मृतदेह या पात्रांचा प्रवेश होतो. यानंतर जी धमाल उडते ती पडद्यावर पहाण्यातच मजा आहे.

खास प्रियदर्शन छाप हा चित्रपट आहे. हा छाप वेळोवेळी दिसूनही येतो. पण या हाताळणीत एकसारखेपणाचा अभाव दिसून येतो. एका सरळ रेषेत चित्रपट जात नाही. विनोदाच्या बाबतीतही प्रवाह सतत रहात नाही. तो अडखळत पुढे सरकतो आहे, असे वाटते.

महत्त्वाची बाब म्हणजे अक्षय कुमार या चित्रपटात मुख्य भूमिकेत असला तरी एका प्रसंगी तो कपाटात तासभर अडकतो असे दाखविले आहे. त्यामुळे पुढच्या तासभर चित्रपटात त्याचे दर्शनच घडत नाही. त्याकाळात बाकीच्या मंडळींना संधी मिळाली आहे. दुसर्‍या हाफमध्ये चित्रपट खूप लांबला आहे शिवाय अतिबडबड होत असल्याचे जाणवते.

बाकी अभिनयाच्या बाबतीत अक्षय कुमार छान. सुनील शेट्टीही त्याला पुरक आहे. परेश रावल अप्रतिम. कतरीना आणि समीराला चांगले दिसण्याशिवाय फार काम नाही. बाकीच्या मंडळींनी त्यांच्या छोट्या भूमिकांतही मजा आणली आहे.

एकुणात, दे दना दन पहा, पण त्या आधी डोके घरी ठेवून यायचे तेवढे लक्षात ठेवा.

वेबदुनिया वर वाचा