भारतीय फुटबॉल संघ 2026 फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या दुसऱ्या फेरीत मंगळवारी (21 नोव्हेंबर) भुवनेश्वरमध्ये कतारविरुद्ध मैदानात उतरेल.भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. अ गटात भारतासमोरील हे सर्वात कठीण आव्हान आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या खेळाडूंकडून चमत्कारिक कामगिरीची अपेक्षा आहे. पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात कुवेतचा 1-0 असा पराभव केल्यानंतर भारतीय संघाचे मनोबल उंचावले आहे.
भारतीय संघाने चार वर्षांपूर्वी आशियाई चॅम्पियन कतारला गोलशून्य बरोबरीत रोखले होते आणि ते या सामन्यात संघासाठी प्रेरणादायी ठरेल. 10 सप्टेंबर 2019 रोजी 2022 विश्वचषक पात्रता फेरीच्या दुसऱ्या फेरीत कतारला गोलशून्य बरोबरीत रोखून भारताने फुटबॉल जगताला आश्चर्यचकित केले. कतार त्यावेळी जबरदस्त फॉर्ममध्ये होता आणि 2019 च्या सुरुवातीला आशिया कप जिंकला होता.