पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र पुर्ववत सुरु

गुरूवार, 29 एप्रिल 2021 (20:59 IST)
राज्य शासनाकडून Covishield- १५ हजार डोज प्राप्त
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना मात करण्यासाठी लस घेणे महत्त्वाचे आहे. पण शहरात लसीचा सतत तुटवडा जाणवत आहे. गेली दोन झाले शंभरपैकी केवळ बारा लसीकरण केंद्र सुरू होते. मध्यवर्ती भांडारमधील लसीचा संपुर्ण साठा संपुष्टात आला होता. पुरेशी लस मिळत नसल्याने ९८ केंद्रे बंद करावी लागली होती. परंतू, राज्य शासनाने शहरासाठी आज (गुरुवार दि.29) रोजी 15 हजार कोशिल्ड लस उपलब्ध केल्याने लसीकरण केंद्र पुन्हा पुर्ववत सुरु करण्यात आली आहेत, अशी माहिती अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डाॅ. पवन साळवे यांनी दिली. दरम्यान, 1 मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. तेव्हा लसीचा तुटवडा भासू नये, याकरिता सर्वतोपरी प्रयत्न सरकारला करावे लागणार आहेत.
 
केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांनुसार कोविड -१९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये शासन आदेशानुसार कोविड-१९ लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड शहरात एकूण शंभरपेक्षा लसीकरण केंद्रामधून सध्या ४५ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाते. परंतु, लसीचा साठा कमी असल्याने अनेक केंद्र बंद करावी लागली आहेत. नागरिकांना लस न घेता परत जावे लागते. मागणीच्या तुलनेत लस उपलब्ध होत नसल्याने ही मोहीम संथगतीने सुरू आहे. अनेक नागरिकांनी रांगा लावून लस घेतली. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे शहरातील ९८ केंद्रे बंद ठेवली. त्यामुळे लाभार्थींना मनस्ताप होत आहे.
 
लसीचा साठा संपल्याने दोन ते तीन दिवस लसीकरण बंद करावे लागत आहेत. आताच ही परिस्थिती असताना पुढील महिन्यापासून १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना लस कशी मिळेल, याबाबत मनात शंका आहे. लसीकरणाचे नियोजन करून जादा लसीचा पुरवठा करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
 
या ठिकाणी मिळतेय लस
 
पिंपळे गुरव येथील पीसीएमसी शाळा, यमुनानगर रुग्णालय, स्केटिंग ग्राउंड यमुनानगर, म्हेत्रेवस्ती दवाखाना, वायसीएम रुग्णालय, वाकड पीसीएमसी शाळा, तालेरा रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी, नवीन आकुर्डी रुग्णालय आणि दिव्यांगासाठी चिंचवड संभाजीनगर येथील रोटरी क्लब सेंटर मधील लसीकरण केंद्र सुरू राहणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती