...तर तुम्हाला लगेच UAE चं नागरिकत्व मिळू शकतं

मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (19:05 IST)
संयुक्त अरब अमिरात (UAE) ने नागरिकत्व देण्याबाबत केलेल्या घोषणेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. UAE ला अधिक चांगलं बनवण्यासाठी योगदान देऊ शकतील, अशा लोकांना नागरिकत्व देण्याची घोषणा करण्यात आलीय.
 
UAE चे उपराष्ट्रपती आणि दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी सांगितलं की, UAE च्या नागरिकत्वासाठी योग्य परदेशी लोकांमध्ये गुंतवणूकदार, डॉक्टर, इंजिनिअर, कलाकार आणि इतर विशेष कौशल्य असणाऱ्यांचा समावेश असेल.
 
विशेष कौशल्य असणारे परदेशी नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय दुहेरी नागरिकत्वही ठेवू शकतात, असंही ते म्हणाले.
 
दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम ज्या परदेशी नागरिकांना UAE चं नागरिकत्व देण्याबाबत बोलत आहेत, त्यात कमी उत्पन्न असलेले लोक पात्र असतील, याची शक्यता अत्यंत कमी दिसतेय.

शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या मते, नागरिकत्वाच्या या घोषणेतून त्या लोकांना आकर्षित करायचं आहे, जे UAE च्या विकासयात्रेत योगदान देतील.
 
या नागरिकत्वासाठी वेगळी अर्ज प्रक्रिया नसेल. UAE च्या राजघराण्यातले लोक आणि अधिकारी कुणाही परदेशी नागरिकाची नागरिकत्व देण्यासाठी शिफारस करतील. त्यानंतर UAE चं मंत्रिमंडळ मंजुरी देण्याबाबत निर्णय घेईल.
 
कोरोना संकट आणि तेलाच्या किंमती कमी होत असण्याच्या काळात परदेशी नागरिक UAE सोडून जात असताना नागरिकत्वाची घोषणा करण्यात आलीय.
 
अबुधाबीमधील 'द नॅशनल' वृत्तपत्राच्या माहितीनुसार, या नव्या योजनेमुळे विशेष क्षेत्रातील तज्ज्ञ आणि परदेशी गुंतवणूक यांना UAE मध्ये जम बसवण्यासाठी मोठी संधी आहे.
 
कमी उत्पन्न असणाऱ्यांकडे दुर्लक्ष

बीबीसीचे अरब अफेअर्सचे संपादक सेबस्टियन अशर यांच्या मते, आर्थिक आणि पर्यटन या दोन गोष्टींसाठी संयुक्त अरब अमिरात परदेशी लोकांवर अवलंबून असतं. तिथे राहणारे बहुसंख्य लोक परदेशी आहे. वर्कफोर्समध्ये 90 टक्क्यांहून अधिक परदेशी लोक आहेत.
 
परदेशी नागरिकांना नेहमी रिन्यूएबल व्हिसा दिला जातो. रोजगाराशी संबंधित असलेल्यांना आणि अनेक वर्षं राहणाऱ्यांना साधरणत: हा व्हिसा दिला जातो.
 
कमी उत्पन्न असलेल्या कामगारांनी संयुक्त अरब अमिरातची अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी मोठं योगदान दिलंय. रिटेल, ट्रॅव्हल अशा क्षेत्रांमध्ये हे कामगार काम करतात. तिथे कमाई करून घरी मदत पाठवतात.
 
यातील बरेच लोक वर्षानुवर्षे संयुक्त अरब अमिरातमध्ये राहतात. मात्र, त्यांना नागरिकत्व मिळत नाही. त्यामुळे त्यांना सामाजिक कल्याणासंबंधी कुठल्याच योजनांचा लाभ मिळत नाही.
 
संयुक्त अरब अमिरातमध्ये कमी उत्पन्न असणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे, तर दुसरीकडे गुंतवणूकदार, विद्यार्थी आणि विविध पेशातील लोकांना अधिक काळ राहण्यासाठी योजना आणल्या जात आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती