केंद्राच्या लशीवरून प्रकाश जावडेकर आणि जयंत पाटलांमध्ये जुंपली
बुधवार, 17 मार्च 2021 (18:21 IST)
महाराष्ट्र राज्याला पाठवण्यात आलेल्या लशीच्या 54 लाख डोसेसपैकी 31 लाख डोस शिल्लक असूनही, अधिकच्या डोसेसची मागणी करण्यात येत असल्याचं पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय.
महाराष्ट्राला लशीचे आणखीन डोस पुरवण्यात यावेत, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मंगळवारी दिल्लीत जाऊन केली होती.
महाराष्ट्राला दर आठवड्याला 20 लाख असे लशीचे एकूण 2.2 कोटी डोस अधिक देण्यात यावेत, अशी मागणी राजेश टोपेंनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे मंगळवारी केली होती.
पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरांनी याला प्रत्युत्तर दिलंय. ते ट्वीटमध्ये म्हणतात, "महाराष्ट्राला लशीचे एकूण 54 लाख डोस पाठवण्यात आले होते. त्यापैकी फक्त 23 लाख डोस वापरण्यात आलेत. 56% लस वापरण्यात आलेली नाही. आणि आता शिवसेनेचे खासदार राज्यासाठी अधिक लशी मागत आहेत. आधी ही जागतिक साथ नीट हाताळली नाही, आता लस देण्याचं व्यवस्थापन योग्य नाही."
तर भारतात लशी कमी पडत असताना केंद्राला काळजी पाकिस्तान आणि अन्य देशांची आहे, असा टोला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावलाय.
ते म्हणाले, "भारतीयांसाठी लशी कमी पडत असताना आम्हाला काळजी अन्य देशांतल्या नागरिकांची जास्त आहे. आम्ही आमच्या देशातून परदेशात लशी निर्यात करण्याचा जो दानशूरपणा दाखवतोय, त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. भारतात आधी लसीकरण व्हायला हवं होतं. भारतातल्या लसीकरणाकडे सरकारने लक्ष देणं आवश्यक आहे. पण जगाची देखील काळजी करण्याची जबाबदारी आमच्यावर असल्यामुळे भारतीय थोडे मागे राहिले तर चालतील, अशी मानसिकता केंद्राची सध्या दिसते."
काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही याच मुद्द्यावरून काल केंद्रावर टीका केली होती. पाकिस्तानला लस फुकट दिली जाते, मग भारतीयांकडून का पैसे घेतले जातात, असा सवाल पटोलेंनी केला होता.