सचिन वाझे प्रकरण : अनिल देशमुख वर्षावर उद्धव ठाकरेंच्या भेटीला
बुधवार, 17 मार्च 2021 (17:40 IST)
मुकेश अंबानींच्या घरासमोर लावण्यात आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणानंतर समोर येत असलेल्या माहितीमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात पुढे घडलेली मनसुख हिरेन हत्या किंवा निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची अटक या सगळ्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला तडा जात असल्याचं दिसून येत आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलसाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या तिन्ही पक्षांचे नेते पुढे सरसावले आहेत.
या प्रकरणात सरकारची भूमिका ठरवण्यासाठी तसंच पुढील डावपेच आखण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून बैठकांचं सत्र सुरू झालं आहे.
मुख्यमंत्री आणि देशमुख बैठक
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सकाळी 11 च्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सचिन वाझे प्रकरणावर चर्चा करण्यासाठी ही भेट घेतल्याची चर्चा आहे.
सह्याद्रीवर बैठक
सचिन वाझे प्रकरणात मंगळवारी (16 मार्च) अनेक घडामोडी घडल्या. आज (17 मार्च) सकाळीही 10 वाजता सह्याद्रीवर बैठक सुरू झाली. पण ही बैठक निधी वाटपासाठी असल्याचं सांगण्यात आलं.
या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील सह्याद्रीवर दाखल झाले होते.
"सचिन वाझेंविषयी या बैठकीत कुठलीही चर्चा झाली नाही. सचिन वाझेंचं प्रकरण आता NIA आणि ATS हाताळतंय, त्याची चौकशी, त्याचा तपास सुरू आहे. त्यामुळे त्या विषयावर या बैठकीमध्ये कुठलीही चर्चा झालेली नाही," असं या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
मंगळवारी बैठकांचं सत्र
सचिन वाझे चालवत असलेली काळ्या रंगाची मर्सिडीझ मंगळवारी NIAने ताब्यात घेतली. या कारमध्ये 5 लाख रुपये मिळाल्याचं NIAच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. याशिवाय या कारमधून स्कॉर्पिओची नंबर प्लेट, नोटा मोजण्याचं मशीन आणि काही कपडे सापडले आहेत. ही कार कोणाच्या मालकीची आहे याचा शोध घेण्यात येतोय.
दरम्यान, एकीकडे NIA ची ही कारवाई सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठकांचं सत्रही सुरू होतं.
मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'वर्षा' निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक झाली. यामध्ये सचिन वाझे प्रकरणावर चर्चा होणार असल्याची चर्चा होती. पण नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अधिक माहिती कळू शकली नाही.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, अनिल परब हे या बैठकीत उपस्थित होते.
सकाळी निवडक मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतल्यानंतर दुपारी सर्व मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आलं.
मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानीच ही बैठक झाली. त्यानंतर मंगळवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासोबत एक बैठक घेतली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
त्यानंतर आता सह्याद्रीवर होणारी ही आजची पहिलीच बैठक असल्याने यामध्ये काय चर्चा होईल, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.