सचिन वाझे चालवत असलेली गाडी NIA कडून जप्त, गाडीत सापडले 5 लाख रुपये

बुधवार, 17 मार्च 2021 (14:47 IST)
सचिन वाझे चालवत असलेली काळ्या रंगाची मर्सिडीझ मंगळवारी NIAने ताब्यात घेतली. या कारमध्ये 5 लाख रुपये मिळाल्याचं NIAच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
 
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातून ही गाडी ताब्यात घेण्यात आली.
 
NIA ने सचिन वाझे काम करत असलेल्या क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या ऑफिसचीही कसून तपासणी केली. सोमवारी (15 मार्च) रात्री 8 वाजता सुरू करण्यात आलेलं हे ऑपरेशन मंगळवारी (16 मार्च) पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू होतं. पोलिस अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
 
पुरावे शोधण्यासाठी ही झाडाझडती घेण्यात आली. सचिन वाझे यांचा सॅमसंग मोबाईल फोन आणि आयपॅड ही NIA ने जप्त केला आहे.
 
कार्यालयाची झाडाझडती घेतली जात असतानाच राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या 10 अधिकाऱ्यांचीही चौकशी केली.
 
वाझेंच्या जप्त करण्यात आलेल्या कारमधून स्कॉर्पिओची नंबर प्लेट, 5 लाखांची रक्कम, नोटा मोजण्याचं एक मशीन आणि काही कपडे सापडली असून पुढील तपास सुरू असल्याचं NIA चे इन्स्पेक्टर जनरल (IG) अनिल शुक्ला यांनी माध्यमांना सांगितलं.
 
जप्त करण्यात आलेली गाडी सचिन वाझे चालवत, पण ती कोणाच्या मालकीची आहे याचाही शोध घेण्यात येत असल्याचं अनिल शुक्लांनी सांगितलं.
 
सचिन वाझे यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला होता. त्यांना 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती