नारायण राणेंना अटक हा कारवाईचा 'उद्धव ठाकरे पॅटर्न' आहे का?
बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (13:56 IST)
- दीपाली जगताप आणि रोहन नामजोशी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी (23 ऑगस्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आणि मंगळवारी म्हणजेच 24 तासांत नारायण राणेंना अटक झाली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली.
ठाकरे कुटुंबाविषयी राणेंनी टोकाचं काही बोलण्याची ही पहिलीच वेळ नव्हती पण कोणाच्याही ध्यानी मनी नसताना ठाकरे सरकारने आता ही कारवाई केली.
प्रत्येक राजकीय नेत्याची काम करण्याची एक शैली असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जहाल होते असं जाणकार सांगतात. पण उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र मवाळ झाली आहे का? असा प्रश्न त्यानंतर अनेकदा उपस्थित करण्यात आला.
उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आल्यानंतरही प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसल्याने अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. पण उद्धव ठाकरे यांच्या कामकाजाची एक पद्धत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
ही पद्धत नेमकी काय आहे? 'बेसावधपणे' कारवाई करण्याची उद्धव ठाकरेंची कार्यशैली आहे का? नारायण राणेंची अटक हा कारवाईचा 'उद्धव ठाकरे पॅटर्न' आहे का?
याचे राजकीय पडसाद काय असतील? सत्ताधारी पोलिसांचा गैरवापर करत आहेत का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात.
हे 'उद्धव ठाकरे पॅटर्न' आहे का?
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचं प्रकरण असो वा अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना राणावत यांचे प्रकरण उद्धव ठाकरेंनी आपल्या पद्धतीने या प्रकरणांना प्रत्युत्तर दिल्याचं दिसलं.
उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यतला संघर्ष खरं तर महाराष्ट्रासाठी नवीन नाही. 90 च्या दशकात दोघांमध्ये वाद सुरू झाल्यानंतर 2005 मध्ये 39 वर्षे शिवसेनेत काम केल्यानंतर 2005 साली नारायण राणे यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केलं.
एवढ्या वर्षांपासून सुरू असलेला राजकीय वाद गेल्या काही काळात अत्यंत वैयक्तिक झाल्याचंही दिसून आलं. मग ते अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण असो वा कोरोना आरोग्य संकट राणे पिता-पुत्रांनी ठाकरे कुटुंबावर आरोप करण्याची एकही संधी सोडली नाही.
पण तरीही शिवसेना मंगळवारी (24 ऑगस्ट) जेवढी आक्रमक दिसली तेवढीच गेल्या काही काळात संयमाच्या भूमिकेत होती. नारायण राणे यांच्यावर आताच कारवाई होण्यामागे काय कारण आहे? याचा अर्थ उद्धव ठाकरे योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते का? असेही प्रश्न विचारले जात आहेत.
काहीजण याला 'उद्धव ठाकरे पॅटर्न' म्हणतात तर काही जण 'आक्रमकपणा त्यांच्या बोलण्यात नसला तरी कृतीत असल्याचं' असल्याचंही म्हणतात.
ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात, "उद्धव ठाकरे कधीही कोणत्याही घटनेवर प्रतिक्रिया देण्याची किंवा भूमिका घेण्याची घाई करत नाहीत. ते संयमाने घडामोडी पाहतात आणि वेळ आल्यावर उत्तर देतात."
ते म्हणाले, "ही पहिलीच वेळ नाही जेव्हा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात टोकाची भाषा वापरली. अनेकदा तर शिवसेना ट्रॅपमध्ये अडकेल असं चित्र असतं पण तरीही उद्धव ठाकरे लगेच प्रतिवार करत नाहीत. पण वेळ पाहून आपल्या कृतीतून ते प्रतिक्रिया देत असतात."
नारायण राणे यांनी केवळ शिवसेनेवर टीका केलेली नाही. तर यापूर्वीही त्यांनी थेट 'मातोश्री'पर्यंत (ठाकरे कुटुंबाचे निवासस्थान) आव्हान दिलं आहे. 2015 च्या पोटनिवडणूकीत त्यांनी वांद्रे मतदारसंघातून निवडणूक लढवली. तेव्हाही दोघांमध्ये टोकाचे राजकीय हेवेदावे झाले.
अभय देशपांडे सांगतात, उद्धव ठाकरे यांची शैली आक्रमक नाही असं म्हणता येणार नाही. आक्रमकपणा केवळ बोलण्यात नसतो. तर अनेकजण आपल्या कृतीतून तो दाखवत असतात. उद्धव ठाकरे हे त्यांच्यापैकी एक आहेत.
उद्धव ठाकरे हे संघटनात्मक कामकाजातही असेच आहेत असं राजकीय विश्लेषक आणि लेखक धवल कुलकर्णी सांगतात.
ते म्हणाले, "1995 साली राज्यात युतीची सत्ता आली तेव्हा शिवसेनेत उघडउघड दोन गट होते. एकीकडे उद्धव ठाकरे, मनोहर जोशी आणि सुभाष देसाई होते. तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे, नारायण राणे आणि स्मिता ठाकरे होते."
नारायण राणे असो वा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी आपल्या कार्यपद्धतीनुसार काम केलं आहे असंही जाणकार सांगतात. "विरोधक किंवा शत्रूंबाबत बोलायचं नाही पण करायचं. त्यांची कार्यशैली अशी आहे. संघटनेतही जे विरोधक होते मग ते नारायण राणे असो वा राज ठाकरे त्यांनी चलाखीने त्यांना पक्षातून बाहेर केलं." असं ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान म्हणाले.
शिवसेना ही आधीसारखी राहिलेली नाही अशी प्रतिमा उभी करण्यात विरोधकांना यश आल्याचं दिसतं. पण आता उद्धव ठाकरे ही प्रतिमा दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचं धवल कुलकर्णी सांगतात.
ते म्हणाले, "उद्धव ठाकरे यांचा स्वभाव 'forgive and forget' म्हणजेच 'माफ करा आणि विसरा' असा नाही. उद्धव ठाकरे अनेक गोष्टी जाहीरपणे स्पष्ट बोलत नसले तरी ते मनात ठेवतात. सहजासहजी विसरत नाहीत."
'बाळासाहेब असे नव्हते'
बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांचंही राजकारण जवळून पाहिलेले ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "लोकांनी आतापर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पाहिले होते. त्यांचं संघटनात्मक कौशल्य पाहिलं होतं. प्रतिस्पर्ध्यांना कात्रजचा घाट दाखवला ते पाहिलं, लाभ घेऊन टीका करण्याचं त्याचं तंत्रही पाहिलं. पण आता प्रथमच मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत ते आहेत."
बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीत बराच फरक असल्याचंही ते सांगतात. "बाळासाहेब ठाकरे एखाद्याच्या तोंडावर कदाचित हिशेब चुकता करतील. त्यांनी अशापद्धतीने टीका करणाऱ्याला तुरुंगात टाकलं असतं का याबाबतही शंका आहे. त्यांच्यासमोर एखाद्याने माफी मागितली की ते माफ करायचे असंही म्हटलं जात होतं पण उद्धव ठाकरे तसे नाहीत. ते धूर्त आहेत. मनातला राग जपतात आणि संधी मिळाल्यानंतर सोडत नाही अशापद्धतीचं त्याचं व्यक्तिमत्त्व आहे."
सूडबुद्धीचं राजकारण?
उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर सूडबुद्धीने कारवाई केली असा आरोप करण्यात येत आहे. भाजपनेही ठाकरे सरकारला पोलिसजीवी सरकार म्हणत टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंनी पोलिसांचा गैरवापर केल्याचाही आरोप भाजपने केला आहे. शिवसेना आंदोलन करत निषेध व्यक्त करेल पण ही घटना केंद्रीय मंत्र्याच्या अटकेपर्यंत जाईल असं वाटलं नव्हतं असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
यापूर्वी केंद्रातल्या भाजप सरकारवरही असेच आरोप झाले आहेत. ईडी आणि सीबीआय तपास यंत्रणाचा दबाव विरोधकांवर टाकत असल्याची टीकाही भाजपवर सातत्याने करण्यात आली.
एकमेकांच्या विरोधात केवळ सूडबुद्धीने राजकारण करत असल्याचा ट्रेंड आहे असंच म्हणावं लागेल असंही जाणकार सांगतात.
अभय देशपांडे याची तुलना पश्चिम बंगालच्या सध्याच्या राजकारणाशीही करतात. ते म्हणाले, "ज्याप्रमाणे ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात लढा दिला त्याच मार्गाने शिवसेनेसह इतर राजकीय पक्ष भाजपविरोधात लढा देण्याच्या तयारीत आहेत असं दिसत आहे."
आगामी महानगरपालिका निवडणुका पाहता आणि भाजपचे केंद्रातले राजकारण पाहता महाविकास आघाडी दीर्घकालीन राजकारणाचा विचार करत नाहीय असं संदीप प्रधान यांना वाटतं.
ते म्हणाले, " राजकारणात दोन गोष्टी असतात. एक दीर्घकालीन विचार असतो आणि एक तात्कालिक विचार असतो. अनेक नेत्यांनी सध्या दीर्घकालीन विचार करायचा नाही असं ठरवल्याचं दिसतं. कारण प्रतिस्पर्ध्याला रोखण्यासाठी त्यांनी कारवाई करायचं ठरवलं आहे. विशेषत: आता भाजपशी विरोधक म्हणून लढायचं आहे. त्यासाठी आत्ता काय करायला लागेल एवढाच विचार उद्धव ठाकरे आणि अन्य पक्ष करत असताना दिसतात."
"अजून पाच वर्षांनी काय होईल, भाजपची पुढे सत्ता आली तर काय होईल, लोकसभेत भाजपच्या जागा आल्या तर काय होईल याचा आत्ता कोणी विचार करत नाहीय. 'जशास तसं' उत्तर देण्यावर सध्या अधिक भर असल्याचं दिसतं. हा संघर्ष करण्याची तयारी पक्षांनी ठेवलेली आहे असे दिसून येते." असंही संदीप प्रधान सांगतात.
'ही' तीन प्रकरणं आणि उद्धव ठाकरे
2020 मध्ये अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या हत्येनंतर शिवसेना आणि रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यात संघर्ष उफाळून आला. सुशांतच्या आत्महत्येनंतर शिवसेना आणि अर्णब यांच्या दावे आणि प्रतिदावे होत होते.
सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव आलं आणि संघर्ष टीपेला पोहोचला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू सातत्याने लावून धरली. त्यात भरीस भर म्हणजे रिपब्लिकन टीव्हीच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आणि या वादात आणखी भर पडली.
या प्रकरणी अर्णब यांच्याविरुद्ध आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणला. अर्णब यांनी माफी मागावी अशी मागणी शिवसेनेने आणि महाविकास आघाडीने लावून धरली.
हे सगळं सुरू असतानाच कथित टीआरपी घोटाळ्यात रिपब्लिक टीव्हीचे कार्यकारी संपादक आणि अन्य पाच लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हेही प्रकरण फार गाजलं.
शेवटी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण वर आलं. अन्वय नाईक यांच्या मृत्यूला अर्णब गोस्वामी कारणीभूत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आणि गोस्वामी यांना अटक करण्यात आली. ही अटक अनेक अर्थाने वादग्रस्त ठरली. या सर्व प्रकरणात उद्धव ठाकरेंनी आधी संयम दाखवला आणि एका विशिष्ट वेळी कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
यात सातत्याने उद्धव ठाकरेंबद्दल बोललं जात असतानाही त्यांनी संयम ठेवला होता आणि शेवटी त्यांचा संयम कारवाईच्या रुपात संपला.
अशीच काहीशी गत अभिनेत्री कंगना राणावतची ही झाली. कंगना राणावतने सतत उद्धव ठाकरेंवर टीका केली आणि शिवसेनेने त्यांना नेटाने उत्तरं दिली. मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिली.
या वक्तव्याने खूप मोठा वाद निर्माण झाला. तेव्हापर्यंत भाजपाही कंगनाला पाठिंबा देत होती. मात्र तिच्या या वक्तव्यामुळे भाजप एकदम बॅकफुटवर गेला. नंतर एके दिवशी कंगनाच्या मुंबईच्या घराचा काही भाग अनधिकृत असल्याचं सांगत मुंबई महापालिकेने तो पाडला. त्याबरोबरच तिच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले.
सुरुवातीला असलेला भाजपचा पाठिंबा नंतर मिळेनासा झाला आणि तिचं ट्विटर अकाऊंटही सस्पेंड झालं.
भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या सुद्धा शिवसेनेवर सातत्याने आरोप करत असतात. 2014-19 या काळात भाजप-सेनेचं सरकार असताना 2017 साली सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख बांद्रा का माफिया असा केला होता. नंतर 2019 साली त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं नाही.
उद्धव ठाकरेंमुळेच तिकीट कापलं गेल्याची चर्चा होती. आता भाजपा विरोधी पक्षात असल्याने किरीट सोमय्या शिवसेना नेत्यांवर अनेक आरोप करत असतात.