नारायण राणेंना जामीन मंजूर, राणे विश्रांतीसाठी मुंबईकडे रवाना

बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (09:24 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाडच्या सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
 
जामीन मिळाल्यानंतर राणे मुंबईकडे रवाना झाले आहेत.ते बुधवारी विश्रांती घेणार आहेत. त्यानंतर गुरुवारी किंवा शुक्रवारी पुन्हा यात्रा सुरू होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.
 
नारायण राणे यांना जामीन मंजूर करताना कोर्टानं 31 ऑगस्ट आणि 13 सप्टेबरला रायगडच्या पोलीस अधीक्षकांकडे हजारी लावण्याचे आदेश दिलेत,अशी माहिती राणेंचे वकिल संग्राम देसाई यांनी माध्यमांना दिली आहे.तसंच नारायण राणे यांना भविष्यात असं वक्तव्य न करण्याची ताकीद कोर्टानं दिली आहे.शिवाय पोलिसांना जेव्हा पाहिजे तेव्हा आवाजाचे नमुने उपलब्ध करून देण्याचे आदेश कोर्टानं राणेंना दिले आहेत.साक्षीदारांवर दबाव न आणणं तसंच पुराव्यांशी छेडछाड न करण्याची सूचनादेखील कोर्टानं राणेंना केली आहे.रात्री उशीरा राणे यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं.

पोलिसांनी राणेंच्या 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. तर राणेंच्या वकिलांनी मात्र त्याला विरोध केला होता.राणेंना केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी कोर्टात केला.दरम्यान मंगळवारी दुपारी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणीला नकार दिला होता.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गोळवलीमधून नारायण राणे यांना रत्नागिरी पोलीसांनी अटक केली होती.अटकेनंतर पोलीस राणे यांना महाडमध्ये घेऊन गेले होते.राणेंची सुटका होत नाही तोपर्यंत मुंबई-गोवा हायवेवर चक्काजाम करू,असा इशाचा भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिला होता.
 
स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाबाबत राणे यांनी केलेलं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं.
 
मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून नारायण राणेंनी केलेल्या विधानावरुन नाशिक शहराचे शिवसेना शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.नाशिकमध्ये नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
महाड,नाशिक नंतर पुण्यात नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
आम्ही रत्नागिरी पोलिसांना विनंती केली आहे की त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना अटक करावी आणि आमच्या ताब्यात द्यावं, असं नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी सांगितलं होतं.
 
"आमच्यावर कोणताही दबाव नाही. आम्ही फक्त कायद्याचं पालन करतो.घटनात्मक पदावर बसलेल्या एका व्यक्तीने दुसऱ्या एका व्यक्तीविरोधात तक्रार केली आणि आम्ही त्यावर कारवाई करतोय," असं ते पुढे म्हणाले.
 
दरम्यान मंगळवारी दुपारी रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. नाशिक मधल्या केससाठी रत्नागिरीत जामिनासाठी अर्ज का, असा सवाल विचारत कोर्टानं हा अर्ज फेटाळला आहे. तांत्रिक मुद्द्यावर हा अर्ज फेटाळण्यात आला होता.
 
राणेंचा हटवण्याची मागणी
नारायण राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील एखादा सदस्य मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला मारण्याची धमकी देत असेल तर कारवाई होणार नाही का? आम्ही कधीही अशापद्धतीची भाषा वापरली नाही."
 
दरम्यान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून नारायण राणेंना तात्काळ मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी केली आहे.

"केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध केलेलं वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे. नारायण राणे यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आणि अशा व्यक्तीला मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही.अशी भाषा वापरणारे मंत्री समाजाला काय संदेश देऊ इच्छितात हे माझ्या समजुतीच्या पलीकडचं आहे.यासंबंधी मी आपणाला विनंती करू इच्छितो की नारायण राणे यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांना तुमच्या मंत्रीमंडळातून हटवावं," असं विनायक राऊत या पत्रात म्हणाले.
 
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राणे यांच्या अटकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले,"नारायण राणे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे.त्यांनी असं वक्तव्य करणं महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही.लोकशाही आहे पण काय भाषा वापरावी याला काही मर्यादा असतात.हे वक्तव्य निषेधार्ह आहे असं माझं स्पष्ट मत आहे."
 
यात्रा सुरू राहील - भाजप
"केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चुकीची वक्तव्यं केली असतील मात्र पोलिसांची कारवाई योग्य नाही हा लोकशाहीवरचा हल्ला आहे,"असं भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं आहे.राणेंना ताब्यात घेतल्यानंतर भाजपाच्या केंद्रीय स्तरावरून ही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
 
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही राणेंच्या अटकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.ते म्हणाले, "राणेंची अटक ही घटनात्मक मुल्यांची पायमल्ली आहे.अशा प्रकारच्या कारवाईने आम्ही घाबरणार नाही,आम्ही कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडणार नाही.भाजपच्या जन-आशीर्वाद यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे हे लोक अस्वस्थ आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने लढू,यात्रा सुरू राहील."
 
नारायण राणे यांना ताब्यात घेतल्यानंतर पुढील जनआशीर्वाद यात्रा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्त्वात होणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
 
राणे काही चुकीचं बोललेले नाहीत - पाटील
राणेंना कायदेशीर नोटीस पाठवली का नाही, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
"ही अटक सुडापोटी केली आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या प्रतिसादाला घाबरून ही अटक केली आहे. आम्ही पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आहोत. त्यांना वॉरंट नसताना अटक केली.राणेसाहेबांच्या मुळे जशास तसं उत्तर देणारा नेता मिळाला आहे.नम्र पण ठाम हे भाजपाचं धोरण आहेच.राणे काहीही चुकीचं बोललेले नाही आणि पक्ष त्यांच्या पाठीशी आहे,"असं पाटील पुढे म्हणाले.
 
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नारयाण राणेंविरोधात ठाकरे सरकारच्या कारवाईला आम्ही घाबरत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
 
घोटाळेबाज नेत्यांना आम्ही उघड करणार असून अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, मिलिंद नार्वेकर यांच्या नंतर आता अनिल परब,भावना गवळी,किशोरी पेडणेकर,जितेंद्र आव्हाड यांच्यावर आता कारवाई होणारच असंही सोमय्या म्हणाले.
 
राणेंना जामीन मिळेल - सरोदे
नारायण राणे यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणीची विनंती जरी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असेल तरीही जेव्हा या प्रकरणी युक्तिवाद होईल तेव्हा नारायण राणेंना जामीन नक्की मिळेल, असं वकील असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.फेसबुकवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी नारायण राणे प्रकरणात काही कायदेशीर बाबींचा खुलासा केला.
 
ते फेसबुक पोस्ट मध्ये लिहितात, "गुन्ह्याची खोली (gravity of offence) विचारात घेऊन उच्च न्यायालय नारायण राणेंना काही विशिष्ट अटी आणि शर्तींच्या आधारे नक्कीच जामीन मान्य करेल.त्यामुळे आज ना उद्या नारायण राणेंना नक्कीच जामीन होणार.एक माजी मुख्यमंत्री आणि आताचे केंद्रीय मंत्री म्हणून नारायण राणेंना अटक केल्यावर सुद्धा पोलिसांनी मानवी सन्मानाची वागणूक द्यावी."
 
वक्तव्याचं समर्थन नाही पण पक्ष राणेंच्या पाठीशी-फडणवीस
"मुख्यमंत्र्यासंदर्भात बोलताना संयम बाळगणं आवश्यक. बोलण्याच्या भरात राणे बोलले असतील. भाजप राणेंच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल पण भाजप राणेंबरोबर आहे",असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"शर्जील उस्मानी राज्यात येतो.भारतमातेला शिव्या देतो, हिंदूंना शिव्या देतो.आक्षेपार्ह भाषेत बोलतो. त्याच्यावर कारवाई करता येत नाही. मात्र अख्खं पोलीस दल राणेंना अटक करण्यासाठी काम करतं. कायद्याच्या भाषेत हा गुन्हा नाही",असं फडणवीस म्हणाले.
 
आमच्या कार्यालयावर चालून आले, तर आम्ही रस्त्यावर येऊन लढणारे लोक आहोत असं ते म्हणाले.
 
"पोलीस दलाचा गैरवापर. निष्पक्ष म्हणून पोलीस दल ख्यातीप्राप्त. परंतु या सरकारच्या काळात महाविकास आघाडीच्या काळात पोलीस दलाचा ऱ्हास झाला आहे. बस म्हटलं की लोटांगण घालत आहे. सरकारला खूश करण्याकरता पोलीस दल कारवाई करत राहिलं तर प्रतिमा खराब होईल."
 
"या सरकारच्या काळात वसूलीकांड झालं. प्रामाणिक अधिकाऱ्यांना फटका बसला. अशा परिस्थितीत पोलिसांचा वापर सरकार करतंय, अलीकडे पोलीसजिवी सरकार.न्यायालयातर्फे चपराक बसते आहे."
 
"लाथा घाला, चौकीदार चोर है म्हणतात. आमच्याविरुद्ध, कुटुंबीयांविरुद्ध बोलतच असता.दुटप्पी भूमिका असू नये. राणेंच्या वक्तव्याप्रकरणी कारवाई अयोग्य आहे," असं ते म्हणाले.
 
काय म्हणाले होते राणे?
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयातील ध्वजारोहण पार पडल्यानंतर त्यांनी उपस्थितांसमोर भाषण केले.
 
त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर भाषणाच्या दरम्यान मात्र त्यांचा गोंधळ उडाला. हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरकमहोत्सव? यावरून मुख्यमंत्री गोंधळलेले दिसले असं ते म्हणाले.
 
"बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असतं",असं वादग्रस्त वक्तव्य केलं नारायण राणे यांनी केलं आहे.
 
"देशाच्या स्वातंत्र्य दिनाविषयी तुम्हाला माहिती नसावी? मला सांगा किती चिड येणारी गोष्ट आहे, असंही राणे म्हणाले. सरकार कोण चालवतंय ते कळत नाही, सरकारला ड्रायव्हरच नाही",अशी टीका देखील त्यांनी केलीय. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे,असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर देखील निशाणा साधला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती