इजिप्तच्या पिरॅमिडसाठी भव्य शिळा आणल्या कशा? संशोधकांना सापडले उत्तर
शुक्रवार, 24 मे 2024 (15:14 IST)
-मालू कुर्सीनो
इतिहासातील अनेक वास्तू या आजच्या काळातील वास्तूविशारद, अभियंते किंवा शास्त्रज्ञांसाठी कोडं बनलेलं आहे. अशीच कायम कोडं पडलेली एक ऐतिहासिक वास्तू किंवा जगातील आश्चर्य म्हणजे इजिप्तमधील पिरॅमिड. पण आता हे कोडं काहीसं उलगडलं आहे.
इजिप्त मध्ये चार हजार वर्षांपूर्वी हे 31 पिरॅमिडस नेमके कसे बांधण्यात आले असावे, त्यामागचं कोडं वैज्ञानिकांनी उलगडलं आहे. इजिप्त मधल्या प्रसिद्ध गिझाचाही यात समावेश आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना विल्मिंगटनमधील संशोधकांच्या टीमला या पिरॅमिड्सबद्दल काही महत्त्वाचे शोध लागले आहेत.
नाईल नदीची एखादी पुरातन शाखा असावी आणि तिच्या किनाऱ्यालगत हे पिरॅमिड बांधण्यात आले असावेत. पण आता नाईल नदीची ही शाखा लुप्त झाली असून तिथे वाळवंट आणि शेतजमिनी आहेत, असा अंदाज संशोधकांच्या या टीमने संशोधनातून व्यक्त केला आहे.
पिरॅमिडचं बांधकाम करण्यासाठी प्रचंड मोठ्या आकाराच्या शिळांचा वापर करण्यात आला आहे. त्या शिळा वाहून आणण्यासाठी प्राचीन इजिप्शियन लोकांनी जवळपासच्या जलमार्गाचा वापर केला असावा, असा कयास अनेक वर्षांपासून पुरातत्व संशोधकांनी लावला होता.
"पण पिरॅमिडच्या प्रत्यक्ष बांधकामाच्या जागेपासून हा जलमार्ग किती अंतरावर असेल, नेमका कुठे असेल, किती मोठा असेल, याची कुणालाच माहिती नाही," असं संशोधन करणारे प्राध्यापक इमान घोनिम यांनी लिहिलं आहे.
या नवीन संशोधनासाठी विविध खंडातील संशोधकांनी एकत्र येऊन काम केलं. संशोधकांच्या या गटानं रडार सॅटेलाईट फोटो, इतिहासकालीन नकाशे, भौगोलिक सर्वेक्षण (Geophysical service) आणि पिरॅमिडच्या जागी गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांमधून पुरावे शोधून नदीच्या या शाखेचा प्रवाह कसा वाहत होता याचा अंदाज लावला.
हजारो वर्षांपूर्वी झालेलं धुळीचं वादळ आणि भयंकर दुष्काळ यामुळं नदीची ही शाखा लोप पावली असावी, असा संशोधकांचा अंदाज आहे.
रडार टेक्नॉलॉजीचा वापर करून या टीमनं, "वाळूच्या पृष्ठभागातून खाली जाऊन आत दडलेल्या गोष्टींची छायाचित्र काढली," असं कम्युनिकेशन्स अर्थ अँड एन्व्हायरमेंट या अभ्यासपत्रात छापण्यात आलेल्या शोधनिबंधात म्हटलंय.
प्राध्यापक घोनिम यांच्या मते, "यामध्ये काढण्यात आलेल्या छायाचित्रांत नद्या आणि पुरातन बांधकामांचा समावेश आहे. तसंच ज्या भागांत इजिप्तमधले पुरातन पिरॅमड्स आहेत त्याच्याच पायथ्याशी या गोष्टी आढळल्या आहेत."
बीबीसीशी संशोधनात सहभागी असलेल्या डॉक्टर सुझन ऑनस्टाईन म्हणाल्या की, "नदीची प्रत्यक्ष शाखा सापडणं आणि जड शिळांचे ठोकळे, साधनसामग्री, लोक आणि इतर गोष्टींची वाहतूक करता येईल असा जलमार्ग अस्तित्वात असल्याचं दाखवणारा डेटा मिळाला आहे. त्यामुळं आता पिरॅमिडचं बांधकाम कसं झालं, याचा अंदाज लावता येईल."
नाईल नदीच्या लुप्त झालेल्या या शाखेला अहरामत शाखा म्हटलं जातं आहे. अहरामत या अरेबिक शब्दाचा अर्थ पिरॅमिड्स असा होतो.
नाईल नदीची ही अहरामत शाखा 64 किलोमीटर लांब आणि 200 ते 700 मीटर रुंद होती.
या शाखेच्या किनाऱ्यावर 4700 ते 3700 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले इजिप्त मधले 31 पिरॅमिड्स आहेत.
नदीच्या या लुप्त शाखेचा शोध लागल्यामुळं आता, गिझा ते लिश्त (मध्ययुगीन राजांना दफन करण्यात आलेली जागा) या भागामध्ये पिरॅमिडची संख्या आणि भव्यता याची कारणं शोधण्यासाठी मदत मिळू शकते. सहाराच्या वाळवंटातील या भूभागात सध्या मानवी वस्ती नाही.
पिरामिड्स विषयीच्या शोधनिबंधानुसार, "पिरॅमिडच्या भागापासून नदीच्या शाखेचं असलेलं अंतर पाहता, या पिरामिड्सचं बांधकाम सुरू असताना हे नदीपात्र प्रवाही होतं आणि यातून वाहतूक करता येत होती हे स्पष्ट होतं."
"प्राचीन इजिप्त मधील रहिवासी नदीच्या या प्रवाहाचा वापर जड शिळा वाहून नेण्यासाठी करत असावेत. मजुरांच्या तुलनेत त्यासाठी कमी श्रम लागत असतील," असं डॉक्टर सुझन ऑनस्टाईन म्हणाल्या.
नाईल नदी प्राचीन इजिप्तची लाईफलाईन होती...आणि आजही आहे.