यवतमाळ-वाशिम : अर्ज भरण्याची वेळ निघून चालली, तरी महायुतीचा उमेदवार ठरेना
मंगळवार, 2 एप्रिल 2024 (16:13 IST)
यवतमाळ-वाशिम हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचं वर्चस्व राहिलेला विदर्भातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. शिवसेनेतील फुटीनंतर आता दोन्ही गटांनी याठिकाणची लढत प्रतिष्ठेची बनवली आहे.
महाविकास आघाडीचा विचार करता ठाकरे गटाच्या शिवसेनेनं या जागेवरची दावेदारी सिद्ध करत जागा मिळवली आहे. भाजपमधून येत पुन्हा हाती शिवबंधन बांधलेले संजय देशमुख यांना उमेदवारी देत उद्धव ठाकरेंनी तगडं आव्हान उभं केलं आहे.
दुसरीकडं महायुतीमध्ये अद्याप या जागेचा तिढा सुटला नसल्याचं अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या भावना गवळी विद्यमान खासदार असल्या तरी शिंदेंच्या पहिल्या यादीत त्यांचं नाव जाहीर करण्यात आलेल नाही.
भावना गवळी यांना पक्षातीलच संजय राठोड यांच्याबरोबर या जागेसाठी स्पर्धा करावी लागत आहे. गेल्या काही महिन्यांत याबाबत दोघांची वक्तव्य समोर आली आहेत. त्याचबरोबर युतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही या जागेसाठी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे.
त्यामुळं यवतमाळ-वाशिम मतदारसंघ राखण्यात शिंदेंना यश येतं की, अजित पवार गटाला ही जागा देऊन भाजप महायुतीतही त्यांच्या धक्कातंत्राचा प्रभाव दाखवतं, हे जागांचा तिढा सुटल्यानंतरच स्पष्ट होईल.
ठाकरे गटाचे संजय देशमुख किती ताकदवान?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानं स्वगृही परतलेल्या माजी मंत्री संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
संजय देशमुख यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाल्यानंतर बराच काळ ते अपक्ष आमदार राहिले. त्यांनी 10 वर्ष दिग्रस आणि आर्णी मतदारसंघाचं विधानसभेमध्ये नेतृत्व केलं. अपक्ष आमदार असतानाही मंत्रिपद मिळवण्याची किमया त्यांनी साधली होती. 2002 ते 2004 या काळात ते राज्यमंत्री होते.
संजय देशमुख आणि संजय राठोड यांची राजकीय कारकिर्द बऱ्याच अंशी समकालीन राहिली आहे. जिल्ह्यामध्ये या दोन्ही नेत्यांकडं एकमेकांचे राजकीय विरोधक म्हणूनच पाहिलं जातं. 2019 मध्ये संजय देशमुख यांचा संजय राठोड यांनी पराभव केला होता.
शिवसेना तालुकाप्रमुख पदापासून ते पक्ष संघटनेतही काम केलं असल्यामुळं संजय देशमुख यांचा जनसंपर्क चांगला राहिलेला आहे. तसंच शिवसेनेच्याच दोन गटांचे उमेदवार आमने-सामने असतील तर संजय देशमुख तगडं आव्हान उभं करू शकतात.
महायुतीच्या उमेदवाराची घोषणा मात्र अद्याप झालेली नाही. महायुतीच्या गोटात सध्या अनेक नावांच्या चर्चा आणि दावे प्रतिदावे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
देशमुखांच्या विरोधात राठोड की गवळी?
मतदारसंघातील विद्यमान आमदार भावना गवळी या पाचवेळा खासदार राहिलेल्या आहेत. त्यामुळं त्यांना सलग सहाव्यांदा संधी मिळणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. हा प्रश्न निर्माण होण्याचं एक कारण म्हणजे संजय राठोडांचं समोर आलेलं नावं.
काही दिवसांपासून शिंदे गटाकडून भावना गवळी यांची उमेदवारी कापत संजय राठोड यांना उमेदवारी दिली जाणार अशा चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यावर प्रतिक्रियाही समोर येत आहेत. भावना गवळींनी तर राठोड यांना उमेदवारी मिळाल्यास आपण त्यांच्या जागी विधानसभा लढवू असंही म्हटलं आहे.
त्याचवेळी ही जागा महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार अशा चर्चाही जोरावर आहेत. राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना तिकिट मिळावं यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. नाईक आणि गवळी यांच्यातील राजकीय संघर्षदेखिल इथं महत्त्वाचा ठरतो.
या सर्वाचा विचार करता गवळी, राठोड आणि नाईक यांच्यापैकी संजय देशमुखांच्या विरोधात कोणतं नाव महायुतीकडून पुढं केलं जाणार याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे.
गुलाम नबी आझादांना इथून दिली उमेदवारी
मतदारसंघ पुनर्रचनेत दोन वेळा बदल झालेला आणि महाराष्ट्राला वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री देणारा हा मतदारसंघ आहे.
पूर्वीच्या खामगाव लोकसभा मतदारसंघाचं रुपांतर होऊ 1977 पासून हा मतदारसंघ वाशिम लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानंतर 2008 मधील पुनर्रचनेनंतर हा यवतमाळ-वाशिम मतदारसंघ बनला.
प्रामुख्यानं 90 च्या दशकापर्यंत इथं काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळालं. 1977 मध्ये वसंतराव नाईक हे वाशिमचे खासदार बनले. त्यापूर्वी अर्जुन कस्तुरे दोन टर्म खासदार होते.
विशेष म्हणजे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस सरकारमध्ये मंत्री राहिलेले गुलाम नबी आझाद हे दोन वेळा इथून खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर अनंतराव देशमुख यांनीही दोन टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.
1996 मध्ये शिवसेनेनं या मतदारसंघातलं अस्तित्व दाखवून दिलं. भावना गवळी यांचे वडील पुंडलिकराव गवळींनी काँग्रेसच्या ताब्यातून हा मतदारसंघ मिळवला. पण दोनच वर्षांत झालेल्या निवडणुकांमध्ये सुधाकरराव नाईक यांनी पुन्हा काँग्रेसला इथं विजय मिळवून दिला.
त्यानंतर मात्र 1999 मध्ये भावना गवळी यांना शिवसेनेनं संधी दिली आणि त्यांनी विजय मिळवला. नंतर या मतदारसंघावरची पकड शिवसेनेनं सैल होऊ दिली नाही. सलग पाच टर्म भावना गवळी याठिकाणच्या खासदार आहेत.
2019 मध्ये माणिकराव ठाकरेंचा पराभव
शिवसेनेनं 2019 मध्ये भावना गवळी यांना उमेदवारी देत त्यांना सलग पाचव्यांदा खासदार बनण्याची संधी दिली. शिवसेनेला बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ राखण्यात पुन्हा एकदा त्यांना यश आलं आणि त्यांनी विजय मिळवला होता.
काँग्रेसनं अनेक दिग्गज नेते दिलेल्या या मतदारसंघातून 2019 मध्ये भावना गवळी यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रमुख नेते माणिकराव ठाकरे यांना गवळी यांच्या विरोधात मैदानात उतरवलं.भावना गवळी यांनी या निवडणुकीत माणिकराव ठाकरे यांचा जवळपास एका लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं पराभव केला. वंचित बहुजन आघाडीची यात महत्त्वाची भूमिका होती, असं म्हणता येऊ शकतं.
वंचितच्या उमेदवारानं या निवडणुकीत 95 हजारांच्या आसपास मतं मिळवली होती. त्यामुळं त्याचा फायदा तेव्हा महायुतीला झाला असं सांगितलं जातं.
गेल्या चार वर्षांतली स्थिती काय आहे?
विधानसभा मतदारसंघांचा विचार करता या मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील दोन आणि यवतमाळमधील चार मतदारसंघांचा समावेश होतो. त्यापैकी 4 ठिकाणी भाजप, एका ठिकाणी शिंदे गट तर एका ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार आहेत. त्यामुळं तसं पाहिलं तर सगळीकडं महायुतीचं वर्चस्व दिसतं.
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर या मतदारसंघातील शिवसेनेचे एकमेव आमदार आणि मंत्री संजय राठोड आणि मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी दोघंही एकनाथ शिंदेंबरोबर गेले.ठाकरे गटाकडून वारंवार ईडी आणि सीबीआयच्या भीतीनं या नेत्यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप केला जात आहे. या घडामोडींनंतर आता मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्येही फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे.
लोकसभेच्या दृष्टीनं या मतदारसंघात कायमच शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. त्यामुळं ठाकरे गटाकडून हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी कंबर कसण्यात आली आहे.
निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उमेदवारी आणि पर्यायानं प्रचाराच्या बाबतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आगेकूच केली आहे. तर महायुतीचं घोडं मात्र उमेदवारीवर अडल्याचं दिसून आलं.
भाजप, शिंदे गट आणि अजित पवार एकत्र असल्यानं त्यांची शक्ती नक्कीच वाढली आहे. पण त्याचबरोबर उमेदवारीवरून सुरू असलेली रस्सीखेच पाहता कोण कुणाला किती मदत करणार असा प्रश्नही निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
त्याचवेळी दुसऱ्या गटातही काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र आहेच. शिवाय संजय देशमुखांचा जनसंपर्क आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून असलेली पोहोच याचाही त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो.
वंचित बहुजन आघाडीनं स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी सुभाष पवार यांना मैदानात उतरवलं आहे. वंचितनं जास्त मतं मिळवली तर महाविकास आघाडीच्या मतांमधून त्याचं विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ग्रामीण भागातील मतदारांची लक्षणीय संख्या पाहता मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रश्न कॉटन सेझ, शेतमालावर प्रक्रिया उद्योग हेही मुद्दे महत्त्वाचे आहेत. तसंच आरोग्य, बेरोजगारी, रेल्वे या प्रश्नांवरही लोक मत मांडत असल्याचं पाहायला मिळत आहेत.
या मतदारसंघामध्ये जातीय समीकरणांचा बराच प्रभाव पाहायला मिळतो. प्रामुख्यानं या मतदारसंघात बंजारा आणि मराठा-कुणबी समुदायाचं प्राबल्य पाहायला मिळतं. त्यामुळं राठोड किंवा नाईक यांच्या उमेदवारीनं महायुती डाव खेळू शकते.
त्यामुळं आता हा मतदारसंघ मिळवण्यासाठी नेमकी कुणाची चाल अधिक प्रभावी ठरणार आणि मतदार कुणाला चेकमेट करणार हे 4 जूनच्या निकालातच समोर येईल.