Christmas: बायबलचं रूपांतर मराठी ख्रिस्तपुराणात करणारे फादर स्टीफन्स
बुधवार, 25 डिसेंबर 2019 (08:23 IST)
ओंकार करंबेळकर
ही गोष्ट आहे 16 व्या शतकातल्या एका ब्रिटिश धर्मगुरुची. आज चारशे वर्षांनीही त्याचं आयुष्य आपल्याला थक्क करायला लावणारं आहे. थॉमस स्टीफन्स नावाचे हे धर्मगुरु मुळचे इंग्लिश खरे. पण रोम आणि पोर्तुगाल मार्गे भारतात गोव्यामध्ये आले आणि इथलेच झाले.
ख्रिस्ताचं जीवन 'ख्रिस्तपुराण' या नावानं मराठीत आणलं, गोवा-वसई अशी भ्रमंतीही केली आणि त्यांनी अखेरचा श्वास गोव्यातच घेतला.
ख्रिस्तपुराणाबरोबच आणखी काही गोष्टींचा मानही फादर स्टीफन्स यांच्याकडे जातो. भारतात स्थायिक होणारे ते पहिले ब्रिटिश व्यक्ती मानले जातात. ख्रिस्तपुराणाबरोबर त्यांनी कोकणी भाषेचं व्याकरणही लिहिलं आहे.
"जैसी पुष्पामांजि पुष्प मोगरी, कि परिमळांमाजि कस्तुरि तैसी भाषांमाजि साजिरी मराठिया पक्षिआंमध्ये मयोरू,वृक्षिआंमध्ये कल्पतरु भाषामधें मानु थोरु, मराठियेसीतारांमधें बारा राशी, सप्त वारांमाजि रवी शशीयां दीपिचेआं भाषामधें तैसी, बोली मराठिया," असं स्पष्ट कौतुक स्टीफन्सनी ख्रिस्तपुराणात केलं होतं. पण या चार-पाच ओळींच्यापलिकडे त्यांच्याबद्दल फारशी माहिती मराठी वाचकांनाच नसते.
इंग्लंड ते गोवा प्रवास
स्टीफन्स यांचं पूर्ण नाव थॉमस स्टीफन्स असं होतं. 1549 साली इंग्लंडमध्ये विल्टशायर परगण्यात क्लिफ पिपर्ड, बुश्टेन इथं त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचं नावही थॉमस असंच होतं आणि आईचं नाव जेन होतं.
विन्चेस्टर कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यावर ते रोमला गेले आणि 1575 साली त्यांनी जेसुईट संघात प्रवेश घेतला. त्यानंतर 4 एप्रिल 1579 पोर्तुगालची राजधानी लिस्बनमार्गे त्यांनी भारताकडे जलमार्गाने प्रावासाला सुरूवात केली.
जेरुसलेमचा वाद नेमका आहे तरी काय?
नारायण वामन टिळक ते रेव्हरंड टिळक; विस्मृतीत गेलेल्या कवीचा प्रवास
स्टीफन्स यांनी केलेलं काम आणि त्यांचं लेखन पाहिलं की, त्यांचा स्वभाव मूलतः शोधकवृत्तीचा, नवं काहीतरी जाणून घेण्याचा आणि आत्मसात केल्यावर दुसऱ्यांना सांगण्याचा असावा असं जाणवतं.
गोव्याच्या प्रवासामध्ये त्यांनी आपल्याला भेटलेले लोक, आलेले अनुभव, प्रवासाचं वर्णन आपल्या वडिलांना पत्रं लिहून कळवलं होतं. 'केप ऑफ गुड होप'ला वळसा घालून 24 ऑक्टोबर 1579 रोजी ते गोव्यात पोहोचले. भारतात ते 39 वर्षं राहिले, त्यातलं एक वर्ष ते वसईलाही राहिले.
गोव्यात भाषांचा अभ्यास
धर्मप्रसाराच्या अभ्यासासाठी आलेल्या थॉमस स्टीफन्स यांनी गोव्यामध्ये आल्यावर कोकणी आणि संस्कृत या भाषा शिकून घेतल्या. मराठीशी त्यांचं नातं जुळलं आणि त्यांनी तीन ग्रंथ लिहून सिद्ध केले. ख्रिस्तपुराणाबरोबर त्यांनी आर्ते दि लिंगोआ कानारिम, दोत्रीना ख्रिस्तां एम् लिंगोआ ब्रमाना कानारिम ही पुस्तकं त्यांनी लिहिली.
पहिले पुराण-दुसरे पुराण
ख्रिस्तपुराण हा त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा. गोव्यात आल्यावर त्यांनी आजूबाजूच्या भागाचं निरीक्षण केलं. इथं लोकांना ख्रिस्ताचं जीवन समजावून सांगायचं झालं तर आपल्याला फक्त त्यांची भाषा समजून चालणार नाही तर त्यांना आवडत असलेल्या शैलीचाही वापर केला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं. मराठी प्रांतात सुरु असलेल्या भक्ती संप्रदायाची मदत त्यांनी घेतली.
शांताराम बंडेलु यांनी संपादित केलेली ख्रिस्तपुराणाची आवृत्ती
भक्ती संप्रदायातील संतांप्रमाणेच त्यांनी ग्रंथ रचायला सुरुवात केली आणि 11 हजार ओव्यांचा ख्रिस्तपुराण ग्रंथ लिहून काढला. त्याचे दोन भाग आहेत. पहिले पुराण म्हणजे ओल्ड टेस्टामेंट किंवा मराठीत ज्याला 'जुना करार' म्हणतात तो भाग. त्यानंतर न्यू टेस्टामेंट् म्हणजे नव्या कराराला त्यांनी दुसरे पुराण (देव पुराण) असे नाव दिले. सगळ्या ग्रंथाची रचना एखाद्या पुराणाप्रमाणेच त्यांनी केली.
ख्रिस्तपुराणाच्या आवृत्त्या
ख्रिस्तपुराण हे मराठीत असलं तरी ते देवनागरी लिपीमध्ये प्रसिद्ध न होता रोमन लिपीमध्ये 1616 साली गोव्यात रायतूर इथं प्रसिद्ध झालं. त्यानंतर त्याची दुसरी आवृत्ती 30 वर्षांनी रायतूरमध्येच प्रसिद्ध झाली. तिसरी आवृत्ती 1654 साली ओल्ड गोवा इथं प्रसिद्ध झाली.
त्यानंतर चौथ्या आवृत्तीचं संपादन जोसेफ सालडान्हा यांनी केलं आणि 1907 साली ती मंगळुरु इथं प्रसिद्ध केली. या पहिल्या चारही आवृत्त्या रोमन लिपीत होत्या.विशेष म्हणजे लंडनमधल्या 'द स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीज'च्या 'मर्सडन कलेक्शन'मध्ये त्याची एक प्रत सापडली आहे. परंतु ती तेथे कशी गेली याचा शोध लागलेला नाही. लंडनमध्ये सापडलेले हस्तलिखित देवनागरी लिपीमध्ये आहे.
'स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज'मध्ये असणारी ख्रिस्तपुराणाची प्रत
1956 साली शांताराम बंडेलु यांनी देवनागरी लिपीतली पहिली आवृत्ती पुण्यात प्रसिद्ध केली. त्यानंतर या ग्रंथाच्या देवनागरी आवृत्त्या आल्या. सर्वात अलिकडची प्रत फादर नेल्सन फलकाव यांनी ख्रिस्तपुराणाची एक आवृत्ती प्रसिद्ध केली आहे.
ख्रिस्तपुराणाच्या छपाईतील अडचणी
ख्रिस्तपुराणाचं काम 1608 साली पूर्ण झालं असलं तरी देवनागरीमध्ये अक्षऱ प्रसिद्ध करण्यासाठी नवे साचे तयार करावे लागणार होते. त्यामुळे हा ग्रंथ छापायला उशीर होत होता. हा ग्रंथ देवनागरीत प्रसिद्ध व्हावा अशी स्टीफन्स यांची इच्छा होती. तशी इच्छा त्यांनी रोमचे जनरल फादर क्लॉडियस आक्वाविवा यांना लिहिलेल्या पत्रात सांगितली होती.
इथल्या भाषेतील अक्षऱं रोमन लिपीसारखी सुटी नसतात ती शब्दाचा एक भागच असतात. त्यासाठी सहाशे साच्यांची निर्मिती करावी लागतील असं त्यांनी कळवलं होतं. परंतु शेवटी सहाशे साच्यांऐवजी दोनशे साचे तयार करुन ख्रिस्तपुराण रोमन लिपीतच छापले गेले. 1556 साली इथिओपियानं प्रिंटिंग यंत्र नाकारल्यावर ते भारतात पाठवण्यात आलं. हे यंत्र गोव्यात आणल्यावर तीन पुस्तकं त्यावर प्रसिद्ध झाली. ख्रिस्तपुराण याच प्रेसवर प्रसिद्ध झालं असं मानण्यात येतं.
स्थानिक भाषेशी समरस
खिस्तपुराणाचं सर्वात वैशिष्ट्य म्हणजे फादर स्टीफन्स यांनी स्थानिक भाषेचा आणि सांस्कृतिक मुल्यांचा अभ्यास करुन वापरलेल्या शब्दांची योजना. आपण ज्यांना उपदेश करायचा आहे किंवा ख्रिस्ताच्या गोष्टी सांगून आपलंसं करायचं आहे, त्यांची संस्कृती वेगळी आहे, त्यांची भाषा-हवामान वेगळं आहे हे त्यांना माहिती होतं. म्हणून बायबल थेट आहे तसं सांगण्यापेक्षा त्यांनी त्या पुराणाचं भारतीयीकरण केलं. गोव्याच्या कोकणातल्या लोकांना समजेल असे शब्द वापरायला सुरुवात केली.
जोसेफ एल. साल्डान्हा यांनी संपादित केलेली आवृत्ती
ख्रिस्तपुराणात त्यांनी काही नव्या संज्ञाही तयार केल्या आहेत. बाप्तिस्माला ज्ञानस्नान, सॅक्रिफाईसला पूजा, टेम्पलला देऊळ, मेडिटेशनला ज्ञानपूजा, ऑल्टरला देव्हारा अशा शब्दांची त्यांनी योजना केली आहे. बायबलमधील मेंढपाळांच्या उल्लेखाच्यावेळेस त्यांनी गोपालु (गाय पाळणारे) असा उल्लेख केला आहे. इथं त्यांनी कोकणात मेंढपाळ आढळत नाहीत याची दखल घेतलेली दिसते. त्याबरोबरच वैकुंठ, भक्ती, मुक्ती, मोक्ष, कर्म असे अनेक शब्द त्यांनी वापरले आहे. नैवेद्य, स्मृती, पूजा, ग्रंथ, शास्त्र, अर्पण, समर्पण हे शब्दही ख्रिस्तपुराणात विपुल आढळतात.
फादर स्टीफन्स यांनी वापरलेल्या शब्दांबाबत बोलताना लेखिका अनुपमा उजगरे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितलं, "गोव्यातल्या लोकांना 'ख्रिस्तपुराण' समजावं म्हणून स्वर्गाला वैकुंठ आणि ख्रिस्ताला वैकुंठपती, वैकुंठराया असे अनेक शब्द त्यांनी वापरले आहेत. तसेच अनेक नव्या शब्दांची भरही त्यांनी घातली आहे. स्थानिक अध्यात्म परंपरेशी सुसंगत साहित्य तयार करण्याचा प्रयत्न विशेष वाटतो."
त्यांच्या या शब्दयोजनेचं थोर समीक्षक डॉ. शं. गो तुळपुळे यांनी कौतुक केलं होतं. "हिंदू मनाला पटेल असा पौर्वात्य वेश आणि ते काव्यरुपाने ख्रिस्तचरित्राला देण्याची कामगिरी पार पाडलेली आहे. भाषा, वृत्त, कल्पना, कवी संकेत इत्यादी, सर्व काव्यांगे त्यांनी अस्सल मराठी ठेवली आहेत. आतील मूर्ती तेवढी येशू ख्रिस्ताची, बाकी मंदिराचा सारा थाट हिंदू पद्धतीचा अशी या पुराणाची रचना आहे", असं तुळपुळे यांनी स्टीफन्स यांच्या लेखनाचं वर्णन केलं होतं.
संत वाड्मयाचा प्रभाव
ख्रिस्तपुराणावर आपल्या मराठी संत वाड्मयाचा जबरदस्त प्रभाव दिसून येतो. ज्ञानदेवांनी जशी सर्वात आधी देवाकडे आराधना केली आहे. तशीच आराधना स्टीफन्स यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात पहिल्याच ओवीत केली आहे.
पहिल्या ओवीत ते म्हणतात,"ओ नमो वीस्वभरीता, देवबापा सर्व समर्थापरमेश्वरा सत्यवंता, स्वर्ग पृथ्वीच्या रचणारा तुं रीधीसीधीचा दातारु, क्रुपानीधी करुणाकरुतुं सर्व सुखाचासागरु, आदी अंतु नातुडे"
सर्व विश्वव्यापी सर्व समर्थ देवबाप्पाला नमस्कार, स्वर्ग आणि पृथ्वीची रचना करणाऱ्या सत्यवंत परमेश्वराला नमस्कार. तू सर्व काही देणारा आहेस. तू कृपानिधी करुणाकर आहेस. तू सर्व सुखाचा सागर आहेस, तू अनादी अनंत आहेस असं ते यातून म्हणतात. या अध्यायाची सुरुवात ते श्री सर्वेश्वर प्रसन्न. श्री देवमाता प्रसन्न. श्री गुरु प्रसन्न असं लिहून करतात.
ज्ञानेश्वरांनी जशी 'तरी न्यून ते पुरते, अधिक ते सरते. करुन घ्यावे हे तुमचे, ग्रंथी इये' असं विनम्रपणे लिहिलं होतं तसंच फादर स्टीफन्स यांनी दुसऱ्या पुराणाच्या शेवटी 'या दोही पुराणां भितरी, कांहि चुकि देखाल जरि. तरि क्षेमां करोन मांझेवरि, न किजे कोपु' म्हणजे या दोन्ही पुराणांमध्ये काही चुका दिसल्या तर मला क्षमा करुन माझ्यावर रागावू नका अशी विनंती केली आहे.
भगवद्गीतेत जसं आत्मा अमर आहे हे सांगण्यासाठी 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः, न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः' असं वर्णन आहे तसंच फादर स्टीफन्स यांनी येशूचं शरीर अमर आहे हे सांगण्यासाठी तशाच शब्दांची योजना केली आहे.
"ना आंग्नीचेन जाळीचे, ना उदकाचेन न भीजजेना वायुचेन शोखीजे, ऐसी कुडि उतमीमारल्यावरि फार, दुखि न पावे शरिरतान भु श्रमु निद्रा, न लागे सर्वथां" अशा शब्दांमध्ये त्यांनी येशूचं शरीर आगीमध्ये जाळलं जाऊ शकत नाही, ते पाण्यात भिजू शकत नाही. त्याला तहान, भूक, श्रम, निद्रा यांची काहीच गरज नाही असं ते करतात.
मराठीमध्ये असा अजोड ग्रंथ तयार करणाऱ्या फादर स्टीफन्स यांनी मडगाव, वसई, सालसेट अशा अनेक ठिकाणी काम केलं. 1619 साली त्यांचा गोव्यात मृत्यू झाला. चारशे वर्षांनंतरही त्यांचं नाव मराठी साहित्य परंपरेत टिकून राहिले आहे.