उन्नाव : बलात्कार पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, दिल्लीच्या रुग्णालयात दाखल
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019 (11:13 IST)
समीरात्मज मिश्र
उत्तर प्रदेशमधल्या उन्नावमध्ये एका बलात्कार पीडित महिलेला आरोपींनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे.
महिलेची अवस्था गंभीर आहे आणि तिला लखनऊच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण रात्री उशीरा तिला दिल्लीतल्या सफदरजंद रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या मध्ये पीडित मुलगी 90 टक्के भाजली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून आणखी दोन आरोपी फरार आहेत.
उन्नावचे पोलीस अधीक्षक विक्रांत वीर यांनी मीडियाला सांगितलं की या महिलेने मार्च महिन्यात दोन लोकांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.
"आम्हाला सकाळी कळालं की बिहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. पीडित मुलीने हॉस्पिटलमध्ये तीन आरोपींची नाव सांगितलं. बाकी दोन आरोपींच्या शोधार्थ शोधपथक बनवलं आहे, आणि इतर दोन आरोपीही लवकरच पकडले जातील," असंही ते म्हणाले.
पण थोड्याच वेळात पोलीस महानिरीक्षक एसके भगत यांनी मीडियाला सांगितलं की तीन आरोपींना त्यांच्या घरातूनच अटक केली तर चौथ्या आरोपीला नंतर अटक करण्यात आली. भगत यांच्यामते सगळ्यांची कसून चौकशी केली जात आहे.
90 टक्क्यांपेक्षा जास्त भाजली महिला
पोलीस महानिरीक्षकांनी आम्हाला सांगितलं की पीडितेने ज्या लोकांनी आपल्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला असं म्हटलं आहे त्यातल्याच एकावर पीडितेवर बलात्कार करण्याचा आरोप आहे. "या आरोपीला अटकही झाली होती आणि काही दिवसांपुर्वीच आरोपी जामिनावर सुटून बाहेर आला होता. पीडितेच्या घरच्यांनी आरोपीकडून कोणत्याही प्रकारची धमकी मिळाल्याचं म्हटलं नव्हत. प्रकरणाची पुढे चौकशी सुरू आहे."
स्थानिक पत्रकार विशाल सिंह यांनी बीबीसीला सांगितलं की पीडितेवर मार्च महिन्यात गँगरेप झाला होता आणि त्या केससाठीच ती रायबरेलीला जात होती. स्टेशनवर जातानाच पाच लोकांनी तिचा रस्ता अडवला आणि पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
लखनऊच्या सिव्हिल हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांच्या मते पीडिता 90 टक्क्याहून अधिक भाजली आहे आणि तिची प्रकृती गंभीर आहे.
मुख्यमंत्र्यांचे आदेश
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेत की पीडितेवर शक्य ते सारे उपचार झाले पाहिजेत आणि त्याचा खर्च सरकार उचलेल.
मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत की आरोपींना कोर्टात कडक शिक्षा मिळेल यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करावेत. या घटनेची सखोल चौकशी करून आपल्याला अहवाल सादर करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
दरम्यान, पीडितेच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की आरोपी जेलमधून सुटून आल्यानंतर त्यांना सतत धमकी देत होता आणि याआधीही त्याने अनेकदा पीडितेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की ज्यांनी पीडितेवर हल्ला केला त्या लोकांनी कमीत कमी 10 ते 15 वेळा त्यांना केस मागे घेण्यासाठी धमकी दिली होती आणि त्यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला होता.
प्रत्यक्षदर्शींनुसार, आग लागली गेल्यानंतर पीडितेच्या किंकाळ्या ऐकून अनेक लोक तिथे जमा झाले. घटनास्थळी एकत्र झालेल्या लोकांनी पोलिसांना बोलावलं.
सकाळी पाचची वेळ होती त्यामुळे आरोपी अंधाराचा फायदा घेऊन आरोपी फरार झाले असं सांगितलं जातंय.
आरोपी फरार झाल्यानंतर पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात पीडितेने आरोपींची नावं सांगितलं तेव्हा पोलिसांनी त्यांच्या शोधार्थ पथक पाठवली.
यामुद्द्यावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेश सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे.
प्रियंका गांधी यांनी ट्वीट केलं आहे, देशाचे गृहमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी काल उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्था सुधारली आहे असं थेट खोटं सांगितलं. इथं रोज असल्या घटना पाहून मनाला दुःख होतं. भाजपा नेत्यांनी असा खोटा प्रचार थांबवला पाहिजे.