उन्नाव: भाजप आमदारावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडितेच्या गाडीला ट्रकची धडक, दोन ठार

उत्तर प्रदेशातील रायबरेलीत झालेल्या 'अपघातात' उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी आणि तिच्या वकिलांना गंभीर दुखापत झाली आहे. तर या मुलीचे दोन नातेवाईकांचा मृत्यू झाला.
 
उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीसहित त्यांचे दोन नातेवाईक आणि वकील गाडीतून जात होते. एका ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली, असं उन्नाव पोलीस ठाण्याचे अधीक्षक माधवेंद्र प्रसाद वर्मा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. हा अपघात रायबरेली परिसरातील गुरबख्शगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याचं उन्नाव पोलिसांनी सांगितलं.
 
वर्मा पुढे म्हणाले, 'या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला. यापैकी एक महिला पीडित मुलीची काकू आहे तर दुसरी महिला काकूची बहीण आहे. पीडित मुलगी आणि वकिलांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर लखनौ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. उन्नाव पोलीस पीडित मुलीच्या आईला घेऊन लखनौला जात आहेत'.
 
ट्रक ड्रायव्हरने घटनास्थळाहून फरार झाला होता, मात्र त्याला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे, असं गुरबख्शगंज पोलीस ठाण्याचे SHO राकेश सिंग यांनी सांगितलं. दरम्यान ज्या ट्रकने पीडित मुलीच्या गाडीला धडक दिली त्याच्या नंबरप्लेटमध्येही गडबड असल्याचं स्थानिक पत्रकार स्वरूप यादव यांनी सांगितलं. यासंदर्भात फॉरेन्सिक चौकशी सुरू असून, पीडित मुलगी तसंच तिच्या कुटुंबीयांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली जाईल, असं रायबरेलीचे पोलीस अधीक्षक सुनील सिंग यांनी सांगितलं.
 
दरम्यान, हा अपघात रायबरेलीमध्ये झाला आहे आणि रायबरेली पोलिसांनीच जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखलं केलं आहे, असं माधवेंद्र प्रसाद वर्मा यांनी सांगितलं. मात्र रायबरेली पोलिसांनी याबाबत कोणताही माहिती दिली नाही.
 
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये उन्नाव बलात्कार प्रकरण उघडकीस आलं होतं. बांगरमऊ मतदारसंघाचे भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर यांच्यावर माखी गावातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. हीच पीडित मुलगी रविवारी झालेल्या अपघातात गंभीररीत्या जखमी झाली आहे.
 
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीने त्यांच्यावर आरोप केले होते आणि या प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBIने कुलदीप सेंगर यांना अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. याप्रकरणावरून उत्तर प्रदेशातील राजकारण पेटलं होतं. याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होईल, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं होतं. जून 2019 मध्ये भाजप खासदार साक्षी महाराज यांनी सीतापूर जिल्ह्यातील तुरुंगात कुलदीप सेंगर यांची भेट घेतली होती. या भेटीवरून वादंग निर्माण झाला होता. "कुलदीप सेंगर उत्तर प्रदेशातील लोकप्रिय नेते आहेत. निवडणुकीनंतर त्यांना धन्यवाद देण्यासाठी मी त्यांची भेट घेतली," असं साक्षी महाराज यांनी सांगितलं होतं.
उन्नाव प्रकरण काय आहे?
जून 2017 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप कुलदीप सेंगर यांच्यावर आहे. "नोकरी मागण्यासाठी नातेवाईकांबरोबर कुलदीप यांच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी माझ्यावर बलात्कार केला," असा आरोप पीडित मुलीने केला. पीडित मुलीची तक्रार सुरुवातीला पोलिसांनी नोंदवून घेतली नाही. कुलदीप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांवर तक्रार नोंदवून न घेण्याचा दबाव आणल्याचा आरोप मुलीच्या घरच्यांनी केला होता आणि त्यानंतर पीडित मुलीच्या घरच्यांनी न्यायालयीन लढाईचा मार्ग स्वीकारला होता. दरम्यान, पीडित मुलीच्या वडिलांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला.
 
मृत्यूआधीचा त्यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता, ज्यात कुलदीप यांचा भाऊ आणि अन्य काही लोकांनी पोलिसांच्या उपस्थितीत आपल्याला मारहाण केल्याचं म्हणताना दिसत होते. ही घटना 3 एप्रिलची होती. पोलिसांच्या निष्क्रियतेला आणि कुलदीप आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या दंडेलशाहीला कंटाळून पीडित मुलीने मुख्यमंत्री योगी यांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं.
 
त्यानंतर कुलदीप सेंगर यांच्याविरोधात उन्नावमधील माखी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली. प्रशासनाने याप्रकरणाचा तपास CBIने करावा, असे आदेश दिले होते. CBIने कुलदीप यांना अटक केली होती. याप्रकरणाच्या तपासात होत असलेल्या दिरंगाईबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने खेद व्यक्त केला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती