15 ओव्हर आणि 38 धावांत आयर्लंडचा सुपडा साफ

सव्वा दोन दिवस, चार इनिंग्ज आणि 40 विकेट्स या कल्लोळात इंग्लंडने सख्खे शेजारी आयर्लंडला एकमेव कसोटीत 143 धावांनी चीतपट केलं. चौथ्या डावात 182 धावांचं लक्ष्य मिळालेल्या आयर्लंडचा डाव अवघ्या 38 धावांतच आटोपला.
 
पहिल्या डावात अवघ्या 85 धावांत आटोपलेल्या इंग्लंडने आयर्लंडविरुध्दच्या एकमेव कसोटीत खळबळजनक विजयाची नोंद केली. आयर्लंडला विजयासाठी 182 धावांचं लक्ष्य मिळालं होतं मात्र इंग्लंडच्या भेदक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर आयर्लंडचा डाव 15.4 ओव्हर्समध्ये 38 धावांवरच गडगडला आणि इंग्लंडने 143 धावांनी विजय मिळवला.
 
ख्रिस वोक्सने 17 धावांत 6 विकेट्स घेत आयर्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. स्टुअर्ट ब्रॉडने 19 धावांत 4 विकेट्स घेत वोक्सला चांगली साथ दिली. दहा दिवसांपूर्वी इंग्लंडने लॉर्डस इथेच न्यूझीलंडला नमवत पहिल्यांदाच विश्वविजेतेपदावर नाव कोरलं होतं.
 
आयर्लंडविरुध्दच्या एकमेव कसोटीत इंग्लंडची दाणादाण उडाली आणि त्यांचा पहिला डाव 85 धावांतच आटोपला. टिम मुर्तगाने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. आयर्लंडलने 207 धावांची मजल मारत मोठी आघाडी मिळवली. अलेक्स बलर्बिनीने सर्वाधिक 55 धावा केल्या.
 
इंग्लंडने दुसऱ्या डावात चिवटपणे खेळ करत 303 धावांची मजल मारली. नाईट वॉचमन जॅक लिचने 92 तर जेसन रॉयने 72 धावांची खेळी केली. इंग्लंडने आयर्लंडसमोर 182 धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र गवत असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत आयर्लंडचा धुव्वा उडवला. एक तारखेपासून इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेला सुरुवात होत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती