पाकिस्तान प्रशासित काश्मीरच्या मुद्यावरून नरवणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते चौधरी यांनी जनरल नरवणे यांना "कमी बोला, काम जास्त करा," असा सल्ला दिला आहे.
अधीर रंजन चौधरी ट्विटरवर लिहितात, "पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावरून 1994 मध्ये संसदेत आधीच प्रस्ताव संमत झाला आहे. पुढची कारवाई करण्यासाठी सरकारकडे स्वातंत्र्य आहे. सरकार पुढची दिशा देऊ शकतं. जर पाकव्याप्त काश्मीर मध्ये कारवाई करायची असेल तर तुम्ही CDS आणि पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधा, कमी बोला आणि काम जास्त करा."
काश्मीरवरून विचारले प्रश्न
लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी शनिवारी दिल्लीत झालेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत म्हणाले, "पाकव्याप्त काश्मीर भारतात असावं, असं भारतीय संसदेला वाटतं. जेव्हा आम्हाला याबाबत आदेश मिळतील तेव्हा आम्ही योग्य ती कारवाई करू."
नरवणे यांच्या वक्तव्यावर पाकिस्ताननेही प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते म्हणाले, "भारतीय लष्करप्रमुखांचं वक्तव्य म्हणजे त्यांची नेहमीची शाब्दिक कवायत आहे. अंतर्गत गोष्टींपासून लोकांचं लक्ष वळवण्यासाठी हे सगळं सुरू आहे."