ध्यानाचा संबंध साधारणपणे मन आणि मेंदूशी जोडला जातो. शरीरासाठी आहार आणि व्यायाम गरजेचा आहे, अगदी त्याचबरोबर ध्यानही जरूरीचे आहे. धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांसाठी ध्यान हे ईश्वर प्राप्तीचे आणि मोक्षाचे साधन आहे. काहींच्या मते ध्यान अध्यात्मिक प्रक्रिया आहे. प्रत्येक धर्मात, पंथात किंवा विचारसरणीत ध्यानाविषयी काहीना काही बोलले, लिहिलेले आहेच. आस्तिक असो वा नास्तिक ध्यानाचे महत्त्व त्यांनाही पटले आहेच.
ध्यानाचा संबंध मन, मेंदू, देव, मोक्ष किंवा अध्यात्माबरोबरच शरीराशीही तेवढाच आहे. याशिवाय निसर्गात जे काही दिसते त्या सर्वांचा संबंध ध्यानाशी आहे.
ND
या जगात जे काही जड आहे किंवा चेतन आहे, ते सर्व एकमेकांशी जोडले गेले आहे. एकमेकांवर त्याचा प्रभाव पडतो. अगदी सहजगत्या हे आपल्या लक्षात येईल. मानवाचे शरीर एरवी एक स्थूल पदार्थ असल्याचे आपल्याला वाटते. पण ध्यानाच्या माध्यमातून त्याकडे पाहिले तर तेच शरीर मेणासारखे मऊ, अतिशय तरल असे वाटते. या तरंगांप्रमाणे झालेल्या शरीराला ध्यानावस्थेत कोणत्याही प्रकारचा आकार देता येतो. या प्रकारच्या शरीरात कोणताही विकार नसतो. थोडक्यात ध्यानावस्थेत व्याधीरहित शरीर शक्य आहे. त्यामुळे केवळ मनच नव्हे तर शरीरातही ध्यानाद्वारे बदल घडवता येतात.
पूजेसाठी ज्याप्रमाणे विविध वस्तूंची गरज असते. त्याप्रमाणे ध्यनासाठीही अनेक प्रकारची सामग्री आणली जाते. पण सर्व काही केल्यानंतर आपण डोळे बंद करतो तेव्हा लक्षात येते आपले मन किती चंचल आहे ते. एका ठिकाणी टिकतच नाही. खरेतर ध्यान ही काही करण्याची क्रिया नाही. काहीच न करणे आणि कोणताही विचार न करणे म्हणजेच ध्यान आहे. मनाच्या पाटीवरची सर्व अक्षरे धुऊन पुसून काढून पाटी स्वच्छ करणे हेच ध्यानाचे कार्य आहे.
शरीर हाही मनाचाच एक भाग आहे. मनाचे स्थूल रूप आहे शरीर. आपल्या शरीरात खरे तर तीन शरीरे असतात. एक भौतिक शरीर जे आपल्याला डोळ्यांनी दिसते ते. दुसरे मनरूपी शरीर. जे दिसत नाही, पण त्याचे असित्व आहे. आणि तिसरे चेतन शरीर. भौतिक आणि चेतन शरीराच्या मध्ये मनरूपी शरीर आहे. या तीनही देहावस्था एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. तिघांना वेगळे करणे कठिण आहे. याचे कारण आहे, चंचल असलेले मन. जर हे मन ध्यानाद्वारे स्थिर झाले तर या तिन्ही देहावस्था आपल्याला पाहता येतात. त्यांचे मूळ स्वरूप आपल्याला दिसू शकते. अनुभवता येते. मनाला दोन प्रकारच्या गती आहेत बाह्य आणि आंतरीक. भौतिक पदार्थांच्या दिशेने जाते ती बाह्य गती आणि आंतरिक गती म्हणजेच ध्यान.