भारताच्या स्वतंत्र शोधातही आढळले चंद्रावर पाणी!

भारताने चांद्रयानासोबत पाठवलेल्या 'मून इम्पॅक्ट प्रोब' (एमआयपी) या उपकरणाने दिलेल्या माहितीतूनही चंद्रावर पाणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरूवारी (ता. २४) नासानेही याच चांद्रयानासोबत पाठवलेल्या एम-३ या उपकरणाने गोळा केलेल्या माहितीच्या आधारे चंद्रावर पाणी सापडल्याचे जाहीर केले होते. आता भारताच्या स्वतंत्र शोधातही चंद्रावर पाणी आढळले आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे प्रमुख जी. माधवन यांनी आज एका पत्रकार परिषदेत या निष्कर्षांची अधिकृत घोषणा केली. या शोधाने चांद्रयान-१ ही मोहिम सुफळ संपूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.

चांद्रयानाने लक्षणीय कामगिरी केली आहे. वेळेआधीच संपलेल्या या मोहिमेतून आधी ९५ टक्केच उद्दिष्टपूर्ती झाल्याचे आम्ही म्हणत होतो. आता मात्र, आता या यानाने ११० टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे, असे म्हणता येईल, असे अत्यानंदित झालेल्या नायर यांनी सांगितले.

चंद्रावर पाणी सापडल्याचा शोध हा महत्त्वपूर्ण असल्याचे जगाने मान्य केले आहे, असे अभिमानाने सांगत आमचे मुख्य उद्दिष्ट हेच होते, हेही त्यांनी स्पष्ट केले.

या शोधात महत्त्वाची भूमिका बजावलेले इस्त्रोचे डॉ. जे. एन. गोस्वामी आणि नास्चाय एम३ प्रोबचे कार्ल पीटर्स यांचे अभिनंदन करून नायर म्हणाले, या यानाच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेली माहिती प्रचंड आहे. तिचा अभ्यास करून ती समजून घेण्यासाठीच किमान सहा महिने ते तीन वर्षे लागतील.

चंद्रावर पाणी सापडले म्हणजे नेमके काय हे स्पष्ट करताना नायर म्हणाले, चंद्राच्या ध्रुवीय भागात आम्हाला पाणी (एचएचओ) आणि हायड्रोक्साईल (एचओ) यांचे घटक सापडले. चंद्रावरचे हे पाणीसमुद्र, तलाव किंवा एखाद्या थेंबाच्या स्वरूपात अस्तिवात नाहीये. तिथल्या खनिज संपत्तीत पाण्याचे अंश आहेत. पाणी या शुद्ध रूपात ते अस्तित्वात नाही. अर्थात, खनिज स्वरूपात असलेले पाणीही आमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात तेथे उपलब्ध आहे. या खनिजातून हे पाणी वेगळे काढता येईल. पण एकूण खनिजाच्या प्रमाणात त्यातून निघणारे पाणी कमी असेल. म्हणजे एक टन मातीतून जेमतेम अर्धा लीटर पाणी हाती लागेल.

चंद्रावर पाण्याचे घटक कसे काय आले? याविषयी आम्हालाही आश्चर्य वाटतेय, असे सांगून प्राथमिक अभ्यासानुसार कदाचित सौरवार्‍यांच्या चंद्राच्या भूभागावर सतत आदळण्यामुळे हे घटक तयार झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, या सौर वार्‍यांमध्ये हायड्रोजनचे अस्तित्व असते आणि चंद्रावरच्या जमिनीतील खनिजात ऑक्सिजन काही प्रमाणात आहे. या दोन्हीच्या मिश्रणातून पाणी (एचएचओ) किंवा हायड्रोक्साईल (एचओ) तयार झाले असण्याची शक्यता आहे.

अर्थात, चंद्रावर पाण्याचे घटक सापडले आहेत. थेट पाणी नाही. त्यामुळे तेथे जीवसृष्टी असण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रावर आपला एखादा तळ उभारण्यासंदर्भात आणखी संशोधन होण्याची शक्यता आहे. त्यानंतर असे काही घडू शकेल, असे ते म्हणाले. चंद्रावर तळ उभारणीसाठी तिथला ध्रुवीय प्रदेश महत्त्वाचा ठरू शकेल. ध्रुवीय भाग थंड असला तरी तिथे काही भागात सूर्यप्रकाशही पोहोचतो. पाण्यासाठी त्याचीच आवश्यकता असणे गरजेचे असते.

चंद्राचा आणखी शोध घेण्यासाठी मानवरहित यान किंवा मानव असलेले यान पाठविण्याची गरज आता असल्याचे नायर म्हणाले. फिजीकल रिसर्च लॅबोरेटरीचे संचालक डॉ. गोस्वामी यांनी तांत्रिकदृष्ट्या चंद्रावर पाणी सापडल्याच्या घटनेचे विश्लेषण केले.

वेबदुनिया वर वाचा