श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा बुधवारी सकाळी 6 वाजता सासवडकडे मार्गस्थ झाला. पहाटे सोहळाप्रमुख डॉ. प्रशांत सुरू याच्या हस्ते ‘श्री’ची पूजा झाली. त्यानंतर पालखी सोहळा हडपसरकडे मार्गस्थ झाला. सकाळी 8-30 वाजता शिंदे छत्री येथे आरती करण्यात आली.
सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती. रिमझिम पावसात पुणेकरांनी ज्ञानोबा-तुकाराम या दोन्ही संताच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. सकाळी 9-30 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हडपसर येथे पोहोचला.
येथे सोहळ्याने सकाळची न्याहरी घेतली व सोहळा पुढे दुपारच्या मुक्कामासाठी देवाची उरळी येथे साडेबारा वाजता पोहोचला. येथे सरपंच नीता भाडळे यांनी सोहळ्याचे स्वागत केले. तासाच्या विश्रंतीनंतर सोहळा वडशी नालाकडे मार्गस्थ झाला. रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती. या झाडीतून वाट काढीत सोहळा पुढे मार्गस्थ होत होता. यावर्षी हजारो पुणेकर माउलीना निरोप देण्यासाठी पुणे ते दिवेघाट या वाटचालीत सहभागी झाले होते. यामुळे वैष्णवंचा मेळ्याचा प्रवाह रस्त्यावरून वाहताना दिसत होता. दुपारी अडीच वाजता सोहळा वडशी नाला येथे पोहोचला. त्यावेळी ग्रामस्थांनी माउलींचे दर्शन घेऊन सोहळ्याचे स्वागत केले. दुपारी 3-30 वाजता सोहळा दिवेघाटाकडे मार्गस्थ झाला. या सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते आमदार विजय शिवथरे यांच्यासह असंख्य भाविक सहभागी झाले होते. दिवेघाटातून पालखी सोहळा साडेपाच वाजता झेंडेवाडी येथे पोहोचला. यावर्षी अत्याधुनिक रथ बनविण्यात आल्याने त्याला फक्त एकच बैलजोडी जोडण्यात आली होती. त्यामुळे हिरव्या गर्द सह्याद्रीच्या पर्वतरांगातून सोहळा जात असताना सुध्दा वारकर्यामध्ये चैतन्य दिसून येत नव्हते. झेंडेवाडी येथे माजी मंत्री दादा जाधवराव यांनी स्वागत केले. त्यानंतर सायंकाळी 7-30 वाजता सोहळा सासवड मुक्कामी पोहोचला. येथे सोहळ्याचा दोन दिवस मुक्काम आहे.