महाराष्ट्रपासून मुंबईला तोडण्याचे कोणी स्वप्न पाहू नये - उद्धव ठकारे

सोमवार, 13 ऑक्टोबर 2014 (12:18 IST)
विदर्भ वेगळा करून महाराष्ट्र तोडणार्‍यांना विरोध तर राहणारच; पण कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रालाही महाराष्ट्रात आणण्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईत झालेल्या एका जाहीर सभेत केली. येत्या २0१६ साली शिवसेनेचा सुवर्ण महोत्सव माझा मुख्यमंत्री साजरा करेल आणि त्या वेळी माझ्या कमीत कमी ५0 योजना पूर्ण झालेल्या असतील, असेही त्यांनी या वेळी जाहीर केले.
 
या सभेत उद्धव ठाकरे महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे शिवसैनिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आपल्या सभेची सुरुवात करतानाच ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. संपूर्ण भाषणात त्यांनी भारतीय जनता पार्टी तसेच मोदी यांच्यावरच टीका करण्यावर भर दिला. बडी बडी माणसे प्रचारासाठी मुंबईत आली आहेत. कानाकोपर्‍यात सभा घेत आहेत. गुजरातमधून बसेस भरून माणसे आणली गेली आहेत, असे ते म्हणाले. युती भाजपाने तोडली. तेव्हापासून केंद्रातील मंत्रिमंडळ महाराष्ट्रात फिरत आहे. या सगळ्यांचे मोबाईल नंबर लिहून ठेवा. निवडणुकीनंतर कोण फोन उचलतो का बघा. शिवसेनेचे प्रेम अनुभवले, आता धग सोसा. संकटे येवोत, वाटेत निखारे असोत, ज्वाळा असोत, हात सोडायचा नसतो. आता 'अच्छे दिन' आले तर साथ सोडली. महाराष्ट्रातील जनतेने ताट वाढून ठेवले होते. तुम्ही कर्मदरिद्रीपणा केला. आता एकट्याने सरकार बनवणार, असे ते म्हणाले.
 
भाजपात मुख्यमंत्रीपदाबाबत एकवाक्यता नाही. पंतप्रधान मोदी महाराष्ट्राचे तुकडे होणार नाहीत म्हणतात तर त्यांचे प्रदेशाध्यक्ष फडणवीस स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा कायम असल्याचे सांगतात. केंद्रात मनमोहन सिंग यांचे सरकार असताना मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी विकास केलाच ना. सरकार कोणाचे हे महत्त्वाचे नाही तर मुख्यमंत्री महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीची भांडी घासणार नाही. दिल्लीपुढे झुकणार नाही. शेपूट हलवणार नाही. युती टिकवण्यासाठी यांच्या अटी स्वीकारल्या असत्या तर शिवसेना संपली असती. शिवसैनिक मला प्यारा आहे. जिंकल्यावर तर आपल्यासमोर नतमस्तक होणारच आहे; पण आता लढायला हिंमत दिल्याबद्दलही नतमस्तक आहे, असेही ठाकरे म्हणाले.
 
पृथ्वीराज चव्हाण स्वत:ला स्वच्छ म्हणतात. मग साबणाच्या जाहिरातीत काम करा. बिनकामाचे मुख्यमंत्री. गारपीट झाली, दुष्काळ पडला तरी यांच्या डोक्यावरचा कोंबडा हलत नाही. सिंचनाची फाईल उघडली असती तर अजित पवार यांची जयललिता झाली असती, असे ते म्हणतात. मग का नाही उघडली? राष्ट्रवादीचे उमेदवार वाघ यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले. लक्ष्मण माने, लक्ष्मण ढोबळे यांच्यावरही बलात्काराचे आरोप झाले. सगळे राष्ट्रवादीचे. तेव्हा पृथ्वीराज झोपले होते का? त्या वेळी का नाही दिला राजीनामा? तेव्हा राजीनामा दिला असता तर आम्ही तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री बनवले असते, असेही ठाकरे म्हणाले. अजित पवार यांना पाठिंबा देण्यासही आपण तयार आहोत; पण एका सोप्या अटीवर. त्यांच्या घरी जायचे आणि एक ग्लास पाणी प्यायचे, असे म्हणत ठाकरे यांनी अजित पवार यांच्या पाण्यासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्याची आठवण करून दिली.

वेबदुनिया वर वाचा