...तर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री बनवा- राजू शेट्टी
बुधवार, 24 सप्टेंबर 2014 (10:37 IST)
शिवसेना आणि भाजपच्या जागावाटपाच्या गुर्हाळात महायुतीमधील अन्य घटकांना डावलले जात आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेते नेते राजू शेट्टी यांनी सेना-भाजपसमोर एक नवा प्रस्ताव ठेवला आहे. सेना आणि भाजप सर्वच्या सर्व 288 जागा लढवाव्या, पण रामदास आठवले आणि महादेव जानकर यांना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री बनवावे. यामुळे शेट्टी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत वांद्र्यातल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये महायुतीतील जागावाटपाचे गुर्हाळ सुरुच होते. यात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी घटकपक्षांची केवळ सात जागांवर बोळवण करण्याचा प्रयत्न केला.
शिवसेना आणि भाजपच्या या प्रस्तावामुळं संतापलेल्या राजू शेट्टी यांनी शिवसेना-भाजपसमोर एक नवीन प्रस्ताव ठेवला आहे. भाजप-सेनेला जास्त जागांची भूक आहे. त्यामुळे त्यांनी विधानसभेच्या सर्वच्या सर्व 288 जागा लढवाव्या, पण मुख्यमंत्रिपद घटक पक्षांच्या नेत्यांना द्यावे, अशी मागणीच राजू शेट्टी यांनी युतीकडे केली आहे.