अमित शहांनी साधला उद्धव ठाकरेंशी दूरध्वनीवरून संवाद

सोमवार, 22 सप्टेंबर 2014 (14:50 IST)
महायुती ही आबाधित राहावी तसेच जागावाटप हा वादाचा मुद्दा होऊ नये, या पाश्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांच्याशी दूरध्वनीवरून आज सकाळी संवाद साधला. भाजप आणि शिवसेना यांच्यातील 'युती' तुटण्याच्या मार्गावर आल्यामुळे शहा यांनी उद्धव यांना फोन केल्याचे समजते. 
 
शिवसेना आपल्या 'मिशन 150'वर ठाम असून भाजपही आता तडजोड करायला तयार नाही. महाराष्ट्र निवडणूक प्रभारी ओम माथूर सोमवारी सायंकाळी उद्धव ठाकरेंना 'मातोश्री'वर भेट घेणार आहेत. भाजपतर्फे ही अंतिम चर्चा असेल, असे संकेतही भाजप नेत्यांनी दिल्याची माहिती समजते.  
 
दरम्यान, शहा आणि उद्धव यांच्यात 15 मिनिटे फोनवर संभाषण झाले. दोघांत जागावाटप व महायुतीबाबत चर्चा झाली. 
 
दुसरीकडे, महायुतीमधील अन्य घटकपक्ष सैरभैर झाले आहेत. भाजप व शिवसेनेच्या वादात घटकपक्ष भरडले जात आहे. शिवसेना- भाजपने जागावाटपाचा तिढा एक-दोन दिवसांत सोडवा अन्यथा आम्हाला तिसरी आघाडी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटले आहे. 

वेबदुनिया वर वाचा