व्हॅलेंटाइन डे : 'फ्रेंड झोन' सारखं खरंच काही असतं का?

बुधवार, 14 फेब्रुवारी 2024 (17:38 IST)
'व्हेन हॅरी मेट सॅली' हा हॉलिवुडच्या अत्यंत प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटातला हिरो म्हणजेच हॅरी बर्न्स म्हणतो, "पुरुष आणि महिला कधीही मित्र असू शकत नाही. कारण त्यात नेहमी सेक्सचा अडथळा येत असतो."
 
तर चित्रपटात सॅलीचं पात्र साकारणाऱ्या मुलीने तर तिच्या अशा मित्रांची यादीच तयार केली असते, ज्यांच्याशी तिची अत्यंत जवळची मैत्री आहे, पण लैंगिकतेचा किंवा आकर्षणाचा त्या मैत्रीशी जराही संबंध नाही. मैत्री आकर्षणाशिवायही होऊ शकते, असं तिचं अगदी स्पष्ट मत आहे. पण हॅरी मात्र तिच्या मताशी सहमत नसतो. पुढे मग हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात...अशी एकंदर चित्रपटाची कथा आहे.
 
पण हा या लेखाचा विषय नाही. या लेखाचा विषय आहे की 'फ्रेंड झोन' सारखी गोष्ट अस्तित्वात असते का? याचं निमित्त म्हणजे व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी अनेकांना हा अनुभव आला असू शकतो, की त्यांच्या प्रेमाला नकार देताना समोरच्या व्यक्तीने, 'मी तुला केवळ मैत्रीच्या नजरेतूनच पाहिलं आहे, एका प्रेमी किंवा प्रेमिकेच्या नाही', असं कारण देण्यात आलेलं असू शकतं. तेव्हा या दिवशी ही चर्चा अत्यंत महत्त्वाची ठरते की 'फ्रेंड झोन' खरंच असतो का?
 
कोण चूक, कोण बरोबर?
फ्रेंड झोनचा मुद्दा तपासण्यासाठी या विषयी पुरुष-महिला कसा विचार करतात हे समजून घेण्यात आलं. त्यातूनच हा विषय समजण्यास मदत झाल्याचं अभ्यासक सांगतात. लोक लैंगिक आकर्षणाबद्दल कसा विचार करतात आणि आपल्याला मैत्री करण्यासाठी सर्वांत आधी कोणत्या गोष्टी प्रेरित करतात, हे समजण्यासही यातून मदत मिळते.
 
धोका आणि बक्षीस
एखाद्या मित्राबरोबर मैत्री करताना पाऊल पुढं टाकणं म्हणजे धोका आणि बक्षीस या दोन्हीचं संतुलन असतं. तसंच महिलांच्या तुलनेत पुरुष हे विरुद्ध लिंगाच्या मित्रांकडं म्हणजे मैत्रिणीकडं अधिक आकर्षित होत असतात. दोघेही नात्याला शुद्ध मैत्रीपुरतंच मर्यादित ठेवत असले, तरी तसंच घडत असतं. एका संशोधनादरम्यान, पुरुष आणि महिलांना याचं मूल्यांकन करण्यासाठी, ते एकमेकांकडे किती प्रमाणात आकर्षित झालेले आहेत, असं विचारलं.
 
तसंच मित्र आपल्याकडे किती प्रमाणात आकर्षित असल्याचं वाटतं, असंही त्यांना विचारण्यात आलं होतं. पुरुषांनी ते महिलांना किती आकर्षित वाटतात, याबाबत काहीसा जास्त अंदाज व्यक्त केला. तर महिलांनी पुरुष त्यांच्याकडं किती आकर्षित होतात, याबाबतचा अंदाज सरासरीपेक्षा कमी व्यक्त केला.
 
जे लोक स्वतःला खूप जास्त आकर्षक समजत असतात, ते त्यांच्याप्रती इतरांच्या लैंगिक आवडीही जास्त ओळखण्याची शक्यता असते. पण आकर्षक असण्याचा आत्मविश्वास त्यांना धोका पत्करण्यास भाग पाडतो. किंवा त्यांना ते आहेत त्यापेक्षा जास्त आकर्षक आहे असं वाटत असतं. त्यामुळं त्यांना तुलनेनं अधिक नकार मिळत असतात. वेन स्टेट युनिव्हर्सिटीतील मानसशास्त्रज्ञ अँटोनिया अॅबी हे नात्यांविषयीचा अभ्यास करतात. "आपण एखाद्या गोष्टीबाबत अपेक्षा करू लागलो की, आपण त्याकडं पाहू लागतो," असं ते सांगतात.
 
"कोणी तुमच्याकडं लैंगिकदृष्ट्या आकर्षित होत आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हीही त्यांच्याकडे अधिक पाहता. म्हणजे जेव्हा ती व्यक्ती पुढाकार घेते, हसते किंवा दुसरं काही करते तेव्हा. ते त्यांच्याकडं लैंगिक दृष्टिकोनातूनच पाहतात. पण ते जेव्हा दुसऱ्या व्यक्तीकडं झुकत असतात, तेव्हा ती व्यक्ती मागं सरकलेली असते, हे कदाचित त्यांच्या लक्षात येत नाही," असंही ते म्हणाले.
 
संशोधनाच्या पुढच्या भागामध्ये संशोधकांना इतर लोकांना चर्चा ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी बोलावलं. दोघांपैकी कोण कुणाकडं किती आकर्षित झालेलं आहे, याचं त्यांना मूल्यांकन करण्यास सांगण्यात आलं. पुरुष निरीक्षकांनी पुरुषांच्या मताशी सहमती दाखवली. त्यांच्या मते, महिलेनं सांगितलं त्यापेक्षा ती पुरुषाकडं अधिक आकर्षित होती. तर महिला निरीक्षक महिलेच्या मताशी सहमत होत्या. त्यांच्या मते, महिलांमध्ये त्यांनी सांगितलं तसंच पुरुषांबाबत कमी आकर्षण होतं. त्यामुळं आतापर्यंत हॅरी आणि सॅली दोघंही बरोबर होते.
 
हे कदाचित लैंगिकतेबाबत असलेल्या रुढीवादी विचारांमुळं असू शकतं. अॅबीसारखे संशोधक ज्यांच्यामध्ये रोमँटिक काहीतरी घडायला सुरुवात होणार आहे, त्यांचा अभ्यास करतात. त्याला डेटिंग स्क्रिप्ट्स म्हटलं जातं. या स्क्रिप्टमुळं अशा काही घटनांचा क्रम समोर येतो जो रोमान्सच्या यश किंवा अपयशाकडं जात असतो. त्यातून असं समोर येतं की, बहुतांश वेळा आपण आधीपासूनच एका ठराविक भूमिकेत असतो. "अशा प्रकारच्या संभाषणांमध्ये संदर्भ अत्यंत महत्त्वाचा असतो," असं अॅबी म्हणतात.
 
"कदाचित महिलांच्या तुलनेत पुरुष आकर्षणासाठीचे संकेत अधिक प्रमाणात शोधत असतील. कारण आधीपासून असं सांगण्यात आलेलं आहे की, पुरुषानंच पुढाकार घ्यायला हवा. तसं पाहिलं तर ही जुन्या काळातली गोष्ट वाटते. पण काही संशोधनांवरून हे स्पष्ट झालं आहे की, अजूनही लोकांच्या मनात अशा प्रकारच्या रुढी किंवा जुन्या गोष्टी कायम असतात. म्हणजे, कोणी आधी विचारावं, पैसे कोणी द्यावे अशा काही गोष्टींबाबत साचेबद्ध विचारच केला जातो. महिला मागंच राहतात, आणि पुरुषांवर पुढाकार घेण्यासाठीचं एक प्रकारचं दडपण असतं."
 
पण जर विषमलिंगी जोडप्यांमध्ये पुरुषांनी पुढाकार घ्यायचा असतो? तर मग लेस्बियन (महिला समलिंगी) जोडप्यांबाबत काय? गे पुरुषांच्या तुलनेत लेस्बियन महिलांच्या स्क्रिप्ट या सेक्सपेक्षा इंटिमसीवर अधिक केंद्रीत असतात. उभयलिंगींसाठी जरी आकर्षणाचा मुद्दा विषमलिंगींच्या संदर्भात योग्य ठरत नसला तरी, त्यांच्या कृतीवरून पारंपरिक अपेक्षांचं ओझं स्पष्टपणे पाहायला मिळतं. त्यामुळं उभयलिंगी महिला डेटवर असताना असंच वर्तन करतात जसं एखाद्या विषमलिंगी महिलेनं वर्तन करण्याची इतरांना अपेक्षा असते. त्याचप्रकारे काही प्रमाणात अस्पष्ट असलेल्या समलैंगिक मैत्रीचे काही फायदेही आहेत.
 
पुरुषांच्या तुलनेत महिलांनी त्यांच्या विषमलिंगी मित्रांकडून अधिक संरक्षण मिळत असल्याचं सांगितलं. त्याचा प्रचंड फायदा असल्याचंही त्यांनी मान्य केलं. विषमलिंगी मित्र इतरांना आकर्षित कसं करावं यासाठी सल्ला देऊन मदत करतात, असं पुरुष आणि महिला दोघांनीही सांगितलं. म्हणजे ते दोन्ही बाजुंनी सुरू असतं आणि विषमलिंगी मित्रामुळं अशाप्रकारे फायदा होतो. संरक्षण मिळणं हे कदाचित जुनाट प्रकारचं वाटू शकतं. पण आपल्या भूतकाळाशी अशा वर्तनाचा जवळचा संबंध आहे, हे लक्षात घ्यायला हवं. आपल्या पूर्वजांनी एकपत्नीत्वाचं समर्थन केलं होतं. म्हणजे एखादी विशिष्ट जोडी असू शकते, पण ती जोडी आयुष्यभर तशीच राहील असंही नाही. एका महिलेला अनेक साथीदारांपासून मुलं होऊ शकतात. मुलांना वाढवताना पुरुषांकडून संरक्षण आणि इतर गोष्टींचा लाभ होणं फायद्याचं ठरत होतं. विविध पित्यांकडून मुलं असणं आणि इतर पुरुषांना मित्र म्हणून आकर्षित करणं यामुळं एका महिलेला एकाच वेळी अनेक पुरुषांकडून संरक्षण प्राप्त होऊ शकतं. पुरुषाची मैत्री मिळवण्यासाठी कळत-नकळत काही संकेत देणं हे अगदी सोपं असू शकतं.
 
युनिव्हर्सिटी ऑफ विस्कोसिन-एउ क्लेरच्या एप्रिल ब्लेस्क-रेचेक यांच्या मते, "तुम्ही लग्न करून एकाच व्यक्तीशी एकनिष्ट असल्याचं मान्य करता, ही पाश्चिमात्य धारणा आहे." पण हे सर्व यापेक्षा खूप क्लिष्ट आहे, असंही त्या म्हणतात. त्यांच्या मते, "पुरुष आणि महिला दोघांनाही दीर्घकाळासाठी संभोग हवा असतो. पण जेव्हा त्यांच्या फायद्याचं असेल तेव्हा ते शॉर्ट टर्म सेक्स स्ट्रॅटर्जीसाठीही तयार असतात." लैंगिक आणि रोमँटिक आवडीमध्ये अगदी सूक्षम फरक आहे. एका अभ्यासातून एक अगदी सामान्य गोष्ट किंवा नियम समोर आला. तो म्हणजे पुरुष लैंगिक आवडीचा जास्त विचार करतात आणि महिला कमी विचार करतात. पण त्याचवेळी हा नियम रोमँटिक भावनांसाठी लागू होत नाही.
 
त्यामुळं लोक जेव्हा दीर्घकालीन नात्याऐवजी अल्पकालीन बाबींवर लक्ष केंद्रित करतात, तेव्हा चुकीचे अर्थ निघू शकतात या विचाराला त्यामुळं पाठिंबा मिळतो. किंवा, दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा तुमच्याबद्दल लैंगिक आकर्षण असेल तेव्हाच रोमँटिक संकेतांचा वापर करावा, अशाप्रकारेही हे समजून घेता येईल. आपण ठरवूनच आकर्षक मित्रांना पहिल्या स्थानी ठेवत असतो. म्हणजे, त्या मित्राबद्दल आपल्याला आकर्षण वाटणारं असं आधीपासूनच काहीतरी असतं. त्यामुळं रोमँटिक भावना निर्माण होण्याची शक्यता असते. "विषमलिंगी मित्र हे त्यांच्या मित्रांच्या आकर्षणाबाबत नेहमीच पक्षपाती असतात. विशेषतः पुरुष तसं करतात," असं ब्लेस्क-रेचेक म्हणाल्या.
 
विषमलिंगी पुरुष महिलांबरोबर मैत्री कशी करतात? पुरुष डेट कशाप्रकारे करतात याच्याशी त्याचं बरंचसं साम्य असतं. ते ज्यांच्याबद्दल शारीरिक आणि भावनिकदृष्टा आकर्षित असतात त्यांच्याबाबत पुढाकार घेत असतात, असंही त्या म्हणाल्या. "विषमलिंगी मैत्री, तुमचं रोमँटिक जीवन अधिक गुंतागुंतीचं बनवून टाकते," असंही एप्रिल ब्लेस्क-रेचेक म्हणाल्या. "दशकभरापूर्वी मी एक स्वप्न पाहून दचकून उठले. त्यात माझा नवरा शाळेबाहेर दुसऱ्या मुलाच्या आईशी बोलत होता. ती आकर्षक, उंच आणि सडपातळ होती. तिचं एका कमी उंची असलेल्या व्यक्तीशी लग्न झालेलं होतं. माझा नवरा उंच होता. त्यामुळं माझ्या मनात काहीतरी सुरू झालं. स्वप्नात तो तिला हसवत होता. मला ती स्पर्धक वाटली आणि काळजी वाटू लागली. मी त्याला उठवलं आणि स्वप्नाबाबत सांगू लागले.
 
"तो म्हणाला,'आपल्याला कमी आकर्षक मित्र असावे, असं तुला वाटतं का?' त्यावर ती म्हणाली, "आपल्याला मित्र हवे आहेत, जे आपल्यासारखे असतील. जे आपल्याला प्रेरित करतील आणि त्यांच्यामुळं काही लाभ होतील म्हणून ते आकर्षकही असतील." पण तरीही त्याची किंमत मोजावी लागेल. "जर तुम्हाला विषमलिंगींकडून मिळणाऱ्या प्रेरणेबाबत माहिती असेल, तर ती अत्यंत कठीण परिस्थिती असते हे तुमच्या लक्षात येईल," असं ते स्वप्न होतं. आकर्षणाच्या संकेतानंतरही पुढं न जाण्यामागं फक्त नकाराची भीती हे कारण नाही. लोकांना अपयशी प्रयत्नाच्या तुलनेत रोमँटिक संधी गमावल्याचं अधिक दुःख होत असतं.
 
एका संशोधनामध्ये लोक डेटर्सच्या विविध प्रोफाइलसह उपस्थित होते. त्यांनी विचारल्यानंतर त्यांना यश मिळण्याच्या शक्यतेबाबत प्रतिक्रिया दिल्या. जेव्हा एखादी व्यक्ती डेटवर जाण्याची 45% शक्यता असल्याचं सांगण्यात आलं, तेव्हा 83% त्यासाठी तयार झाले. जेव्हा आकडा 5% पर्यंत खाली आला तेव्हाही 41% टक्के जणांनी एक संधी घेण्याची इच्छा व्यक्त केली. नकार मिळण्याची जास्त शक्यता असली तरी त्यांनी चान्स घेण्याचा निर्णय घेतला. वेस्टर्न आँटोरियो युनिव्हर्सिटीचे सहायक प्राध्यापक समांथा जोएल म्हणाल्या की, "नकार त्रासदायक असला तरी, लोक विचारायला मागं हटत नाहीत. नकार जेवढा त्रासदायक असला, तेवढंचं नात्यानं काहीतरी अधिक देऊ करायला हवं."
 
याचा प्रभाव असुरक्षित वाटणाऱ्या काही जणांवरही पाहायला मिळतो. त्यांच्यात आत्मविश्वास कमी असतो, चिंतित असतात किंवा इतरांच्या तुलनेत त्यांना नकार पचवणं अधिक त्रासदायक ठरत असतं. जोएल यांच्या मते, "एक आश्चर्याची बाब म्हणजे, सुरक्षिततेच्या भावनेचा अभाव असलेले लोक नकाराला घाबरत असतात आणि नकाराचीच त्यांना जास्त अपेक्षा असते. पण हे नेहमी सत्य नसतं." "या लोकांना प्रेम मिळवण्याची प्रचंड इच्छा असते. आपल्या जीवनात कोणी नसेल ही भावना त्यांच्या मनात दाटलेली असते. इतर लोकांच्या तुलनेत त्यांना नकाराची प्रचंड भीती असते. पण धोका पत्करण्यासाठी प्रेम मिळण्याचीच प्रेरणाही असते."
 
मित्रांप्रती आपला दृष्टिकोन सहजपणे बदलू शकतो, यावर अॅबी जोर देतात. त्यांच्या मते, "तुम्हाला कदाचित असं वाटू शकतं की तुम्ही पक्क्या आणि कोणतंही लैंगिक आकर्षण नसलेल्या मैत्रीच्या नात्यात आहात. पण काहीवेळा त्यातही बदल घडतो. कधीकधी तुम्ही जेव्हा बदललेल्या भावनांवर काम करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा ते कामी येतं. ज्याप्रकारे व्हेन हॅरी मेट सॅलीमध्ये ते कधी-कधी कामी येत नाही." या वर्तनासाठी उत्क्रांतीच्या सिद्धांतातून एक स्पष्टीकरण समोर येतं. पण अॅबी एका गोष्टीकडं लक्ष वेधतात. ती म्हणजे, जर आपल्याला डेटिंगमध्ये पारंपरिक गोष्टींमध्ये बदल हवा असेल तर, इतिहासाकडं न पाहता वर्तनाचा विचार करायला हवा. "आपण उत्क्रांतीच्या सिद्धांताचा वापर करू शकतो. पण माझ्या मते, सामाजिक संकल्पना आणि जेंडर रोल अधिक फायद्याचे ठरू शकतात, कारण ते आपण बदलू शकतो." "तंत्रज्ञान आपल्या जनुकांवर परिणाम करू शकतं का? ते मला माहिती नाही. पण त्यामुळं आपल्या वर्तनात नक्की बदल येऊ शकतो," अॅबी स्पष्ट करतात.
 
Published By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती