ओपन बुक परीक्षा पद्धत काय आहे, भारतात ती किती परिणामकारक ठरेल?

शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 (12:17 IST)
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यावर्षी इयत्ता 9 वी ते 12 वीपर्यंत ओपन बुक परीक्षा किंवा खुल्या पुस्तक परीक्षेचा पायलट प्रोजेक्ट सुरू करू शकते.
 
इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया आणि द हिंदूसह अनेक वृत्तपत्रांनी या विषयावर बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.
 
या बातम्यांनुसार, मंडळाच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत 'ओपन बुक परीक्षा' या विषयावर चर्चा झाली आहे.
 
ओपन बुक परीक्षा म्हणजे परीक्षा देताना विद्यार्थी पुस्तक किंवा अभ्यासाचं इतर साहित्य पाहून प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो.
 
सीबीएसईमधील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या पथदर्शी प्रकल्पांतर्गत काही निवडक शाळांमध्ये 9 वी आणि 10 वीच्या इंग्रजी, गणित, विज्ञान विषयांची आणि 11 वी आणि 12 वीच्या इंग्रजी, गणित आणि जीवशास्त्र विषयांची परीक्षा ओपन बुक पद्धतीअंतर्गत घेतली जाऊ शकते.
 
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थी ही परीक्षा किती वेळेत पूर्ण करतात हे शोधणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. शिक्षण व्यवस्थेशी संबंधित सर्वांकडून याविषयीचा अभिप्राय घेणं, हाही यामागचा एक उद्देश आहे.
 
या प्रकल्पाद्वारे, मुलांचे विचार करण्याची, विश्लेषण करण्याची, समीक्षक वृत्ती आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेचं मूल्यांकन केलं जाईल.
 
ओपन बुक परीक्षेशी संबंधित संशोधन काय सांगतं?
ओपन बूक परीक्षा जगातील अनेक देशांमध्ये घेतल्या जातात. भारतात 2014 मध्ये, CBSE नं शालेय मुलांसाठी ओपन टेक्स्ट बेस्ड असेसमेंट (OBTA) सुरू केले.
 
इयत्ता 9 वीसाठी हिंदी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र आणि इयत्ता 11वीसाठी अर्थशास्त्र, विज्ञान आणि भूगोल या विषयांसाठी OBTA द्वारे घेण्यात आले.
 
पण 2017-18 मध्ये विद्यार्थ्यांमध्ये समीक्षात्मक वृत्ती निर्माण करण्यात यशस्वी न ठरल्यामिळे हा प्रयोग थांबवण्यात आला.
 
नवीन शैक्षणिक धोरण-2020 मध्ये ओपन बूक परीक्षेचा उल्लेख नाही. पण विद्यार्थ्यांमध्ये एखादी गोष्ट पाठ करण्याच्या प्रवृत्तीऐवजी ती संकल्पना समजून घेण्याची प्रवृत्ती रुजली पाहिजे, असं या धोरणात म्हटलं आहे.
 
'इंडियन एक्स्प्रेस'च्या बातमीनुसार, AIIMS भुवनेश्वरनं केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष असा आहे की, ओपन बूक परीक्षा विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यास मदत करू शकते.
 
केंब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये 2020 मध्ये झालेल्या संशोधनानुसार, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यांनीही सांगितले की ही पद्धत कमी तणावपूर्ण होते.
 
2021 मध्ये, धनंजय आशरी आणि विभू पी साहू यांच्या संशोधनात नोंदवले गेलं की, दिल्ली विद्यापीठात झालेल्या ओपन बूक परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक परीक्षेच्या तुलनेत चांगली कामगिरी केली.
 
तज्ञ काय म्हणतात?
सीबीएसईचे माजी अध्यक्ष अशोक गांगुली यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, ओपन बुक परीक्षा ही नवीन संकल्पना नाही.
 
भारतात, 1985-86 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये याचा प्रयत्न केला गेला. त्यावेळी उत्तर प्रदेश बोर्डाने इयत्ता नववीसाठी ओपन बुक परीक्षा घेतली होती. पण त्याचा प्रतिसाद चांगला नव्हता.
 
ही परीक्षा नीट पार पाडण्यात बोर्ड अपयशी ठरला आणि मग पुन्हा तसा प्रयत्न झाला नाही.
 
गांगुली म्हणतात, "सीबीएसईने इयत्ता 9वी-10वी आणि 11वी-12वीसाठी ओपन बुक परीक्षेचा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ही चांगली गोष्ट आहे. पण ही परीक्षा प्रणाली लागू करण्यात अनेक आव्हानं आहेत."
 
ते सांगतात, “प्रश्नपत्रिका तयार करणं हे सर्वांत मोठं आव्हान आहे. सध्या आपल्या इथे प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांकडे ओपन बुक परीक्षेसाठीचे प्रश्न तयार करण्याची क्षमता नाही. यासाठी लोकांना प्रशिक्षण द्यावं लागेल. याशिवाय, त्यांना सक्षम बनवावे लागेल जेणेकरून ते ओपन बुक परीक्षा पद्धतीनुसार प्रश्न तयार करू शकतील.”
 
भारतातील पायाभूत सुविधांच्या आव्हानांचाही गांगुली उल्लेख करतात.
 
ते सांगतात की, भारतात इयत्ता 9वी, 10वी, 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची संख्या इतकी मोठी आहे की सध्या अशा परीक्षा घेणे खूप कठीण आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही देशभरात इयत्ता 9वी आणि 10वीच्या 30 लाख विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतल्या, तर तुम्ही देशभरात एकसमान संदर्भ साहित्य आणि इतर अभ्यास साहित्य कसे उपलब्ध कराल. हे खूप कठीण काम आहे."
 
पण पद्मश्री सन्मानित शिक्षणतज्ज्ञ जे.एस. राजपूत हे मान्य करत नाहीत.
 
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "पायाभूत सुविधांच्या कमतरतेच्या युगातून भारत खूप पुढे आला आहे. आपल्याला जुन्या विचारसरणीतून बाहेर यायला हवे. आज आपल्याकडे माहिती तंत्रज्ञानाची ताकद आहे. त्यामुळे असे बदल घडून आले आहेत जे पूर्वी अशक्य वाटत होते. . आज ऑन डिमांड परीक्षा होत आहेत. जुनी विचारसरणी नवनिर्मितीत अडथळे निर्माण करते."
 
ओपन बुक परीक्षांमुळे मुलांवरील ताण कमी होईल का?
सध्याची परीक्षा पद्धती मुलांमध्ये विषयांची समज विकसित करण्याऐवजी रट्टा मारण्यावर भर देत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीत ओपन बुक परीक्षा त्यांच्यासाठी तणाव कमी करणारी ठरू शकते.
 
जगमोहन सिंग राजपूत म्हणतात, “भारतात ओपन बुक परीक्षांची नितांत गरज आहे. कारण सध्याच्या परीक्षा पद्धतीमुळे मुलांमध्ये तणाव वाढत आहे. आज, जेव्हा मी कोटामध्ये दर आठवड्याला कोणत्या तरी मुलाच्या आत्महत्येबद्दल ऐकतो तेव्हा मला वाईट वाटते. त्यामुळे ओपन बुक परीक्षा जितक्या लवकर सुरू होईल तितके चांगलं.”
 
सध्याच्या युगात मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांनाही ओपन बूक परीक्षेचं महत्त्व कळत आहे.
दिल्लीतल्या ग्रेटर नोएडा येथील समरविले स्कूलमध्ये इंग्रजी शिकवणाऱ्या वरिष्ठ शिक्षिका डिंपल जोसेफ सांगतात, "कोणतीही नवीन संकल्पना आली की आपण थोडा संकोच करतो. ओपन बुक परीक्षेबाबतही असेच घडत आहे. यामध्ये मुलांना परीक्षेत अशा प्रश्नांना सामोरे जावे लागेल जे त्यांची विश्लेषणात्मक क्षमता वाढवेल."
 
"हे शिकवल्या जाणाऱ्या कोणत्याही विषयाच्या सामग्रीबाबत त्यांचा दृष्टीकोन तयार करेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, यामुळे रट्टा मारण्यापासून मुलांची सुटका होईल. रट्टा मारणं हे मुलांसाठी तणावाचं कारण बनलंय."
 
मात्र, अशोक गांगुली म्हणतात, "ओपन बूक परीक्षांमुळे परीक्षेत कॉपी करणं आणि इतर गैरप्रकार कमी होतील, असं बोललं जात आहे. त्यामुळे मुलांमधला ताण कमी होईल असंही बोललं जात आहे. पण असं होणार नाही. कारण शेवटी परीक्षेत चांगले गुण मिळावेत असं दडपण मुलांवर कायम असेलच.”
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती