'येस वुई कॅन चेंज...' हा मुलमंत्र अमेरिकन जनतेला देत महाशक्तीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेले बराक हुसैन ओबामा यांनी अमेरिकेचे 44 व्या राष्ट्राध्यक्षपदाची दि.20 रोजी शपथ घेतली. मार्टीन ल्युथर किंग आणि अब्राहम लिंकन यांच्या कार्यपध्दतीवर गाढ श्रध्दा असलेल्या ओबामांनी लिंकन यांनी वापरलेल्या बायबलच्या प्रतीवर हात ठेवून सुमारे 30 लाख अमेरिकनांच्या साक्षीने आज आपल्या पदाची शपथ घेतली
पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रध्यक्ष म्हणून शपथ घेवून बराक ओबामा यांनी इतिहास घडविला. शपथविधी समारंभापूर्वी ओबामा दाम्पत्याने सकाळी वॉशिंग्टनच्या ऐपिस्कोपल चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली. व्हाईट हाऊसच्या अतिथी कक्षातून ओबामा राष्ट्राध्यक्ष निवास परिसरात नॉर्थ पोर्टिको येथे पोचल्यावर मावळते राष्ट्राध्यक्ष बुश यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बूश थोडेसे भावूक झाले होते. त्यानंतर दोन्ही नेते कॅपिटल बिल्डिंगमध्यील शपथ ग्रहण समारंभासाठी दोन्ही नेते रवाना झाले.
भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजेपासून शपथविधी सोहळ्यास सुरूवात झाली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जॉन पॉल स्टीव्हन्स यांनी सुरूवातीला बिडेन यांना उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ दिली. अमेरिकन वेळेनुसार सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार रात्री 10. 30 वाजता) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जॉन जी. रॉबर्ट यांनी ओबामा यांना शपथ दिली. त्यानंतर लगेच त्यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले.