स्वामी समर्थांना काय अर्पण करावे?

शुक्रवार, 4 जुलै 2025 (15:38 IST)
स्वामी समर्थांना फुले, फळे, नैवेद्य, वस्त्र, तुळस, धूप, दीप आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. तसेच, भक्तिभावाने केलेले नामस्मरण, आरती आणि स्वामींच्या चरणी समर्पण भाव अर्पण करणे महत्वाचे आहे. स्वामी समर्थांना विविध वस्तू अर्पण करून त्यांची पूजा केली जाते.
 
नैवेद्य: स्वामींना आवडणारे गोड पदार्थ, फळे, किंवा नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते. स्वामी समर्थांना नैवेद्य म्हणून पुरणपोळी, लाडू, कडबोळी, शंकरपाळी, कांदा भजी, गव्हाची खीर, बासुंदी-पुरी, चहा किंवा इतर गोड पदार्थ दाखवले जातात. त्यांना विडा (विड्याचे पान) देखील अर्पण केला जातो, विशेषतः गुरुवारी. 
 
परब्रह्म परमेश्वर सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमशिष्य भक्तशिरोमणी संजीवन योगी श्रीमद सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज विरचित आरती
विडा घ्या हो स्वामिराया ।। भक्तवत्सल करुणालया ।।
देतो हात जोडोनियां ।। भावें वंदुनिया पायां ।। धृ ।।
ज्ञानदृष्टी पुगिफळ ।। तुमच्या कृपेचे हे बळ ।।
मूळ आधार सोज्वळ ।। पापी पतित ताराया ।। १ ।।
भक्तीदळ नागवल्ली ।। पाने शुद्धही काढिली ।।
नामबळे निर्मळ केली ।। सिद्ध झालो जी अर्पाया ।। २ ।।
रंगी रंगला हा कात ।। प्रेमभावाच्या सहित ।।
त्याने केले माझे हित ।। देह लावियला पायां ।। ३ ।।
चुना शांती निर्मळ ।। त्वांचि दिले भक्तीबळ ।।
करुनी मनासी कोमळ ।। चरणी घातली ही काया ।। ४ ।।
वेलची ज्ञानज्योत ।। सर्व भूतांच्या विरहित ।।
ठेवुनी तुमच्या पायी हेत ।। लागे मनासी वळवाया ।। ५ ।।
लवंग जाणां तिखट खरी ।। घेउनी बुद्धीच्या चतुरी ।।
क्रोध दवडीयला दूरी ।। तूची समर्थ ताराया ।। ६ ।।
वैराग्याचे जायफळ ।। तुम्ही दिले भावबळ ।।
करुनी विरक्त निर्मळ ।। शिरी ठेवियेली छाया ।। ७ ।।
पत्री क्षमेची या परी ।। बापा मिळविली बरी ।।
सदा राहोनी अंतरी ।। सुखे सुखविते देहा ।। ८ ।।
काय बदामाची मात ।। फोडुनि द्वैताचा हा हेत ।।
वाढावया भक्तिपंथ ।। सिद्ध केला करुणालया ।। ९ ।।
आत्महिताहित कस्तुरी ।। घेउनी ज्ञानभक्तीपरी ।।
धन्य हिची थोरी ।। भविभवात ताराया ।। १० ।।
आनंद म्हणे केशर सत्य ।। तुमचे पायी माझा हेत ।।
पूर्ण केले मनोरथ ।। कृतीकर्मासी वाराया ।। ११ ।।
 
वस्त्र: नवीन वस्त्रे, विशेषतः पिवळ्या रंगाची वस्त्रे, स्वामींना अर्पण करावी. 
 
फुले: पिवळ्या रंगाची फुले, तुळशीची पाने, आणि इतर सुगंधी फुले स्वामींना अर्पण करावी. तसेच त्यांना अबोली, जास्वंद, चाफा, कमळ आणि बेल यांसारखी फुले देखील अर्पण केली जातात. 
 
फळे: हंगामी फळे स्वामींना अर्पण करावी. स्वामी समर्थांना विविध फळे नैवेद्य म्हणून अर्पण केली जातात, त्यापैकी काही प्रमुख फळे म्हणजे केळी, बोर, पेरू, आणि नारळ. 
 
धूप, दीप आणि आरती: धूप, दीप दाखवून स्वामींची आरती करावी. 
 
नामस्मरण: "श्री स्वामी समर्थ" किंवा "श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ" या मंत्रांचा जप करावा. जप करताना मोठ्याने किंवा मनातल्या मनात जप करू शकता. भक्तीने मूर्तीला दिवा लावा, फुले आणि धूप अर्पण करा . ध्यान: मूर्तीसमोर काही क्षण मौन ध्यानात घालवा, त्यांच्या दिव्य उपस्थितीवर लक्ष केंद्रित करा. जप: त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि मन शुद्ध करण्यासाठी श्री स्वामी समर्थ जपाचा सराव करा.
 
समर्पण भाव: स्वामींच्या चरणी पूर्ण भक्ती आणि शरणागतीचा भाव ठेवावा. स्वामींना सर्वात प्रिय आहे ते म्हणजे भक्तांचा शुद्ध भाव. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती