लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबर रोजी का करावे? संभ्रम असला तर नक्की वाचा निर्णय घेणे सोपे होईल

मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025 (12:31 IST)
महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय दिनदर्शिका कालनिणर्य यात दिलेल्या माहितीनुसार या वर्षी शक 1947 मध्ये 20 ऑक्टोबर 2025 रोजी सोमवारी चतुर्दशी समाप्ती 15.44 वाजता असून त्यानंतर अमावस्या सुरु होत आहे आणि दुसर्या दिवशी 21 ऑक्टोबर रोजी मंगळवारी सायंकाळी 17.54 वाजता अमावस्या समाप्ती आहे.
 
20 ऑक्टोबर रोजी प्रदोषकाळात अमावस्या असून दुसर्‍या दिवशी 21 ऑक्टोबर रोजी सांयकाळी अमावस्या असलेल्या दिवशी धर्मसिंधु, पुरुषार्थ चिंतामणि, तिथिनिर्णय इ.  ग्रंथांमधील वचनांचा विचार करुन 21 ऑक्टोबर रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन दिलेले आहे.
 
'' पूर्वत्रैवव्याप्तिरितिपक्षे परत्रायमत्र याधिकव्यापिदर्शापेक्षया
प्रतिपद्वद्धिसत्त्वेलक्ष्मीपूजादिकम पिपरत्रैवेत्युक्तम् । (धर्मसिंधु, पुरुषार्थ चिंतामणि)
 
अर्थात पूर्व दिवशी प्रदोषव्याप्ति असून दुसर्‍या दिवशी तीन प्रहारापेक्षा अधिक अमावास्याव्याप्ति असेल आणि अमावास्येपेक्षा प्रतिपदा अधिक (वृद्धी) असल्यास लक्ष्मीपूजन दुसर्‍या दिवशी म्हणजे अमावास्येच्या दिवशी करावे.
 
वरील नियम पाहता 21 ऑक्टोबर रोजी अमावास्या 17.54 पर्यंत असून 3 प्रहरापेक्षा अधिक आहे आणि प्रतिपदा समाप्ती 20.16 असल्याने प्रतिपदा अधिक (वृद्धी) आहे. म्हणून धर्मसिंधुमधील वरील वचनानुसार दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेले लक्ष्मीपूजन शास्त्रसंमत आहे. तसेच अमावास्या आणि प्रतिपदा यांचे युग्म असल्याने युग्मास महत्त्व देऊन प्रतिपदायुक्त अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे वचन असल्याने 21 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे सांयकाळी व प्रदोषकाळात (सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटे या कालावधीत) लक्ष्मीपूजन करावे.
 
तसेच 21 ऑक्टोबर रोजी काही प्रदेशांत 17.54 पूर्वी सूर्यास्त होत असल्याने त्या गावी दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन असणार आहे.
 
21 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्त सांयकाळी 06.10 ते रात्री 08.40 पर्यंत.
 
टीप: गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाचा वापर करुन काही जण ऐन सणाच्या वेळेस संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. लक्ष्मीपूजनाच्या बाबतीतदेखील गणितपद्धतीमधील फरकामुळे आणि काही जणांनी धर्मशास्त्रीय वचनांचा योग्य अर्थ न लावल्यामुळे 21 ऑक्टोबरऐवजी अन्य दिवशी लक्ष्मीपूजन असण्याची शक्यता आहे. तरी अशा कुठल्याही मेसेजमुळे, कुठल्याही अफवांमुळे संभ्रमित न होता परंपरेप्रमाणे आपण ज्या पंचांगाचा वापर करता त्याप्रमाणेच लक्ष्मीपूजन करावे ही विनंती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती