दीपावली + शाहरुख = हिट फिल्म

IFMIFM
दिवाळीत अनेक चित्रपट निर्माते आपला चित्रपट प्रदर्शित करण्यास उत्सूक असतात. हा काळ सुट्टीचा असल्यामुळे मोठ्यांपासून लहान निर्मात्यांपर्यंत सगळेच जण आपला चित्रपट या काळात प्रदर्शित करतात. चित्रपट फालतू असला तरी केवळ दिवाळीचा फायदा मिळून तो पैसे वसुल करून देतो.

पंधरा वर्षांपूर्वी दिवाळीत चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेंड नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून दिवाळीत प्रदर्शित झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवू लागल्यामुळे अनेक निर्मात्यांचे लक्ष दिवाळीकडे गेले. त्यामुळे आता दिवाळी हा चित्रपटाही इव्हेंट झाला आहे.

दिवाळी आणि शाहरूख खान यांचीही परस्परांशी सांगड आहे. किंग खानचे दिवाळीत आलेले सर्व चित्रपट चांगले चालले आहेत. यावर्षी त्याचा 'ओम शांती ओम' हा बहुचर्चित चित्रपटही याच काळात प्रदर्शित होत आहे.

बॉलीवूडचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणार्‍या शाहरूखचा पहिला सुपरहिट चित्रपट दिवाळीतच प्रदर्शित झाला होता. 12 नोव्हेंबर 1993 ला बाजीगर प्रदर्शित झाला आणि खलनायक असूनही शाहरूख स्टार झाला. या चित्रपटाआधी त्याचे दिवाना वगळता ‘दिल आशना है’, ‘चमत्कार’, ‘किंग अंकल’ व ‘माया मेमसाब’ हे फ्लॉप चित्रपट आले होते.

दोन वर्षांनी दिवाळीतच म्हणजे 20 ऑक्टोबर 1995 ला त्याचा 'दिलवाले दुल्हनियाँ ले जाएँगे' हा चित्रपट प्रदर्शित झाला. तो एवढा हिट झाला की अजूनही मुंबईत त्याचे शो चालू आहेत. शाहरूख काजोलची जोडी या चित्रपटापासून हिट होऊ लागली. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडले.

यशराज फिल्मला शाहरूखबरोबर दिवाळी आपल्यासाठीही भाग्याची आहे याची जाणीव झाली आणि तेही याच काळात आपले चित्रपट प्रदर्शित करू लागले. 30 ऑक्टोबर 1997 मध्ये याच बॅनरचा शाहरूख प्रमुख भूमिकेत असलेला 'दिल तो पागल है' हा चित्रपट प्रदर्शित केला. या चित्रपटात शाहरूख खानच्या जोडीला माधुरी ‍दीक्षित व करिश्मा कपूर यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटाचे संगीत चांगलेच गाजले होते.

1998 च्या दिवाळीत शाहरूखचा 'कुछ कुछ होता है' प्रदर्शित झाला. या चि‍त्रपटानेही शाहरूखला सुपरस्टार बनवले. त्यानंतर दोन वर्षांनी दिवाळीत शाहरूखचा 'मोहब्बते' प्रदर्शित झाला. त्याने तर शाहरूखच्या झोळीत अनेक पुरस्कार टाकले. या चित्रपटाने भारताबरोबर विदेशातही भरपूर व्यवसाय केला. त्यामुळे दिवाळीत आलेला शाहरूखचा चित्रपट यशस्वी होणार असे समीकरण बनले.

गेल्या वर्षी आलेला 'डॉन' हा सुध्दा दिवाळीतच प्रदर्शित झाला होता. समीक्षकांनी टीका केली तरी या चित्रपटाने चांगला व्यवसाय करून दिला.

आता या वर्षी किंग खानचा ‘ओम शांति ओम’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची निर्माती गौरी शाहरूख खान आहे. बघूया शाहरूख आणि दिवाळी यांच्या यशाची परंपरा या वर्षीही सुरू रहाते का?

वेबदुनिया वर वाचा