कर्नाडांच्या प्रतिभेवर जागतिक मोहोर

'युनेस्‍को'तर्फे जागतिक रंगभूमीच्‍या राजदूतपदी ज्येष्ठ नाट्यकर्मी गिरीश कर्नाड यांची निवड हा केवळ कर्नाड यांचाच नव्हे तर भारताचा मोठा सन्मान आहे. पॅरीस येथे असलेल्‍या जागतिक रंगभूमी समितीच्‍या कार्यालयाने ही घोषणा केली आहे. ब्रिटीश रंगभूमीवरील नट आणि चित्रपट दिग्‍दर्शक पीटर ब्रुक, इटालीयन नाट्यलेखक डॅरीओ फो, फ्रेंच रंगभूमीवरील महानायक एरीन म्‍युचीकिन आणि जर्मन पिना बॉश यांच्‍यातून कर्नाड यांचे नाव निवडले गेले. या बड्या नामावळीतून या निवडीचे महत्त्व कळते.

IFMIFM
भारतीय नाट्यसृष्टीला समृद्ध करणार्‍या कर्नाड यांची निवड नक्कीच सार्थ आहे. कर्नाड म्हटलं की 'तुघलक' आणि 'हयवदन' ही दोन प्रमुख नाटके चटकन डोळ्यासमोर येतात. कारण ती बहुसंख्य भारतीय भाषांत भाषांतरीत झाली आहेत. पण या व्यतिरिक्तही त्यांची अनेक नाटके गाजली. शिवाय केवळ नाटक हेच त्यांचं कार्यक्षेत्र आहे, असंही नाही, त्यांच्या चौफेर प्रतिभेचा वारू चित्रपट, साहित्यातही उधळला आहे. कन्नड साहित्यासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला आहे.

आपलं बहुतांश लेखन कन्नडमध्ये करणार्‍या या ज्येष्ठ नाट्यकर्मीची मातृभाषा मात्र कन्नड नाही. ती आहे कोकणी. आणि प्राथमिक शिक्षण झालं मराठीत. आश्चर्य वाटलं तरी हे खरंय. कर्नाड कुटुंबिय कोकणी असलं तरी त्यांचा जन्म मुंबई जवळच्या माथेरानचा. पुढे हे कुटुंब कर्नाटकात स्थलांतरीत झालं आणि त्यांनी कन्नड भाषा आपलीशी केली.

कर्नाडांच्या व्यक्तिमत्वाला पैलू बरेच असले तरी त्यांची खरी ओळख नाटककार हीच आहे. कन्नड साहित्यावर पाश्चात्य प्रभाव असताना कर्नाडांनी त्याला भारतीयत्व दिले. भारतीय विषयच त्यांनी वेगळ्या खुबीने मांडले. इतिहास आणि पुराण यांचे उत्खनन करून त्याला समकालीन संदर्भ दिला. इतिहासाची मोडतोड करतात अशी टीकाही म्हणूनच त्यांच्यावर झाली. तरीही त्यांनी लेखनाची धाटणी हीच ठेवली. त्यांचे 'ययाती' (१९६१) हे पहिलेच नाटक गाजले. महाभारतातील व्यक्तिरेखांवर आधारीत हे नाटक कर्नाडांना ओळख मिळवून देणारे ठरले. तब्बल सात भारतीय भाषांत ते लगेचच भाषांतरीत झाले. त्यानंतर आले ते 'तुघलक' (१९६४). त्यांच्या सर्वोत्तम नाटकांपैकी एक अशी याची कीर्ति आहे. देशातील प्रमुख नाटककार ही ओळख घडवून देण्यास हे नाटक कारणीभूत ठऱले. याशिवाय 'हयवदन', नागमंडल, वाली, ही त्यांची गाजलेली इतर काही नाटके.

नाटकांबरोबरच चित्रपट क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटवला. एस. एल. भैरप्पा या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कन्नड लेखकाची वंशवृक्ष ही कादंबरी कर्नाडांनीच पडद्यावर आणली. हे त्यांचे पहिले चित्रपट दिग्दर्शन. या चित्रपटाला अनेक पारितोषिके मिळाली. वंशवृक्षशिवाय त्यांनी अनेक कन्नड आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यात तब्बलियू नींदे मग्ने, चेलूवी, केदू हे काही गाजलेले चित्रपट. हिंदीत आलेला रेखा व शेखर सुमन अभिनित 'उत्सव' हाही त्यांचाच चित्रपट. याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटातही भूमिका केल्या. अगदी मराठीतही त्यांनी स्मिता पाटील यांच्यासमवेत उंबरठा या चित्रपटात काम केले. पण असे असले तरी नाट्यकर्मी हीच त्यांची ओळख राहिली.

त्यांच्या या प्रदीर्घ नाट्यकारकिर्दीची गौरवही अनेक पुरस्कारांनी झाला आहे. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी, ज्ञानपीठ कन्नड साहित्य अकादमी अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्या अनेक चित्रपटांनाही पुरस्कार मिळाले आहेत. वंशवृक्षसाठी त्यांना दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. 'भूमिका' या चित्रपटाच्या पटकथेसाठी सर्वोत्कृष्ट पटकथाकाराचेही पारितोषिक मिळाले. अशा अनेक पुरस्कार नि पारितोषिकांचा वर्षाव त्यांच्यावर झाला आहे. पण आता युनेस्कोतर्फे त्यांची झालेली निवड म्हणजे त्यांच्या प्रतिभेवर उमटलेली जागतिक मोहोर आहे.