फुटबॉल वर्ल्डकपमधून जर्मनी बाहेर पडण्याचं काय कारण आहे?
शुक्रवार, 2 डिसेंबर 2022 (19:05 IST)
Author,एम.मणिकंदन
स्पर्धेतील अव्वल संघांपैकी एक मानला गेलेला जर्मनीचा संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. जपानने स्पेनचा पराभव केल्यानंतर जर्मनीच्या पुढच्या फेरीत जाण्याच्या आशा संपल्या. जपान आता ग्रुप ई मध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे.
वरचा फोटो पाहा. तुम्हाला वाटेल की चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. पण याच बॉलवर पुढे जपानने दुसरा गोल केला आणि मैदानात एकच कल्लोळ झाला. मैदानावरील पंच आणि लाईन रेफरींनाही हा बॉल बाहेर असल्याचं वाटत होतं म्हणून हा निर्णय VAR कडे गेला.
टीव्ही अंपायरने व्हीडिओच्या साहाय्याने त्याचा आढावा घेत बॉल पूर्णपणे ओव्हर द लाइन (रेषेबाहेर) नसल्याचं म्हटलं आणि हा गोल ग्राह्य धरला गेला. जपानने नाट्यमयरीत्या स्पेनचा 2-1 असा पराभव केला.
नेमकं काय झालं?
कतार येथे सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या ई गटातील सामन्यात जपान आणि स्पेन यांच्यात सामना झाला. फिफा क्रमवारीत स्पेन 7व्या स्थानावर आहे. जपान 24 व्या क्रमांकावर आहे.
या सामन्यापर्यंत दोन्ही संघांच्या नावावर प्रत्येकी एक विजय होता. पुढच्या फेरीत पात्र ठरण्यासाठी जपानला फक्त एका गुणाची आवश्यकता होती.
सामन्यापूर्वी जपान जिंकण्याची 14 टक्के आणि स्पेन जिंकण्याची 64 टक्के शक्यता वर्तवण्यात आली होती.
सामना अनिर्णित राहण्याची 22 टक्के शक्यता असल्याचाही कौल होता. म्हणजे जपान जिंकण्याबद्दलचा विश्वास अत्यल्प होता.
अंदाजानुसार, स्पेनने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. काही मिनिटांतच स्पेनच्या खेळाडूंनी जपानच्या गोलच्या दिशेने चेंडू मारण्यास सुरुवात केली.
स्पेनच्या अल्वारो मोराटाने 11व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्याच्या अचूक हेडरने स्पेनला आघाडी मिळवून दिली. तेव्हा स्पेनला विजयाची 85 टक्के शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
पहिल्या हाफमध्ये जपानला गोल करण्यात अपयश आले. पण स्पॅनिश संघाने एकामागोमाग एक आक्रमण सुरूच ठेवले.
दुसऱ्या हाफला सुरुवात झाल्यानंतर मात्र जपानचा नूर बदलला. जपानच्या रित्सू डोआनने 48 व्या मिनिटाला पेनल्टी बॉक्सबाहेरून पहिला गोल केला.
यानंतर दोनच मिनिटांत जपानने आणखी एक हल्ला चढवला. डोआनने दिलेला पास सीमारेषेबाहेर जात असल्याचं वाटत असतानाच मिटोमोने तो आत आणला आणि टनाकाने त्यावर गोल केला.मैदानातील पंचांनी तो गोल रिव्ह्यू करण्याचं ठरवलं.
व्हीडिओ रिव्ह्यूनंतर जपानचा गोल वैध असल्याचे जाहीर करण्यात आले. परिणामी, जपानने 2-1 गोलफरकाने स्पेनवर विजय मिळवला.
बॉल आउट का घोषित करण्यात आला?
जपानने विजयी गोल करण्यापूर्वी चेंडूने रेषा ओलांडल्याचे व्हीडिओ आणि फोटोंवरून दिसून आले.
50 व्या मिनिटाला चेंडू स्पेनच्या गोलच्या जवळ सीमारेषेकडे जात होता, पण जपानी खेळाडू गोवरू मिटोमोने त्याचा पाठलाग करत तो मैदानात वळवला. त्यानंतर ओ टनाकाने गोल केला.
पण मिटोमोने चेंडू मैदानात वळवला तोपर्यंत प्रेक्षकांना वाटले की चेंडू बाहेर गेला आहे. टीव्हीवर पाहणाऱ्या लोकांनाही असेच वाटत होते. जपानच्या खेळाडूंनीही गोल पूर्ण साजरा केला नाही.
पण व्हीडीओ रेफरीने घेतलेल्या रिव्ह्यूने पुष्टी केली की चेंडू बाउंड्रीच्या आत होता. फिफाच्या नियमांनुसार, केवळ जमिनीवरील चेंडूचे क्षेत्रफळच नाही तर त्याचा वरचा वक्र देखील विचारात घेतला पाहिजे.
याचा अर्थ चेंडूचा वक्ररेषेच्या वर असला तरी चेंडूने रेषेला स्पर्श केला असे मानले जाते. मिटोमोने पाठलाग करून चेंडू वळवला तेव्हा चेंडूचा वक्ररेषेलगत असल्याचं दिसलं, त्यामुळे जपानला गोलची संधी मिळाली.
जपानचे यश किती महत्त्वाचे आहे?
ई गटातील शेवटच्या सामन्यापूर्वी स्पेन पहिल्या स्थानावर, जपान दुसऱ्या स्थानावर, कोस्टारिका तिसऱ्या स्थानावर आणि जर्मनी शेवटच्या स्थानावर होते.
जपानच्या संघाने हा सामना जिंकल्यामुळे जर्मनी सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या गट फेरीतून बाहेर पडेल. सुरुवातीला असं वाटत होतं.
जर्मनीने आपला सामना जिंकला पण जपानच्या यशामुळे जर्मनीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. जपान पहिल्या स्थानावर आणि स्पेन दुसऱ्या स्थानावर असल्याने दोन्ही संघ पुढच्या फेरीत पोहोचले. जर्मनी आणि कोस्टारिका बाहेर पडले.
आजचे सामने काय आहेत?
कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज 4 सामने खेळवले जाणार आहेत.
दक्षिण कोरिया-पोर्तुगाल संघ आज रात्री 8:30 PM IST ला आमनेसामने येतील. त्याच वेळी सुरू होणारा दुसरा सामना घाना विरुद्ध उरुग्वे यांच्यात आहे.
सर्बिया विरुद्ध स्वित्झर्लंड आणि कॅमेरून विरुद्ध ब्राझील मध्यरात्री 12.30 वाजता.